
Marriage Season : बाजारपेठांमध्ये ‘लगीन’घाई सेवांचे बुकिंग सुरू! व्यावसायिकांमध्ये उत्साह
पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : आगामी मे आणि जूनपर्यंत लग्नासाठी अंदाजे २० ते २५ मुहूर्त असल्याने जिल्हाभरातील बाजारपेठांमध्ये लगीनघाईचे दिवस सुरू होणार आहेत. त्यामुळे कपड्यांसह सराफा बाजार, इव्हेन्ट मॅनेजमेंट, कॅटरर्सच्या व्यवसायाला पुन्हा झळाळी मिळणार आहे.
त्यादृष्टीने बाजारपेठा सज्ज झाल्या असून, व्यापाऱ्यांना यंदा उन्हाळ्यातील लग्नसराईत चांगला व्यवसाय होईल अशी अपेक्षा आहे. (Marriage Season Booking of marriage services start in markets Enthusiasm among professionals nashik news)
सर्वांनाच लग्न सोहळ्याची उत्सुकता लागलेली आहे. मे आणि जूनमध्ये मर्यादित तारखा असल्याने मंगल कार्यालय, लॉन्स, सभागृह, हॉटेलचे बुकिंग, हळदीचा कार्यक्रम, मेहंदीपासून बँड बाजा, घोड्यांपर्यंतची बुकिंग सुरू झालेली आहे. बॅण्डवाल्यांनी लाखो रुपये खर्च करून नवीन साउंड वाहन, नवे युनिफॉर्म आणि इंस्ट्रूमेंट्स तयार केलेले आहेत.
केटरर्सपासून कपड्यांपर्यंत आणि सराफी बाजारही पुन्हा एकदा चमकण्यासाठी सज्ज झाला आहे. लग्नाच्या सीजनमध्ये कोट्यवधींची उलाढाल होत असते. उन्हाळ्यातील लग्न समारंभाला सुरवात होण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते.
सभागृह, डीजे, बँड, घोडा यांच्यासोबतच पंडितांची चौकशीही केली जात आहे. शहरात लग्न सोहळ्यापेक्षा अनेकजण रिसॉर्ट आणि शहराबाहेरील लॉन्सच्या बुकिंगला पसंती देऊ लागले आहेत.
महागाईतही जोश
दैनंदिन जीवन विस्कळीत करणाऱ्या महागाईचा परिणाम विवाह सोहळ्यावरही होणार आहे. कोरोना काळानंतर किराणा, कपडे, बँड, गॅस, मंडप सजावट, वाहतूक, केटरिंग, लॉन्स-सभागृहांचे भाडे, भाजीपाला यांच्या किमतीत वाढ झाली आहे.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
सध्या महागाईत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असतानाही विवाह सोहळ्यात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून जय्यत तयारी सुरू आहे. ३० एप्रिलनंतर लग्नसराईला सुरवात होणार आहे.
मे आणि जूनमध्ये २० ते २५ मुहूर्त आहेत. त्यानंतर २७ नोव्हेंबरपर्यंत लग्नाचे मुहूर्त नाहीत. त्याचदरम्यान, श्रावण व अधिक महिना आहे. दरम्यान, निफाड तालुक्यात साठपेक्षा जास्त मंगल कार्यालये व लॉन्स असून येत्या दोन महिन्यांत तीनशेहून अधिक विवाह सोहळ्यांचे नियोजन सध्या सुरू आहे.
"कोरोना काळात काहीशी विस्कळीत झालेली लग्न समारंभांची घडी आता पूर्वपदावर येऊ लागली आहे. यंदा लग्नाच्या तारखाही ३० एप्रिलनंतर आहेत. त्यासाठी आतापासून बुकिंगसाठी विचारणा होत आहे. अद्याप हवी तशी हालचाल बाजारात सुरू झालेली नसली, तरी लग्नाच्या सीजनकडून अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. बुकिंगही चांगली होत आहे."
-राजेन्द्र मोरे, पदाधिकारी, मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशन, पिंपळगाव बसवंत.
"उन्हाळ्यात लग्नसराईसाठी बाजारात गर्दी वाढू लागली आहे. त्यासाठी शेरवानी, नवाबी, कुर्ता, रेडिमेड सुटस आणि कपड्यांची पूर्ण नवीन श्रेणी विक्रीसाठी आणलेली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात चांगली खरेदी होईल."-सुरेश धाडीवाल, संचालक, महेश गारमेंटस
"लग्न सराईसाठी बाजारपेठ सज्ज झालेली आहे. ग्राहकांकडून खरेदी हळूहळू सुरू असली, तरी येत्या महिन्यात वर्दळ वाढणार आहे. त्यातून कोट्यवधींची उलाढाल अपेक्षित आहे.'
-मनोज मुथा, संचालक, छाया ज्वेलर्स.