esakal | Marathi Sahitya Sammelan : संमेलन स्‍वागताध्यक्षच निघाले पॉझिटिव्‍ह! साहित्‍यिक अस्‍वस्‍थ;‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका  
sakal

बोलून बातमी शोधा

sahitya logo.jpg

संमेलनाचे स्‍वागताध्यक्ष व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाचे निदान झाल्‍यानंतर साहित्‍यिकांनी धसका घेतला आहे. सद्यःपरिस्थितीमुळे ९४ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनावर कोरोनाच्या सावटामुळे अनिश्‍चिततेचे वातावरण आहे. 

Marathi Sahitya Sammelan : संमेलन स्‍वागताध्यक्षच निघाले पॉझिटिव्‍ह! साहित्‍यिक अस्‍वस्‍थ;‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका  

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : जिल्ह्यासह राज्‍यभरात कोरोनाचा पुन्‍हा प्रादुर्भाव वाढू लागला असून, काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन, संचारबंदीसह कठोर उपाययोजना केल्‍या जात आहेत. त्‍यातच सोमवारी (ता.२२) संमेलनाचे स्‍वागताध्यक्ष व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाचे निदान झाल्‍यानंतर साहित्‍यिकांनी धसका घेतला आहे. सद्यःपरिस्थितीमुळे ९४ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनावर कोरोनाच्या सावटामुळे अनिश्‍चिततेचे वातावरण आहे. 

स्वागताध्यक्ष निघाले पॉझिटिव्‍ह! साहित्‍यिक अस्‍वस्‍थ
कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे नाशिककर मोठी जोखीम घेत असून, कोरोनाच्‍या दबावाखाली संमेलनाचे नियोजन आखणे आव्‍हानात्‍मक असल्‍याचे अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. कौतिकराव ठाले- पाटील यांनी नाशिक दौऱ्यात नमूद केले होते. रविवारी (ता.२१) स्‍वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्‍यासोबत चर्चा करून व पत्रकार परिषदेत सविस्‍तर भूमिका मांडल्‍यानंतर रात्री उशिरा ते परतले होते. त्‍यातच सोमवारी (ता.२२) सकाळी भुजबळ यांनी आपल्‍याला कोरोनाचे निदान झाल्‍याचे जाहीर केले. ही बातमी सर्वत्र पसरताच नाशिकच्‍या सर्वसामान्‍य नागरिकांप्रमाणे राज्‍य व देशभरातील साहित्‍यिकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. अशाच प्रकारे कोरोनाचा फैलाव होत राहिल्‍यास संमेलन होणे अशक्‍य असल्‍याचे बोलले जात आहे. आग्रही भूमिकेतून झालेच, तर अतिशय अल्‍प प्रतिसाद मिळण्याचा अंदाजही वर्तविला जात आहे. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले


नाशिकच नव्‍हे देशभरात हवी नियंत्रित परिस्थिती 
नाशिकमध्ये तुलनेने कोरोनाचा फैलाव मर्यादित आहे. परंतु संमेलनासाठी राज्‍याच्‍या कानाकोपऱ्यातून व देशभरातील विविध भागांतून साहित्‍यिक, रसिक सहभागी होणार आहेत. त्‍यामुळे केवळ नाशिकची परिस्थिती सुधारून चालणार नाही, तर राज्‍य व देशभरातील परिस्‍थिती नियंत्रणात राहिली तरच संमेलनात सर्वांचा सहभाग असेल, असेही बोलले जात आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ


‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका : प्राचार्य ठाले-पाटील 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी काही दिवसांत कोरोनाची स्‍थिती नियंत्रणात येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे आत्ताच घाईत काही निर्णय घेणे योग्‍य ठरणार नाही. सध्या ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घेताना येत्‍या पंधरा दिवसांत परिस्थितीवर बारकाईने निरीक्षण करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ‘सकाळ’शी केलेल्‍या संवादात सांगितले. आमंत्रण व अन्‍य नियोजनाची कामे यापूर्वी ठरल्‍याप्रमाणे सुरू राहतील. मंडप उभारणीवर मोठा खर्च होत असल्‍याने संमेलनाबाबत अंतिम निर्णय घेतल्‍यानंतरच मंडप उभारणीचे काम हाती घेण्याच्‍या सूचना संयोजकांना देणार असल्‍याचे सांगताना, संमेलन पुढे ढकलावे लागू नये, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. ऑनलाइन पद्धतीच्‍या मर्यादा लक्षात घेता, संमेलन ऑनलाइन स्‍वरूपात येणे हा व्‍यवहार्य पर्याय ठरू शकत नसल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले. 

\
संयोजकांची उदासीनता, कार्यालयात मांडले ठाण 
स्‍वागताध्यक्ष भुजबळ यांच्‍यासोबत रविवारी झालेल्‍या बैठकीप्रसंगी महामंडळाच्‍या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजन संस्‍था असलेल्‍या लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारीदेखील उपस्‍थित होते. श्री. भुजबळ यांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आलेला असताना, सावधगिरीचा उपाय म्‍हणून बैठकीस उपस्‍थित पदाधिकाऱ्यांनी गृहविलगीकरणाच्या नियमांचे पालन करणे आवश्‍यक होते, असे असताना संमेलनाचे निमंत्रक असलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये उदासीनता बघायला मिळाली. हे अधिकारी थेट संमेलनाच्‍या मध्यवर्ती कार्यालयात ठाण मांडून बसल्‍याचे आढळून आले. त्‍यातच इतरांना मास्‍कचा आग्रह करताना स्‍वतः मात्र पदाधिकाऱ्यांकडून मास्‍कचा वापर होत नसल्‍याचा धक्‍कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. 

साहित्‍यिक म्‍हणतात... 
कोरोनाची परिस्थिती उद्भवल्यास मार्चमध्ये संमेलन घेणे शक्य होणार नसल्‍याने संमेलन पुढे ढकलावे लागेल. संमेलनाला देशासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून साहित्यिक, रसिकांना यायचे आहे. त्याठिकाणी टाळेबंदीमुळे व्यवस्था कोलमडली, तर साहित्यिक, रसिकांना येणे शक्य होणार नाही, याचाही विचार व्‍हावा. कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन संमेलन पुढे ढकलावे. - प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे 

साहित्य संमेलनाची सर्वांना आनंद, अनुभूती वेगळी असते. कोरोना किती वाढेल, याबाबत आताच सांगणे कठीण असले तरी राज्यातील परिस्थितीच्या आठवडाभराचा अंदाज घेतल्‍यानंतर याबाबत निर्णय घ्यावा. संमेलनात प्रत्येकवेळी उच्चांकी गर्दी असते. त्यामुळे यंदाच्या संमेलनात गर्दी होणे अवघड होईल. -कवी प्रकाश होळकर 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट आहे. असे असले तरी मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र शासन पुढील निर्णय काय घेते, यावर सर्व अवलंबून असेल. - प्रा. डॉ. रावसाहेब कसबे  

loading image