मनमाडकरांची पाण्याची चिंता मिटली; वागदर्डी लवकरच 'ओव्हरफ्लो' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vagdardi Dam

मनमाडकरांची पाण्याची चिंता मिटली; वागदर्डी लवकरच 'ओव्हरफ्लो'

मनमाड (जि. नाशिक) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईचे ‘नो टेन्शन’ राहणार आहे. सध्या पाणीपातळी शंभर दशलक्ष घनफूट झाली असून, ११० दशलक्ष घनफूट झाल्यास पाणी ओसंडून वाहून ओव्हरफ्लो होऊ शकते.


रेल्वेचे शहर म्हणून ओळख असलेल्या मनमाडला पाणीटंचाईचे शहर म्हणूनदेखील ओळखले जाते. दुष्काळप्रवण तालुका असल्याने मनमाडही त्याला अपवाद नाही. काही वर्षांपासून पाणीटंचाईमुळे मनमाडकर पुरते हैराण झाले आहे. चांगला पाऊस न झाल्यामुळे धरण भरले जात नव्हते. त्यामुळे पंधरा, पंचवीस तर एकवर्षी पंचावन्न दिवसांआड पाणीपुरवठा झाला होता. यंदाही तशीच परिस्थिती होती. पाऊस पाहिजे तसा झाला नाही. मात्र, काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा आशा पल्लवित झाल्या असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत गेला. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होत गेली. सध्या धरण भरण्याच्या मार्गावर असून, दोन ते तीन दिवसांत धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहताना दिसेल. त्यामुळे धरणात पाणीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला असून, काही दिवसांतच धरण ओव्हरफ्लो होईल.

हेही वाचा: व्यापाऱ्याचे टोमॅटोच्या मापात पाप; शेतकऱ्यांनी केला भांडाफोड

सध्या धरणाची पाणीपातळी ६७ फूट अर्थात १०० दशलक्ष घनफूट झाली असून, धरणाची एकूण क्षमता ११० दशलक्ष घनफूट आहे. त्यामुळे धरण भरण्यास काहीसा अवकाश आहे. धरणात उपलब्ध असलेल्या जलसाठ्यातून शहराला पंधरा दिवसांआड का होईना पण पाणी नियमित मिळत असल्याने यावर्षी मनमाडकरांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली नाही की पाणी विकत घेण्याची वेळ आली नाही. पाणीपुरवठ्याचे दिवसदेखील कमी झाले नाही की वाढवण्यातही आले नाही. मात्र, उद्‍भवणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे काहीवेळा पाणीपुरवठ्याच्या दिवसांत वाढ होते.

नागरिकांना दिलासा

मागील काही वर्षांच्या तुलनेत होणारी पाणीटंचाई यंदा जाणवली नाही. सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा आणि पालखेड धरणातून मिळणारे पाण्याचे आवर्तन यामुळे उन्हाळा पार होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: गोदेच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

loading image
go to top