
नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार
अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : नाशिक-मुंबई महामार्गावर विल्होळी ते मुंढेगाव दरम्यान अपघातांची मालिका सुरू असतांनाच महामार्गावर असलेल्या गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतील लिअर ऑटोमोटिव्ह कंपनी जवळ मंगळवारी (ता. १८) रोजी रात्री ११ वाजता अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीत कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून या परिसरात अजूनही बिबटे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीत रात्री अपरात्री रात्रपाळीसाठी येणाऱ्या असंख्य कामगारांची वर्दळ सुरू असते. येथूनच काही अंतरावर शेतवस्ती असल्यामुळे भक्ष शोधण्यासाठी बिबट्या रात्रीच्या वेळी या ठिकाणी येत असल्याचे शेतकऱ्यांच्या तसेच अनेक कामगारांच्या निदर्शनास आल्याचे येथील कामगारांनी सांगितले. मागील वर्षी देखील गोंदे फाट्याजवळील शिवचरित्रकार विनोद नाठे यांच्या शेतवस्तीवरील गायी, म्हशी या प्राण्यांवर हल्ला चढवला होता. त्यानंतर वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावण्यानंतर सदर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. संबंधित विभागाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देवून अजून बिबटे असल्याची खात्री करत या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी येथील कामगार व शेतकरी करीत आहे.
"गोंदे दुमाला औद्योगिक वसाहत लष्करी हद्दीलगत असून व जवळच शेतवस्ती असल्यामुळे बिबट्यांसारखे हिंस्र श्वापदे भक्ष शोधण्यासाठी रात्री अपरात्री फिरत असतात. रात्री उशिरापर्यंत औद्योगिक परिसरात हजारो कामगार रात्रपाळीसाठी नेहमीच वर्दळ असते. अनेक वेळा काही कामगारांना बिबट्या दृष्टीस आला होता. सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने उपाययोजना कराव्यात यामुळे कामगारांच्या मनातील बिबट्याविषयीची भीती राहणार नाही. - शरद सोनवणे.( लोकनियुक्त सरपंच, औद्योगिक वसाहत गोंदे दुमाला)