Kalaram Mandir : बुधवारपासून काळाराम संस्थान वासंतिक नवरात्रोत्सव; 'या' सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kalaram Mandir

Kalaram Mandir : बुधवारपासून काळाराम संस्थान वासंतिक नवरात्रोत्सव; 'या' सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

नाशिक : श्री काळाराम संस्थानच्या (Kalaram Sansthan) वासंतिक नवरात्रोत्सव महोत्सवास बुधवार (ता.२२) पासून प्रारंभ होत आहे. (Kalaram Sansthan Vasantik Navratri festival from 22 march nashik news)

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या हस्ते सायंकाळी साडेपाच वाजता महोत्सवाचे उद्‌घाटन होणार असून, स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवळकर प्रमुख पाहुण्या असतील. ३ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंचवटीतील श्री काळाराम देवस्थानतर्फे दरवर्षी वासंतिक नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो. महोत्सव काळात २६ मार्चला तुलसी अर्चन, २७ मार्चला तुलसी अर्चन, २८ मार्चला सप्तमी महाप्रसाद, ३० मार्चला श्रीराम जन्मोत्सव व अन्नकोट, शुक्रवारी (ता. ३१) कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीराम याग, शनिवारी (ता. १) गीतापठण, रविवारी (ता. २) दुपारी चार वाजता श्रीराम व गरुड रथोत्सव यात्रा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (ता.३) सायंकाळी सात वाजता गोपालकाल्याने महोत्सवाची सांगता होईल.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

महोत्सव काळात बुधवारपासून रात्री आठ ते दहादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात कीर्ती भवाळकर, पंडित मकरंद हिंगणे, ज्ञानेश्‍वर कासार, डॉ. आशिष रानडे, विवेक केळकर, लिटल चॅम्प उपविजेते ज्ञानेश्‍वरी गाडगे, सारंग भालके, नंदकुमार देशपांडे आदींच्या भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करतील. भाविकांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष डॉ. उमेशचंद्र मोरे, विश्‍वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर,वैद्य एकनाथ कुलकर्णी आदींनी केले आहे.

विविध व्याख्याने

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (ता.२२) सायंकाळी साडेपाच ते साडेसात यावेळेत स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवळकर रामवताराचे मर्म’ याविषयी मार्गदर्शन करतील. गुरुवारी (ता.२३) नाट्य कलावंत चैताली खटी ‘मन हे राम रंगी रंगले’ याविषयावर मार्गदर्शन करतील.

शुक्रवार व शनिवारी (ता.२४, २५) समर्थ साहित्याचे अभ्यासक मोहनबुवा रामदासी ‘श्री समर्थांची राम उपासना’ याविषयावर तर रविवारी ज्येष्ठ समीक्षक डॉ. सदानंद मोरे अध्यात्म व राजकारण यावर भाष्य करतील. सोमवारी (ता.२७) स्तंभलेखक डॉ. दत्ता कोहिनकर ‘व्यक्तिमत्त्व विकास’ याविषयावर तर बुधवारी (ता.२९) आंतरराष्ट्रीय वक्ते चेतन राजहंस ‘हिंदू धर्म शिक्षण व राष्ट संकल्पना याविषयावर मार्गदर्शन करतील.