आठवणीतील अयोध्या : जेव्हा मंदिराच्या गर्भगृहापर्यंत मारली होती धडक..वाचा एक अनुभव

ram mandir ayodhya 1.jpg
ram mandir ayodhya 1.jpg

नाशिक : अयोध्या आणि नाशिकचे नाते अतूट आहे. राममंदिराच्या वातावरणनिर्मितीसाठी लालकृष्ण अडवानींची रथयात्रा असो की त्यानंतर अयोध्येत झालेला गोळीबार आणि नंतर वादग्रस्त वास्तूचा ढाचा पाडण्याच्या घटनेत नाशिककरांचा सहभाग मोठा होता. १९९० आणि ९२ च्‍या घटनेत हिरिरीने भाग घेत मंदिराच्या गर्भगृहापर्यंत धडक मारली होती. पोलिसांच्या लाठीमार आणि गोळीबाराला न जुमानता आम्ही आणि देशभरातील लाखो कारसेवकांनी राममंदिर होण्यासाठी कष्ट उपसल्‍याने राममंदिराचे पुनर्निर्माण होत आहे.

अडवानी यांच्याशी समन्वय साधण्याची जबाबदारी 

१९९० मध्ये रथयात्रा नाशिकमध्ये आल्‍यावर अडवानी यांच्याशी समन्वय साधण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्‍हा रथाचे सारथ्य करीत होते. भाजपचे एक ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन हेही नाशिकमध्ये आले होते. काळाराम मंदिराचा पूर्व दरवाजा, भालेकर हायस्कूल मैदानावर अडवानींच्या सभा झाल्या. अडवानींना बिहारमध्ये अटक झाल्यानंतर आता कारसेवा व राममंदिराचे काय होणार, हा प्रश्‍न निर्माण झाला होता. परंतु कारसेवकांनी गनिमी काव्याने अयोध्येकडे कूच सुरू ठेवले होते. नाशिकच्या कारसेवकांचाही दांडगा सहभाग होता. तत्कालीन खासदार डॉ. दौलतराव आहेर, आमदार गणपतराव काठे, अण्णासाहेब डांगे, शहराध्यक्ष बंडोपंत जोशी, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निशिगंधा मोगल, राजाभाऊ मोगल, अरुण शेंदुर्णीकर, शैलेंद्र जुन्नरे, कृष्णराव नेरे, राहुल निरभवणे, राजाभाऊ घटमाळे, मंगला सवदीकर, शहनाज सय्यद, पुष्पा शर्मा, उत्तम उगले यांच्यासह नावांची ही यादी खूप मोठी आहे.

मी गर्भगृहापर्यंत मजल मारली होती

उत्तर प्रदेशातील तत्कालीन मुलायमसिंह सरकारने जागोजागी नाकाबंदी केली होती. पुलांवर विजेचा प्रवाहही सोडला होता. तरीही त्याला न जुमानता कारसेवकांनी अयोध्येपर्यंत कूच चालू ठेवले होते. नाशिकच्या लोकांना बिना येथे अडविण्यात आले. तरीही तेथून काही लोकांनी पलायन करून अयोध्या गाठली. मी गर्भगृहापर्यंत मजल मारली होती. लोक एकमेकांच्या अंगावर पडत होते, परंतु श्रीरामाचा जयघोष मात्र सुरूच होता. पळापळीत आणि धक्काबुक्कीत ठिकठिकाणी मला खरचटले. त्या वेळी जोश इतका होता, की आम्हाला त्याचे काही वाटत नव्हते. आमच्यासमोर गोळीबारात अनेक जण मृत्युमुखी पडले, तर काही लाठीमारात जायबंदी झाले. नंतर १९९२ मध्ये अयोध्येत पुन्हा राममंदिरासाठी हाक देण्यात आली. त्या वेळीसुद्धा नाशिकमधून शेकडो कारसेवक अयोध्येकडे रवाना झाले होते. वास्तू ढासळली तेव्हा कारसेवकांनी एकच जल्लोष करून रामनामाचा जयघोष सुरू केला होता. आमच्यासाठी हा अत्यंत सर्वोच्च क्षण होता. आम्हाला अटक झाली होती. राममंदिरासाठी आम्ही खारीचा वाटा उचलला याचा आजही आम्हाला अभिमान वाटतो. -सतीश शुक्ल, अध्यक्ष, पुरोहित संघ, नाशिक 

रिपोर्ट - महेंद्र महाजन

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com