Inspirational News : सिक्युरिटी एजन्सीतून मनीषाताईंनी उभी केली ओळख

कुटुंबाचा गाडा हाकताना सर्व काही सुरळीत सुरू होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत चांगल्या दिवसांची चाहूल सुरू असतानाच पतीला आजारपणानं ग्रासलं...
Manishatai Rao.
Manishatai Rao.esakal

कुटुंबाचा गाडा हाकताना सर्व काही सुरळीत सुरू होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत चांगल्या दिवसांची चाहूल सुरू असतानाच पतीला आजारपणानं ग्रासलं... मात्र, याही परिस्थितीत पतीची सेवा करतानाच आत्मविश्वासाच्या जोरावर पुरुषांची मक्तेदारी असा शिक्का असलेल्या व्यवसायाला उभे करीत त्या कुटुंबाच्या कणा बनल्या... एम.ए., बी.एड.पर्यंतचे शिक्षण झालेले असतानाही शिक्षिका म्हणून नोकरी मिळण्याची आशा धूसर असल्याचे लक्षात आले.

मात्र, याच काळात पतीच्या अकाली जाण्याने कुटुंबाला सावरतानाच सिक्युरिटी गार्डची एजन्सी चालवितानाच आगळ्यावेगळ्या व्यवसायातून स्वतःची ओळख उभी केली ती मालेगाव तालुक्यातील माहेरवाशीण व नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या मनीषाताई राव यांनी..!

शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या मनीषाताई यांचे माहेर मालेगाव तालुक्यातील. घरची परिस्थिती जेमतेम...वडील संतोष निकम यांनी परिस्थितीमुळे शेती व्यवसायाला पुढे नेत असतानाच मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरविले. (Manishatai made an identity from security agency inspirational news)

प्राथमिक शिक्षण नाशिकजवळच्या पळसे येथे झाले. आजोबा रामभाऊ मांडवडे हे पळसे येथील साखर कारखान्यात नोकरीला असल्याने त्यांच्याकडे त्या शिक्षणासाठी होत्या. त्यानंतर मालेगावी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. अभ्यासात हुशार असल्याने मनीषाताईंचे शिक्षण एम.ए., बी.एड.पर्यंत झाले.

आव्हानांचा पाठलाग

नोकरीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे असतानाच मनीषाताई यांचा विवाह तेथील शंकर राव यांच्याशी झाला. पती चांगल्या नोकरीत असताना मनीषाताई यांचीही काहीतरी करण्याची धडपड सुरू होती. मात्र, मार्ग सापडत नव्हता. पतीने दिलेल्या प्रोत्साहनामुळे मनीषाताई यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी सन २००० मध्ये पतीबरोबर थेट पुणे गाठले.

मात्र, तेथेही नोकरीत जम न बसल्याने कुटुंबासह त्या नाशिकला आल्या. याच काळात कुटुंबात मुलगा लावण्य याच्यानिमित्त एका सदस्याची भर पडली. नाशिकमधील वाढत्या औद्योगीकरणाची जाणीव असल्याने पती शंकर राव यांनी थेट नाशिक गाठले. नोकऱ्या बदलण्याच्या धावपळीत आर्थिक ओढाताणही होत होती. मात्र, परिस्थिती नक्कीच बदलेल, या सकारात्मक विचारांवर मनीषाताई पतीच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या.

नाशिकमध्ये २००४ मध्ये भागीदारीतून सिक्युरिटी गार्ड पुरविणारी सेवा सुरू केली. येथूनच राव कुटुंबाला स्थैर्य मिळण्यासाठी हातभार लागला. याच काळात मनीषाताई यांनीही वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेत याच क्षेत्रात करिअर करण्यासाठी निश्चय केला. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानक मनीषाताई यांच्या आयुष्यात उलटफेर सुरू झाला.

Manishatai Rao.
Inspirational News: सोनवणे दांपत्य भागवतात निराधारांची भूक! माणुसकीच्या नात्याने मदतीचा प्रयत्न

पतीच्या आजारपणात उभ्या राहिल्या

सिक्युरिटी गार्ड पुरविणारी एजन्सी सुरू करून कुटुंबाला स्थैर्य प्राप्त होत असतानाच २०१४ मध्ये पती शंकर यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते अंथरुणाला खिळले. याच काळात सिक्युरिटी एजन्सी बंद पडते की काय, अशी शक्यता निर्माण झाली. मनुष्यबळ कमी झाल्याने त्यांनी सिक्युरिटी एजन्सी स्वतःच चालविण्याचा निर्णय घेतला.

याबरोबरच त्यांनी नाशिकमधील एका ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षक म्हणूनही पार्ट टाईम काम सुरू केले. पतीसाठी भक्कमपणे उभ्या राहत असतानाच २०१८ मध्ये पतीने जग सोडले. दुःखातून सावरतानाच त्यांनी मुलगा लावण्य याच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले.

नियतीलाच दिले आव्हान

पतीच्या निधनानंतर उभे राहताना पतीच्या आजारपण काळातील कर्ज डोक्यावर होते. मात्र, मनीषाताई डगमगल्या नाहीत. ड्रायव्हिंग स्कूलची नोकरी सोडतानाच त्यांनी पूर्णवेळ पतीने उभ्या केलेल्या सिक्युरिटी गार्ड एजन्सीत लक्ष देण्यास सुरवात केली.

लावण्य सिक्युरिटी एजन्सी या नावाने फर्मचे नाव बदलतानाच व्यवसायातील अनेक बारकावे ओळखून मनीषाताई यांनी कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर सुमारे ५० कुटुंबांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला. यातून स्वतःला सावरतानाच मुलगा लावण्य याच्या शिक्षणाकडेही विशेष लक्ष पुरविले. पतीच्या निधनाच्या धक्क्यातून सावरतानाच कोविड काळातही आपल्याकडील कामगारांसाठी त्या भक्कमपणे उभ्या राहिल्या.

Manishatai Rao.
Inspirational News : मराठे कुटुंबाची तिसरी पिढी राष्ट्रसेवेसाठी तत्पर! लेफ्टनंट सौरभचे चेन्नईत प्रशिक्षण पूर्ण

महिलांना उभं करायचंय...

एखाद्या कुटुंबातील कमावती व्यक्ती गेल्यावर कुटुंबाची होणारी वाताहत मनीषाताई यांनी अनुभवली असल्याने अशा कुटुंबांना उभे करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. स्वतः चांगल्या वाहन प्रशिक्षक असल्याने महिलांना वाहन चालविण्याचे घरपोच प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला. वाहन चालविण्यासाठी इच्छुक महिलांना त्या-त्या भागात जाऊन मनीषाताईंनी प्रशिक्षण देण्यास सुरवात केली.

यानिमित्त महिलांमधील आत्मविश्वास वाढवितानाच नाशिक शहरात फक्त महिलांसाठी वाहन प्रशिक्षण स्कूल सुरू करण्याकरिता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आयुष्यात आलेल्या आघातांवर मात करताना भाऊ गणेश पवार, प्रवीण सोहोनी, बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे, उद्योजक विजय ठाकरे यांच्यासह जयश्री, किंजल, अरुणा, सुवर्णा, गायत्री या मैत्रिणींनी दिलेला आधार मोलाचा असल्याचे सांगताना मात्र त्यांचे डोळे पाणावले. आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थितीतही संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर नक्कीच मात करता येते, हे मनीषाताई यांनी सुरू केलेल्या सिक्युरिटी गार्ड पुरविण्याच्या एजन्सीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवलंय.

Manishatai Rao.
Inspirational News: सुई-दोरा बनला चांदवडच्या सुनंदाताईंच्या कुटुंबाचा आधार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com