Nashik Crime News: कर्ज 6 लाख, घेतले 7 अन्‌ मागणी 40ची; अवैध सावकाराविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kamble's relatives staged a protest outside the Suburban Police Station demanding the arrest of the moneylender responsible for the death of Rabindra who took poison after being harassed by the moneylender.

Nashik Crime News: कर्ज 6 लाख, घेतले 7 अन्‌ मागणी 40ची; अवैध सावकाराविरोधात गुन्हा दाखल

नाशिक,नाशिक रोड : नाशिकरोडच्या जयभवानी रोड परिसरात राहणाऱ्या दोघा भावांनी अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून रविवारी (ता. ५) सायंकाळी विषप्राशन केले. यात एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी उपनगर पोलिसात संशयित अवैध सावकार रत्नाकर भोर (रा. जयभवानी रोड) याच्याविरोधात आत्महत्त्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोर याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

तत्पूर्वी सावकाराला अटक करण्याच्या मागणीसाठी रवींद्रच्या नातेवाईकांनी उपनगर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करीत आक्रोश केला. (Loan 6 Lakh Borrowed 7 and Demand 40 case registered against illegal lender Nashik Crime News)

नाशिक शहरातील अवैध सावकारीचा मुद्दा दोन महिन्यांपासून ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत आयुक्तालय हद्दीमध्ये सहा गुन्हे दाखल झाले आहेत. नाशिकरोडच्या जयभवानीनगरमधील भालेराव मळ्यातील रहिवासी जगन्नाथ व रवींद्रनाथ कांबळे हे बंधू संशयित रत्नाकर भोर याच्याकडे कामाला होते.

काही कारणातून त्यांच्यावर सहा लाखांचे कर्ज झाले होते. दोघा बंधूंनी सोने मोडून, वाहने विकून व नातलगांकडून उसनवार पैसे घेऊन संशयित भोर यास ७ लाख परत केले होते. परंतु संशयिताने त्यांच्याकडे ४० लाखांची मागणी केली होती, असे कांबळे यांच्या सुसाईट नोटमध्ये म्हटले आहे.

याच कारणातून दोघा भावांनी एकलहरे परिसरातील डोंगरावर विषप्राशन केले होते. याप्रकरणी उपनगर पोलिसात रघुनाथ कांबळे यांच्या फिर्यादीनुसार संशयित रत्नाकर भोर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित भोर याचा शोध घेण्यासाठी परिमंडळ दोनचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. भोर व कांबळे यांच्यातील आर्थिक व्यवहाराचाही शोध घेतला जात आहे.

त्यात अवैध सावकारी स्पष्ट झाल्यास त्यानुसार भोरविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे उपायुक्त खांडवी यांनी सांगितले. दरम्यान अवैध सावकारीचा जाच, वा वसुलीसाठी तगादा लावला जात असेल तर संबंधित पीडितांनी पोलिसांकडे तक्रार करावी.

अवैध सावकारी कोणी करीत असेल त्याबाबतही पोलिसांना माहिती द्यावी. संबंधितांचे नाव गुप्त ठेवले जाईल असेही पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी वारंवार म्हटले आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

उपनगर पोलिस ठाण्यात आंदोलन

नाशिक रोड : मृत रवींद्रच्या नातेवाईकांनी रविवारी रास्ता रोको करून संबंधित सावकाराला अटक करण्याची मागणी केली होती. सोमवारी उपनगर पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान सावकाराला लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर पोलिसांनी दिली.

रवींद्रचा उपचारादरम्यान काल मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश करीत रूग्णालयाबाहेरच ठिय्या दिला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी नातवाईकांनी आज उपनगर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी त्यांना पोलिसतपास सुरू आहे, सावकाराला लवकरच अटक करण्यात येईल असे आश्‍वासन दिले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणी रघुनाथ कांबळे यांनी उपनगर पोलिस ठाण्यात संबंधित सावकाराविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

कांबळे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी रत्नाकर भोर (रा. जगतापमळा, नाशिक रोड) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Nashikdeathagitation news