esakal | जनावरांवर लम्पीचा प्रादुर्भाव; पशुधन मालकांत भितीचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

Lumpy-Skin-Disease-Sakal

जनावरांवर लम्पीचा प्रादुर्भाव; पशुधन मालकांत भितीचे वातावरण

sakal_logo
By
दत्ता जाधव

नाशिक : जिल्ह्यात जनावरांना लम्पी त्वचाराेगाचा (Lumpy skin disease) प्रादूर्भाव झपाट्याने होत असून, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ११ हजार ४९१ जनावरांचा लम्पीच्या गाठी आल्या आहेत. आतापर्यंत ९२ हजार ५०३ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. राज्य शासनाने लसींचा पुरवठा करण्यात असमर्थता दर्शविली असून, स्थानिक पातळीवर निधीचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या आजारामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होत असून, सरकारने हात वर केल्याने पशुधन मालकांत भितीचे वातावरण आहे.

पशुपालकांचे माेठे नुकसान

जिल्ह्यात दहा लाखांपेक्षा अधिक पशुधन आहे. यात दुभत्या जनावरांची संख्या मोठी आहे. मागील महिन्यापासून जिल्ह्यात लम्पी त्वचा रोगग्रस्त जनावरे आढळले. त्याचे प्रमाण त्र्यंबकेश्वर, निफाड, येवला, मालेगाव, इगतपुरी व सिन्नर या तालुक्यांमध्ये मोठे आहे. या आजारामुळे जनावरांना गाठी येऊन डोळे व नाकातून स्त्राव येतो. शिवाय रोगट वासरू जन्माला येणे, दुधाचे प्रमाण कमी होणे आदी प्रकार घडतात. त्यामुळे पशुपालकांचे माेठे नुकसान होत आहे. याला प्रतिबंधक उपाय म्हणून राज्य शासनाने ९० हजारांवर लसी पुरविल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने संबंधित जिल्ह्यांना यापुढे लस (Vaccine) पुरवली जाणार नसल्याचे कळविले आहे. लसींसाठी स्थानिक पातळीवर नियोजन करण्याचे निर्देशही दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे वेगळा निधी नसल्याने त्यांनी सेवा शुल्कातून जमा झालेल्या रकमेतून लसी खरेदी करण्याचे निर्देश तालुका पातळीवर दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठवून लम्पी त्वचारोग प्रतिबंधक लसीकरणासाठी ग्रामनिधीचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा: नाशिक शहरात तिसऱ्या लाटेचे संकेत? रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ

सरकारने निधीची तरतूद करावी

लम्पी त्वचारोेग प्रतिबंधक लसीकरणासाठी शासनाने स्थानिक पातळीवर जबाबदारी सोपविली आहे. मात्र, पशुसंवर्धन विभागाकडे यासाठी वेगळा निधी नाही. शिवाय प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामनिधी खर्च करू शकेल, असे नाही. त्यामुळे अनेक पशुपालकांना त्यांच्या पाळीव जनावरांना लसीकरण करण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यातून आजाराचा संसर्ग वाढत जाण्याचा धोका वाढला आहे. यामुळे राज्य सरकारने या रोगाच्या निर्मूलनासाठी व्यापक मोहीम राबवावी व निधीची तरतूद करावी, अशी मागणी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांनी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा: नाशिककरांनो काळजी घ्या! रुग्णसंख्या फक्त 100 ने कमी - भुजबळ

loading image
go to top