
Ashish Shelar : महाविकास आघाडीचे सरकार ‘लिव्ह रिलेशनशिप’चे : आशिष शेलार
नाशिक : अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार ‘लिव्ह रिलेशनशिप’मध्ये राहिले. मात्र आता मतदारांच्या मनातील सरकार राज्यात स्थापन झाले असून,
या सरकारने सात महिन्यांतच विस्कटलेली घडी पूर्ववत करताना राज्याला (State) विकासाच्या मार्गावर नेले. (MLA Ashish Shelar statement about mahavikas aghadi government nashik news)
त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये विकासाच्या मुद्द्यावर मतदारांसमोर जाताना महाविकास आघाडीने अडवलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोचविण्याचे आवाहन ठरावाच्या माध्यमातून केले, अशी माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत शिंदे व फडणवीस सरकारचा अभिनंदनाचा राजकीय ठराव वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. आमदार आशिष शेलार, महामंत्री पंकजा मुंडे यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते, त्या वेळी पेट्रोल व डिझेलवरील दर कमी केले नाही.
केंद्र सरकारने सूचना देऊ नये, इतर राज्यांनी कर कमी केल्याने तेथे महागाई वाढली. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दर कमी न केल्याने महाराष्ट्रात महागाई वाढली. मात्र शिंदे व फडणवीस सरकार आल्यानंतर पेट्रोल पाच रुपयांनी, तर डिझेल तीन रुपये प्रतिलिटरने कमी केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबईत ३०० किलोमीटरहून अधिक जास्त मेट्रोचे जाळे तयार केले.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
मात्र अहंकारापोटी मेट्रो कार शेडला परवानगी नाकारली, त्याचा दहा हजार कोटींचा दंड महाराष्ट्रातील जनतेला सोसावा लागत आहे. अहंकारापोटी घेतलेला हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने रद्द करून मेट्रोचा मार्ग मोकळा केला.
अवघ्या सात महिन्यांत सव्वा लाखाहून अधिक रायडरशिप वाढल्याने उपनगरी रेल्वेवरचा ताण कमी झाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने दोन मोठे चुकीचे निर्णय घेतले.
त्यात मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण देणे व ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणाचा लाभ मिळवून दिला नाही. मात्र शिंदे व फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमून कायदेशीर मार्ग काढण्याचा निर्णय घेतला.
ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी कायदे तज्ज्ञांची टीम उभी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाबोसमध्ये एक लाख ३४ हजार कोटींचे करार केले. यातून राज्याची आश्वासक प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
गरिबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने योजना लागू केल्या. मात्र महाविकास आघाडीच्या स्थगिती सरकारने त्या लागू करू दिल्या नाहीत. मुंबईत फेरीवाल्यांच्या अकाउंटवर एक लाख रुपये जमा झाले, तर शेतकऱ्यांनाही त्यांच्या बँक खात्यात थेट पन्नास हजारांची मदत पोहोचण्यात आल्याचे अभिनंदन ठरावात म्हटले आहे.
राजकीय वादात उद्धव ठाकरे टार्गेट
शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली आहे. ‘राष्ट्रवादी’सह तत्कालीन महाविकास आघाडी विचारांपासून दूर गेली आहे. राजकारणाशिवाय या सरकारने काहीच केले नाही. मतदारांनी दिलेल्या आशीर्वादाशी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली आहे. आज मात्र बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पक्ष हे आमचे सरकार असल्याची भावना मतदाराच्या मनात निर्माण झाल्याचा दावा आमदार शेलार यांनी केला.