Latest Marathi News | आज गौराईंचे महापूजन; सोनपावलांनी ज्येष्ठा-कनिष्ठा गौरीचे आगमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gauri Jyeshtha kanishtha

आज गौराईंचे महापूजन; सोनपावलांनी ज्येष्ठा-कनिष्ठा गौरीचे आगमन

नाशिक : लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन झाल्यावर आज ज्येष्ठा- कनिष्ठा गौरीचे सोनपावलांनी आगमन झाले. तीन दिवसांसाठी माहेरपणाला येणाऱ्या गौराईचे मंगलमय वातावरणात घरोघर स्वागत झाले. महिलांनी मनोभावे पूजन करत सुखसमृद्धीसह उत्तम आरोग्यासाठीही साकडे घातले.

कुलपरंपरेप्रमाणे प्रत्येकाच्या घरी उभ्या, बसलेल्या, तसेच खड्यांच्या गौरी विराजमान झाल्या. अनुराधा नक्षत्रावर दिवसभर मुहूर्त असल्याने सकाळपासून सायंकाळपर्यंत गौरीची स्थापना करण्यात आली. रविवारी (ता. ४) गौराईंचे महापूजन होणार असून, महिलांचा हळदी कुंकूचाही कार्यक्रम होणार आहे. (Mahapujan of Gaurai today Arrival of Jyeshtha kanishtha Ganehsotsav 2022 nashik Latest Marathi News)

शहरात पारंपरिक पद्धतीने रीतिरिवाज सांभाळत गौराईचे घरोघर आगमन झाले. प्रथेनुसार घरात आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या महिलेचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणले जातात.

त्या वेळी चमच्याने ताट वाजविण्यात येते. गौराईची स्थापना करण्यापूर्वी यांना घरातील समृद्धी, दूध- दुभत्याची जागा आदी गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. त्यानुसार बाहेरून घरात लक्ष्मीचा प्रवेश केला जातो. गौरीच्या स्थापनेच्या वेळी ज्येष्ठा-कनिष्ठा अशा दोन्ही मूर्तींना दागिन्यांनी सजविले गेले.

पारंपारिक पद्धतीने नैवेद्य

आज आणि उद्या ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीच्या पूजनानंतर पारंपारिक पद्धतीने नैवेद्य दाखविण्यात आला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा केली जाते. रविवारी (ता .४) सकाळी गौरीची, महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (रव्याचा लाडू, बेसन लाडू, करंजी,चकली, शेव, गूळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवला जाणार आहे. महानैवेद्यासाठी पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबिल, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो.

हेही वाचा: Sinnar Flood News : पुरात अडकलेल्यांना काढण्यासाठी सिन्नरकरांची एकजूट

रेडिमेड विडाही उपलब्ध

गौरीच्या महापूजेला गोविंद विडा दिला जाणार असून, दोन पानांपासून ते वीस ते पंचवीस पानांचा विडा केला जातो. यासाठी दुकानातही रेडिमेड विडे मिळतात. गौरीची सायंकाळीही आरती करून प्रसाद वाटप केला जातो.

महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदी- कुंकू कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे. आज अनेक कुटुंबात सौभ्यासवतींना भोजन देण्याची पद्धत आहे, त्यानुसार महिलांची लगबग सुरू होती.

हेही वाचा: पिंपळगाव बसवंतमध्ये मोदक, लाडूची रेलचेल; गणरायासाठी तयार प्रसादाला मागणी

Web Title: Mahapujan Of Gaurai Today Arrival Of Jyeshtha Kanishtha Ganehsotsav 2022 Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..