esakal | नाशिकच्या कृषीला मक्याचा 'मुलामा'! शेतकऱ्यांना मिळतोय चांगला नफा
sakal

बोलून बातमी शोधा

corn farming

नाशिकच्या कृषीला मक्याचा 'मुलामा'! शेतकऱ्यांना मिळतोय चांगला नफा

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : एकरी निघणारे चांगले उत्पादन, कमी भांडवल, दुसरे पिक घेण्याची संधी अन् हमीभावासह खाजगी बाजारातही मिळणारा समाधानकारक भाव असे चौफेर फायदेच फायदे असल्याने जिल्ह्यात मक्याचे पीक प्रमुख पीक बनत असून यावर्षी देखील सर्वाधिक क्षेत्रावर मका पीक घेतले आहे. विशेष म्हणजे खरिपाच्या एकूण पेरणीच्या क्षेत्रापैकी जिल्ह्यात एकट्या मक्याखाली ३६ टक्के क्षेत्र गुंतवले आहे. येवल्याचे तर मका खरिपातील प्रमुख पीक बनले असून ५५ टक्क्यांवर क्षेत्रावर फक्त मका पीक घेतले आहे.


मका बनले जिल्ह्याचे मुख्य पीक

बागायतदारांचा आणि दुष्काळी असलेला नाशिक जिल्हा कांदा आणि द्राक्षांचा म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. आता मक्याचा जिल्हा म्हणूनही नवी ओळख मागील दोन-तीन वर्षात झाली आहे. विशेषतः मालेगाव, येवला, बागलाण, नांदगाव तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र मक्याखाली गुंतवले जात आहे. जिल्ह्यात खरिपाची ६ लाख ४२ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली असून यापैकी तब्बल २ लाख ३४ हजार हेक्‍टर क्षेत्र मक्याच्या पिकाखाली गुंतवले आहे. जिल्ह्याची झालेली पेरणी ९६ टक्के असून याच्या ३६ टक्के क्षेत्र मक्याचे आहे. तर मक्याच्या सरासरीच्या तुलनेत तब्बल १११ टक्के पेरणी झाली आहे.

हेही वाचा: शेतकऱ्याची कमाल! लाल भेंडी पिकवत मिळवला मोठा नफा


यामुळे वाढली मागणी

मक्याला पोल्ट्रीसाठी व स्टार्च उद्योगासाठी मोठी मागणी वाढली आहे. या दोन्ही उद्योगांसाठी सांगली, सातारा, शिरपूर, दोंडाईचा येथे मागणी आहेच; पण गुजरात, तामिळनाडू, हरियाणा, पंजाब आदी राज्यात व युक्रेन, मलेशिया, व्हीएतनाम येथेही मोठ्या प्रमाणात मका निर्यात होतो. याशिवाय शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने देखील मोठ्या प्रमाणात मक्याची खरेदी होते. किंबहुना गावोगावी देखील खासगी व्यापारीसुध्दा मक्याची खरेदी करू लागले आहेत.


बदलतोय पीक पॅटर्न

जिल्ह्यातील पीक पॅटर्न सातत्याने बदलत असून बाजरी, डाळी व तेलबियाचे क्षेत्र निम्य्याने घटले आहे. तर मक्यासह कांदा व भाजीपाला पिकाच्या क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. मका पीक घेण्यासाठी कमी भांडवल लागते, बियाण्याच्या किमती मर्यादित आणि फक्त दोन-तीन फवारण्या, अल्प खते, आंतरमशागतीसह काढणीचा यंत्रामुळे येणारा अल्प खर्च, जनावरांना चारा तसेच काढणी करतांना पाऊस असला तरी बिट्या झाकून ठेवत केव्हाही मका तयार करून विक्री करता येतो. यामुळे अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून मक्याला जिल्ह्यातील ८-१० तालुक्‍यात सर्वाधिक पसंती मिळत आहे. मका पिकाची दिवाळीपूर्वी काढणी झाली की तेथे पुन्हा रब्बीचे गहू, हरभरा किंवा कांद्याचे पीक घेता येते.

हेही वाचा: व्यापाऱ्याचे टोमॅटोच्या मापात पाप; शेतकऱ्यांनी केला भांडाफोड

बाजारभावात असते तेजी

वाढत्या मागणीमुळे कोरोना (Corona) पूर्वी खाजगी बाजारात मक्याचा दर प्रति क्विंटलला दोन हजाराच्या आसपास पोहोचले होते. तर हंगामात दर १२०० ते १५०० च्या आसपास असतात. आजही मका खाजगी बाजारात १४०० ते १८५१ तर सरासरी १७६० दर भावाने विक्री होते.
शिवाय शासकीय हमी भावाने जिल्ह्यात नऊ केंद्रावर मोठी खरेदी होते. यंदा खरेदीसाठी नाव नोंदणी झाली असून १८७० रुपये दर मिळणार आहे. यामुळेच मका पिकाला पसंती मिळत आहे.

येवल्यात नंबर एक

मका पिकाची सर्वाधिक लागवड येवला तालुक्यात झाली आहे. येथे ७२ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून यात ४० हजार हेक्टरवर मका पीक घेतले आहे. येथील शेतकरी एकरी उत्पादन देखील विक्रमी काढतात


असे मिळते उत्पन्न

मक्याचे पीक १२० दिवसाचे असून अल्प पाण्यावरही निघते. एकरी ३० ते ४० तर सरासरी ३३ क्विंटल उत्पन्न मक्याचे निघते. शासकीय १८७० रुपयाचा हमीभाव गृहीत धरल्यास सरासरी ५५ ते ६५ हजाराचे उत्पन्न एका एकरातून मिळते. यातील सुमारे २० ते २५ हजाराचा खर्च जातो तर अंदाजे ३५ ते ४५ हजार रुपये शेतकऱ्यांच्या हातात राहतात.

“पोल्ट्री व स्टार्च उद्योग वाढल्याने मक्याची मागणी वाढत आहे. परवडणारा भाव, केव्हाही पिक विक्रीची पर्याय, त्यातच हमीभावाने होणारी खरेदी या कारणांमुळेच शेतकरी मका पिकाकडे वळले आहे. येथील मका युक्रेन, मलेशियासह तामिळनाडू पर्यंत दरवर्षी पाठवतो. योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांसाठी चांगले उत्पन्न देणारे हक्काचे पिक ठरतेय.” -गोरख भागवत, मका व्यापारी, येवला.

हेही वाचा: मनमाडकरांची पाण्याची चिंता मिटली; वागदर्डी लवकरच 'ओव्हरफ्लो'

अशी होते पेरणी...
- खरीप हंगाम : १५ जून ते १५ जुलै
- रब्बी हंगाम : १५ ऑक्‍टोबर ते १५ नोव्हेंबर
- उन्हाळी : १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी

जिल्ह्यातील मकाची पेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका - सरासरी - पेरणी - टक्के
येवला - ३०४७२ - ४०५५७ - १३३
मालेगाव - ३३५४९ - ४४७३३ - १३३
सटाणा - ३४८५९ - ३६६९२ - १०५
कळवण - १८१११ - १७४३७ - ९६
देवळा - १४२८१ - १७०४९ - ११९
नांदगाव - २७१०० - ३१८४० - ११७
नाशिक - १३८८ - ४७१ - ३४
दिंडोरी - २१०३ - ९१९ - ४३
निफाड - १३९८४ - ११२१८ - ८०
सिन्नर - १३६८३ - १४८७७ - १०८
चांदवड - १९७३३ - १८५९० - ९४
एकूण - २०९४९७ - २३४४७० - १११

loading image
go to top