
Nashik : विहिरीत पडलेल्या बिबट्याने केली स्वतःची सुटका
सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात वावी जवळच्या फुलेनगर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून वास्तव्य असणारा बिबट्या कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी धावत असताना चाळीस फुटी खोल विहिरीत पडला. अर्धवट खोदकाम असलेल्या या विहिरीतून तब्बल तासाभराच्या प्रयत्नांनी बिबट्याने स्वतःची सुटका करून घेत धूम ठोकली. सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून वन विभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा बसवला आहे.
फुलेनगर शिवारात असलेल्या पाझर तलाव क्षेत्रात अलीकडील काही महिन्यात रानडुकरांची संख्या वाढली आहे. शेती पिकांचे नुकसान करणाऱ्या या रानडुकरांची आयती शिकार मिळत असल्याने एका बिबट्याने देखील परिसरात ठाण मांडले आहे. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास पठाडे वस्तीवर शेततळ्यावर दडून बसलेल्या बिबट्याने माणसांची व कुत्र्यांची चाहूल लागल्यावर बाजूच्या उसात धूम ठोकली. नेमकी या शेतात ऊस तोडणी सुरू असल्याने मजुरांनी आरडाओरड केल्याने बिबट्या फुलेनगर गावाजवळच्या आनप वस्तीकडे पळाला. या वेळी सात ते आठ कुत्रे या बिबट्याचा पाठलाग करू लागले. बचावासाठी बिबट्याने सुरेश आनप यांच्या शेतातील अर्धवट खोदकाम झालेल्या एका विहिरीत उडी घेतली. मात्र, या विहिरीतून बाहेर पडताना बिबट्याच्या नाकी नऊ येत होते. हा सर्व प्रकार घडत असताना बघ्यांनी देखील विहिरीजवळ गर्दी केल्याने वारंवार प्रयत्न करूनही बिबट्याला गोंगाटामुळे बाहेर पडणे शक्य होत नव्हते. दरम्यान, गावातील तरुणांनी विहिरीजवळील गर्दी बाजूला करून बिबट्याला बाहेर पडण्याचा मार्ग सुकर केला. तासाभराच्या प्रयत्ना नंतर काहीशी विश्रांती घेत बिबट्याने ताकद एकवटत विहिरी बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. केवळ पाच टप्प्यात कपारींच्या आधाराने उड्या मारत हा बिबट्या बाजूच्या उसाच्या शेताकडे पसार झाला.
हेही वाचा: नाशिक : फुकट्यांकडून साडेबारा कोटींची वसुली
घटनेची माहिती मिळाल्यावर वावी पोलिस ठाण्यातील हवालदार योगेश शिंदे, प्रकाश चव्हाण, वन अधिकारी अनिल साळवे, श्री. तांबे, वनमजूर नारायण वैद्य यांनी फुलेनगर येथे धाव घेतली. आनप वस्ती च्या बाजूला असलेल्या उसाच्या शेताच्या बांधावर लिंबाच्या झाडाखाली सावलीत साडेदहा वाजेपर्यंत हा बिबट्या बसून होता. वन अधिकारी साळवे यांनी स्थानिक नागरिकांना या बिबट्याला त्रास न देण्याची सूचना केली. तसेच तातडीने सिन्नर येथून पिंजरा बोलावून घेत उसाच्या शेताजवळ लावण्यात आला.
हेही वाचा: नाशिक शहरात बाप-लेकाची आत्महत्या
Web Title: Leopard Fell Into Well Rescued Itself Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..