
Nashik : मूकबधिर दांपत्यांची लढाई जिंकूनही हरलेलीच
नाशिक : मूकबधिर (Mute Deaf) दांपत्य असूनही जगण्याच्या लढाईत दोन हात करताना अपार मेहनत व कष्टाच्या जोरावर छोटेखानी व्यवसाय (Business) करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू पाहतात. जत्रा हॉटेल चौकात जागेची अडचण कशीबशी सोडवून आपला उदरनिर्वाह चालू असतो. परंतु, या चौकात निमित्तमात्र झालेला काही समाजकंटकांचा धुडगुस व हाणामारी यामुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. आता उपासमार व मुलगा अंकुशच्या शैक्षणिक भविष्याचे काय, असा प्रश्न आता किशोर कडेकर यांना पडला आहे. (Mute deaf Kadekar couple facing problems time to shut business Nashik News)
किशोर कडेकर मूळचे नाशिकचे. पत्नी मनीषा व मुलगा अंकुश, असे त्यांचे कुटुंब. किशोर व पत्नी मनिषा दोघेही मूकबधिर. दोन वर्षांपूर्वी किशोर मुंबई येथे मतिमंद मुलांना शिकवीत होते. मात्र, लॉकडाउनमुळे त्यांची नोकरी गेली व ते पुन्हा नाशिकला परतले. उत्पन्नाच्या विवंचनेत त्यांनी जत्रा हॉटेल चौकात साध्या पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला. मूकबधिर असल्याने ग्राहकांशी संवाद साधण्यात अडचण येऊ लागली. म्हणणे ग्राहकांना कसे सांगायचे, असा प्रश्न या दांपत्याला पडला. मात्र, तेव्हा त्यांनी बोटे दाखवून किंवा दोन बोटे दाखवून पाणीपुरीची किंमत २० रुपये आहे, असा संवादाचा प्रयत्न केला. उत्तम सेवा व पाणीपुरीच्या उत्तम दर्जामुळे ग्राहकांचा प्रतिसाद मिळत गेला. ग्राहकांचा प्रतिसाद बघून आई, भाऊ, बहीण व इतर आप्तेष्टांनी व्यवसाय तुम्ही करू शकता व तो कराच, असे प्रोत्साहन दिले.
यामुळे प्रेरणा मिळाली. दरम्यानच्या काळात पाणीपुरीसाठी चांगली गाडीही घेतली. त्यामुळे अजून खाद्यपदार्थ वाढविले. किमतीचे स्टिकर गाडीवर चिटकविले. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमती सांगण्याची अडचणी दूर झाली आणि ग्राहकांचाही प्रतिसाद वाढला. जेथे गाडा लावला जातो, त्या ठिकाणी अन्य विक्रेतेही खाद्यपदार्थांच्या गाड्या लावतात व व्यवसाय करतात. मात्र, ते ठिकाण अतिक्रमित असल्याचे बऱ्याचदा अधिकारी सांगून जातात. मात्र, मानवतावादी दृष्टिकोनातून बरेच व्यावसायिक गाड्या लावून उदरनिर्वाह करतात.
दरम्यानच्या काळात काही समाजकंटकांच्या वादामुळे या ठिकाणाला गालबोट लागले व तेथे व्यवसाय करण्यास सर्वांनाच मनाई करण्यात आली. आता मिळेल त्या ठिकाणी गाडी लावून चरितार्थ चालविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक अडचणी व अनेक आवाहनाला सामोरे दांपत्य स्थिरस्थावर होऊ पाहत आहोत, पण समाजकंटकांच्या वादामुळे त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे.
उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट
मूकबधिर दांपत्य असल्यामुळे त्यांना उत्पन्नाचा दुसरा मार्ग नाही. यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यांना अंकुश नावाचा मुलगा आहे. तो आडगाव शिवारातील सेंट पीटर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकतो. त्याने आता दहावीची परीक्षा दिली आहे. पुढील शिक्षणासाठी व अंकुशच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी दानशूरांनी पुढे यावे, असेही ते दांपत्य सांगतात. उत्पन्नाचा मार्ग थांबल्यामुळे आता जगण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.
"दिव्यांगत्वाचा विचार करून शासनाने किंवा महापालिकेने व्यवसायासाठी निश्चित व कायमस्वरूपी जागा द्यावी. जेणेकरून व्यवसायास स्थिरावण्यास मदत होईल. तसेच, मुलगा अंकुशच्या शैक्षणिक जबाबदारीसाठी दानशूरांनी पुढे यावे."
- किशोर आणि मनीषा कडेकर, मूकबधिर दांपत्य