esakal | बाजार समित्यांच्या निवडणुकांचा रंगणार फड! सप्टेंबरअखेरची मतदारयादी ग्राह्य
sakal

बोलून बातमी शोधा

market committee

बाजार समित्यांच्या निवडणुकांचा रंगणार फड! कार्यक्रम जाहीर

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : कोरोनामुळे (coronavirus) बाजार समित्यांची मुदत संपून वर्ष उलटले, तरी निवडणुका झालेल्या नाहीत. काही ठिकाणी मुदतवाढ, तर काही ठिकाणी प्रशासक मंडळ सध्या कामकाज पाहत आहे. मात्र आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने या मुदतवाढीला ब्रेक लावत निवडणुकीचा मुहूर्त निश्चित केला आहे. त्यानुसार सोमवार (ता. ११)पासून मतदार याद्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यातील १० हून अधिक बाजार समित्यांच्या मुदत संपल्याने त्यांच्या निवडणुकीचा फड आता रंगणार आहे.

कार्यक्रम जाहीर; १७ ला मतदान, सप्टेंबरअखेरची मतदारयादी ग्राह्य

मागील वर्षी ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. यातील घोटी व येवला बाजार समितीवर प्रशासक मंडळ नेमले आहे. कृषिमंत्र्यांच्या मालेगाव बाजार समितीची मुदत या वर्षी मार्चमध्ये संपली, आशिया खंडातील प्रसिद्ध लासलगाव बाजार समितीची मुदत मेमध्ये संपली आहे. निवडणुकीनिमित्त पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, आमदार दिलीप बनकर, राहुल आहेर, सुहास कांदे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, नितीन पवार, विजय करंजकर, माणिकराव कोकाटे, अनिल कदम, श्रीराम शेटे, देवीदास पिंगळे, अनिल आहेर, शिवाजी चुंबळे या नेत्यांसह त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या स्थानिक नेत्यांसाठी ही निवडणूक वर्चस्वाचे अस्तित्व ठरविणारी असेल.

हेही वाचा: नाशिकमध्ये साहित्य संमेलन नोव्हेंबर अथवा जानेवारी शक्य

निवडणुका जाहीर कार्यक्रमाप्रमाणे

२३ ऑक्टोबर अथवा त्यापूर्वी मुदत संपलेल्या व या तारखेपूर्वी प्रशासक नियुक्ती झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर कार्यक्रमाप्रमाणे होतील. निवडणुकांसाठी प्रारूप व अंतिम मतदारयाद्या ३० सप्टेंबर या अर्हता दिनांकावर तयार कराण्याच्या सूचना दिल्या आहेत. बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत दिनांक २३ ऑक्टोबरनंतर संपुष्टात येणार आहे, अशा समित्यांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र आदेश निर्गमीत करण्यात येतील.

राजकारणालाही पुन्हा एनर्जी

निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गटविकासाधिकाऱ्यांकडून सदस्य सूची मागविण्याची प्रक्रिया सोमवार (ता. ११) ते शुक्रवार (ता. २२)पर्यंत पूर्ण करायची आहे. प्रारूप मतदारयादी तयार करण्यासाठी सदस्य सूची बाजार समिती सचिवाकडे सोमवारी (ता. २५) सुपूर्द करावी. सचिवाने विहित नमुन्यातील प्रारूप मतदारयादी ३ नोव्हेंबरपर्यंत तयार करावी व सचिवाने विहित नमुन्यातील प्रारूप मतदारयादी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना ८ नोव्हेंबरपर्यंत द्यायची आहे. कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामपंचायत व सोसायटीच्या राजकारणालाही पुन्हा एनर्जी मिळणार आहे.

हेही वाचा: नाशिक : कोटमगावला फक्त ऑनलाईन दर्शन! चारही बाजूचे रस्ते बंद

प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यासंदर्भात लवकरच सूचना निर्गमित होऊ शकतील. पालकमंत्री भुजबळ यांनी आम्हाला मार्चमध्ये प्रशासकीय मंडळाच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली. या काळात आम्ही बाजार समिती व शेतकरीहित जोपासत कामकाज केले. -वसंतराव पवार, मुख्य प्रशासक, बाजार समिती, येवला

अशी संपली बाजार समित्याची मुदत

-नाशिक : १९ ऑगस्ट २०२०

-नांदगाव : १९ ऑगस्ट २०२०

-कळवण : २८ ऑगस्ट २०२०

-येवला : १९ ऑगस्ट २०२०

-चांदवड : १६ ऑगस्ट २०२०

-पिंपळगाव : २ ऑगस्ट २०२०

-सिन्नर : २० ऑगस्ट २०२०

-लासलगाव : मे २०२१

-मालेगाव : मार्च २०२१

असा आहे कार्यक्रम

-पारूप मतदारयादी प्रसिद्ध : १० नोव्हेंबर

-अंतिम मतदारयादी प्रसिद्ध : ६ डिसेंबर

-उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती : १६ ते २२ डिसेंबर

-अर्ज छाननी : २३ डिसेंबर

-माघार : २४ डिसेंबर ते ७ जानेवारी

-मतदान : १७ जानेवारी

-मतमोजणी : १८ जानेवारी

loading image
go to top