esakal | कागदावर पाणीदार होऊनही नशिबी टॅंकरच! दुष्काळी गावांत टंचाई ‘जैसे थे’

बोलून बातमी शोधा

Groundwater levels increased
कागदावर पाणीदार होऊनही नशिबी टॅंकरच! दुष्काळी गावांत टंचाई ‘जैसे थे’
sakal_logo
By
- संतोष विंचू


येवला (जि. नाशिक) : यंदा जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी एक मीटरने वाढल्याने टंचाईचे चित्र तसे बरे असेल, असा युक्तिवाद केला जात होता. मात्र, उन्हाळा सुरू होताच ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशी स्थिती जिल्ह्यात झाली असून, अनेक गावे टंचाईच्या फेऱ्यात अडकली आहेत. त्यामुळे वाढलेली भूजल पातळी अनेक भागांसाठी केवळ कागदावरच असल्याचेही म्हटले जात आहे.

दोन वर्षे पावसाने जिल्ह्यावर कृपा केल्याने पाणीटंचाई दूर करण्यास नक्कीच हातभार लागला आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यात १५५ टक्के, तर गेल्या वर्षी ११० टक्के पाऊस पडला. विशेष म्हणजे या दोन्ही वर्षांत अनेक तालुक्यांचे पावसाचे नवे विक्रमही स्थापित झाले असले तरी जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता अनेक भागाला या पावसाने वंचितही ठेवले आहे. गेल्या वर्षीच जिल्ह्यात धो-धो पडणारा पाऊस पेठ, त्र्यंबकेश्‍वर, सुरगाणा या पावसाच्या माहेरघरी मात्र सरासरीदेखील गाठू शकला नाही. त्यामुळे या दोन वर्षांतील सरासरी वाढूनही म्हणावी अशी जलक्रांती झाली नाही. फरक एवढाच पडला, की पाऊस वाढल्याने टंचाईग्रस्त गावे कमी झाली आहेत. २०१९ मध्ये जिल्ह्यात उन्हाळ्यात भयावह पाणीटंचाई निर्माण होऊन ६०० हून अधिक फेऱ्यांद्वारे हजारावर वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठ्याची वेळ आली होती. गेल्या वर्षी मात्र हे चित्र समाधानकारक राहिले. जिल्ह्यात ११२ वाड्या-वस्त्यांना ४५ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदा एप्रिलमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला असून, २० वर टँकरद्वारे पन्नासच्या आसपास वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे. हा आकडा मेच्या मध्यापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: मुलाला वाचविण्यासाठी ज्यूलीची नागाशी झुंज! स्वतःचा जीव देऊन केली राखण

यंदा पावसाळ्याच्या अखेरीस जिल्ह्यातील पाऊस व भूजल पातळीच्या आकड्यांनी दिलासा दिला होता. मात्र, पाणीपातळीत वाढ होऊनही टंचाईने डोके वर काढल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईची साडेसाती संपणार केव्हा, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरितच आहे. पाच वर्षांच्या सरासरीनुसार यंदा दिंडोरी, इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यांत सरासरी अर्धा मीटरने खालावली असल्याचे तर दुष्काळी चांदवड, नांदगाव, येवला या टँकरग्रस्त तालुक्यात मात्र भूजल पातळीत मोठी वाढ झाली आहे.

पाच वर्षांच्या तुलनेत त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात भूजल पातळी सरासरी ०.९० मीटर टिकून होती. ती यंदा पाऊण मीटरने खाली गेली आहे. तर पेठमध्ये सरासरीपेक्षा ०.७० मीटर, दिंडोरी आणि इगतपुरीत ०.५३ आणि ०.४९ मीटरने पाणी पातळी खालावली आहे. तर, दुष्काळ पाचवीला पूजलेल्या चांदवड तालुक्यात पाच वर्षांत सरासरी भूजल पातळी जमिनीपासून ४.९५ मीटर खाली होती. तिच्यात यंदा २.६२ मीटरने वाढ झाली आहे. सटाण्याची पाच वर्षांत सरासरी ७.१३ मीटर खाली राहिली. मात्र, यंदा ४.७३ मीटर खाली राहिल्याने भूजल पातळीत २.४० मीटरने वाढ झाली.
दुष्काळी येवला तालुक्यात भूजल पातळी जमिनीपासून सरासरी ३.९४ मीटर खाली राहते. या वर्षी १.५७ मीटर खाली राहिल्याने २.३८ मीटरने वाढ झाली. देवळ्यातही २.१३ मीटरने वाढ झाली आहे. या वाढीचा फायदा डिसेंबर - जानेवारीपर्यंत झाला होता. मात्र, उन्हाळा सुरू होताच अनेक ठिकाणी विहिरी कूपनलिका कोरड्या झाल्या असून, काही ठिकाणी पाणी योजनाही पाण्याअभावी बंद पडल्या आहेत. काही गावात तर गंभीर प्रश्‍न असल्याने टँकरची मागणी होत आहे.

हेही वाचा: एकाच आठवड्यात कुटुंब उद्ध्वस्त! महापालिकेच्या ‘बिटको’तील अव्यवस्थेचे तीन बळी


अशी आहे भूजल पातळी…
+झालेली वाढ (मीटरमध्ये)
बागलाण २.४०
चांदवड २.६२
देवळा २.१३
कळवण ०.४७
मालेगाव १.३९
नांदगाव १.९८
नाशिक ०.५७
निफाड ०.८८
सिन्नर १.५२
सुरगाणा ०.३६
येवला २.३८

- झालेली घट (मीटरमध्ये)
दिंडोरी -०.५३
इगतपुरी -०.४९
पेठ -०.७०
त्र्यंबकेश्‍वर -०.७५.