Language Learning: ...अन् मराठी शाळांमधील विद्यार्थी बोलू लागले मूळभाषेसह आंतरराष्ट्रीय भाषा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Language Learning: ...अन् मराठी शाळांमधील विद्यार्थी बोलू लागले मूळभाषेसह आंतरराष्ट्रीय भाषा!

Language Learning: ...अन् मराठी शाळांमधील विद्यार्थी बोलू लागले मूळभाषेसह आंतरराष्ट्रीय भाषा!

खामखेडा (जि. नाशिक) : विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी, यासाठी नवनवीन उपक्रमाच्या माध्यमातून शालेय स्तरावर प्रयत्न सुरू असतात. विद्यार्थ्यांना अधिकचे ज्ञान मिळावे, यासाठी काही शाळांनी नावीन्यपूर्ण उपक्रम अवलंबविल्याचे आपण पाहिले असेल.

नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांतील दोनशेहून अधिक विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या मदतीने जर्मन भाषेचे धडे गिरवत आहेत. मराठी शाळांमधील विद्यार्थी मूळभाषेसह आता आंतरराष्ट्रीय भाषा बोलू लागले आहेत.

जर्मन येथे वास्तव्यास असणारे केदार जाधव हे मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना मोफत जर्मन भाषा शिकवतात. याबाबत जिल्ह्यातील या शाळांमधील शिक्षकांना माहिती मिळाली. तेव्हा या शाळांमधील शिक्षकांनी जाधव यांच्याशी संपर्क साधला. आठवड्यातील मंगळवार आणि गुरुवार असे दोन दिवस सकाळी साडेदहा ते बारा ऑनलाइन वर्ग चालवितात.

जिल्ह्यातील विविध शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांना जर्मनचे धडे

सध्या प्राथमिक स्तरावर जिल्हा परिषद शाळा नवे रातीर, (ता. बागलाण), खालप फाटा, फांगदर (ता. देवळा), जिजामाता कन्या विद्यालय देवळा, डे केअर सेंटर नाशिक व मनपा शाळा क्र. १८ आनंदवली (नाशिक), या सर्व शाळांचे दोनशेहून अधिक विद्यार्थी जर्मन भाषा शिकत आहेत.

कोण आहेत केदार जाधव?

विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवणारे केदार जाधव हे महाराष्ट्रातले आहेत. मात्र व्यवसायाच्या निमित्ताने सध्या ते जर्मनीत वास्तव्यास आहेत. त्यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलांना शिकविण्याची आवड असून आत्तापर्यंत एक लाखांपर्यंत मुलांना त्यांनी जर्मन भाषेचे धडे दिले आहेत. आता विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये जर्मन भाषा शिकविण्याचे मोफत काम ते करत आहेत.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

"विद्यार्थ्यांमधील भाषिक व तार्किक बुद्धिमत्तामुळे स्वयंअध्ययनाद्वारे नवनवीन भाषेचे धडे गिरवीत आहेत. या विद्यार्थ्यांना भाषेच्या अभ्यासामुळे भविष्यात परकीय देशात नोकरीच्या संधीदेखील उपलब्ध होऊ शकतात."

- मेघा जगताप, शिक्षिका डे केअर शाळा नाशिक

"जर्मन भाषा शिकण्यासाठी विद्यार्थी आवडीने सहभाग घेतात. आपला परिचय जर्मन भाषेत सहज करून देतात. भाषेमुळे त्या भाषेतील संस्कृती, शब्दसंग्रह वाढून ज्ञानात प्रचंड भर पडणार आहे." - तुळशीराम ठाकरे, शिक्षक, नवे रातीर

"भाषा शिकविण्याचा पहिला टप्पा मार्चअखेरीस पूर्ण होणार आहे. एकूण पाच टप्पे पूर्ण केल्यानंतर जर्मन भाषा प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. प्रत्येक टप्पा झाल्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षादेखील घेतली जात आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे."

-केदार जाधव, जर्मनी