आगामी निवडणूकांमध्ये मतदारांची संख्या घटणार? Online मतदार नोंदणीत दाखलेच वगळले | Voter list | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Voter list

आगामी निवडणूकांमध्ये मतदारांची संख्या घटणार?

मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : आगामी वर्षारंभी २५ जानेवारीला मतदार दिवसांच्या मुहूर्तावर संपूर्ण जिल्ह्यातील मतदारांच्या यादीचे संक्षिप्त पुनरीक्षण काम निवडणूक आयोगाने हाती घेतले आहे. मात्र, या कामात प्रशासनानेच क्लिष्ट नियमांचे खोडे घातल्याने वंचितांचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढली आहे. मतदारांची ऑनलाइन नोंदणीत सहज उपलब्ध दाखलेच वगळण्यात आले आहेत. तर ऑफलाइन कामांसाठी तालुका पातळीवर अवघा एक कर्मचारी असल्याने महत्वपूर्ण काम संथगतीने होत आहे. निवृत्त कर्मचारी बीएलओ कामात नेमल्याचा प्रताप तालुक्यात घडला आहे.

कोणत्याही कर्मचाऱ्यांला ॲप वापरण्याचे प्रशिक्षण नाही

नाशिक जिल्ह्यात संक्षिप्त पुनरीक्षण मतदार यादीचे काम बीएलओमार्फत सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मयत व दुबार मतदार घरोघरी शोधून ती नावे समाविष्ट व वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने ‘गरुडा’ आणि ‘वोटर हेल्पलाईन’ हे दोन ॲप्स कार्यान्वित केले खरे; परंतु कोणत्याही कर्मचाऱ्यांना हे ॲप्स वापरण्याचे प्रशिक्षण दिले नाही, असा आरोप कर्मचारी करत आहेत. अधिकारी वर्गाने ग्रामीण भागातील वास्तव स्थितीचे आकलन न करताच आदेश निर्गमित केले आहेत. ऑनलाइन नावे अपलोड करताना आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि पासपोर्ट या चारच पुरावा दाखल्यांना परवानगी दिल्याने ग्रामीण भागात पुरावे सादर करणे अडचणीचे ठरत आहे. शाळा सोडल्याचा दाखला जन्मतारखेसाठी सहज उपलब्ध होणारा पुरावा ऑनलाइन प्रक्रियेत वगळण्यात आला आहे. आधार कार्डवर जन्मतारीख नसल्याने हा पुरावा कुचकामी ठरतो आहे. दुर्गम भागात नेटवर्क मिळत नसल्याने हे काम संथगतीने होत आहे. बीएलओसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची जुनीच यादी तहसील कार्यालयाने वापरल्याने बदली व निवृत्त कर्मचाऱ्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: अंबासन फाट्यावर अवैध गोवंश वाहतूक करणारा पिकअप पोलीसांच्या ताब्यात

बीएलओ कर्मचाऱ्यांना दोन्ही अधिकृत ॲप्स वापरण्याचे प्रशिक्षण नसल्याने ही यंत्रणा फोनाफोनीने सैरभैर झाली आहे. जन्मदाखला व तत्सम पुरावे ऑफलाइन प्रक्रियेसाठी प्राप्त प्रस्ताव पूर्तत: करणारा अवघा एकच कर्मचारी असल्याने संक्षिप्त पुनरीक्षण मतदार यादीचे काम संथगतीने होते. ३३१ बीएलओचे प्रस्ताव एक कर्मचारी कसे पूर्ण करणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ऑनलाइन काम अपूर्ण दिसत असल्याची ओरड होत असताना नेमक्या दुखण्याकडे कानाडोळा होत असल्याचा आरोप बीएलओ कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

बीएलओ मानधनापासून वंचित

दिवाळीपूर्वी बीएलओ कर्मचाऱ्यांना मानधन अदा करावेत, असे लिखीत आदेश राज्याचे अवर सचिव, उपमुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी १४ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांना काढण्यात आले. मात्र, त्रुटीपुरते कारण पुढे करत मानधनापासून वंचित ठेवण्यात आले आहे. पूर्ण काम करणारे कर्मचारी नाहक भरडले जात आहेत.

बीएलओसाठी नियुक्त कर्मचारी

तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक - माध्यमिक शिक्षक; ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, कोतवाल, आशा स्वयंसेविका.

मालेगाव तालुका नेमणूक बीएलओ : ३३१

हेही वाचा: आम्हीच रात्रभर का जागायचे? शेतकऱ्यांचा महावितरणला सवाल

''कामकाजातील त्रुटींबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. मतदार यादीचे संक्षिप्त पुनरीक्षण वेळेत होण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्रुटी दूर केल्या जातील.'' - गणेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग, नाशिक

loading image
go to top