ऐन महागाईत मटण-राइस प्लेट चक्क अडीच रुपये; राइस दीड रुपया!

mutton plate
mutton plateesakal

येवला (जि.नाशिक) : मटण प्लेट (mutton plate) २ रुपये ५० पैसे, राईस प्लेटही (rice plate) दोन रुपये ५० पैसे, तर फुल राइस एक रुपया ४०, साधी भाजी ८० पैसे अन्‌ चपाती तर फक्त ३० पैसे. भोजनालयातील हे दर आजच्या महागाईच्या जमान्यात अप्रूप वाटणारेच, हे जेवणाचे दर गगनाला भिडलेल्या महागाईची प्रचीती देत आहेत. नेमकी भानगड काय?

महागाईच्या जमान्यात भावफलक चर्चेत

येवला येथील बालेश्वरी भोजनालयाचा १९८४ मधील लावलेला हा फलक सचिन बाकळे हॉटेलमध्ये जेवायला जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. ३७ वर्षांपूर्वी किती स्वस्ताई होती. हे या फलकातून सहजपणे कळते. त्या वेळी हॉटेलमध्ये जेवणाची क्रेज नसली, तरी येथे प्रसिद्ध असलेल्या सावजी मटणाच्या खानावळी होत्या. आजही येथील सावजी मटण प्रसिद्ध असून, शहरात १५ ते २० ठिकाणी सावजी पद्धतीच्या मटणाच्या छोट्या हॉटेल सुरू आहेत. विशेष म्हणजे खव्वयांकडून आजही या मटणाला तेवढीच पसंतीही मिळते. शहरातील मध्यवर्ती असलेल्या पटेल मशिदीसमोर आज सचिन बाकळे यांचे मटणाचे छोटेखानी हॉटेल असून, या ठिकाणी लावलेला हा फलक जाणाऱ्यांचे प्रथम लक्ष वेधून घेतो. त्यांचे वडील त्र्यंबक बाकळे १९८४ मध्ये ‘बालेश्वरी भोजनालय’ चालवत होते. यात साधे मटण अडीच रुपये, तर स्पेशल मटण अवघे साडेतीन रुपयाला मिळत होते. मटण फ्रायसाठी त्यावेळी चार रुपये लागत. आज हाच दर दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत पोचला आहे. आज ५० रुपयांहून अधिक दराने मिळणारे ऑम्लेट त्या वेळी सव्वा व अडीच रुपयाला खवय्यांच्या जिभेची चव भागवायचे. आज साध्या किंवा मोठ्या हॉटेलात गेले, तरी ८० ते १२० रुपयांच्या खाली एकही भाजी मिळत नाही. मात्र, या भोजनालयात त्या वेळी ८० पैशाला भाजी मिळायची. हाफ भात आज ४० ते ८० रुपयाला मिळतो. तो तेव्हा फक्त ७० पैशाला मिळत. आज शंभर रुपयांच्या आसपास राइस प्लेट मिळते. तीच अडीच रुपयाला मिळत असल्याचे या फलकावरून दिसते.

mutton plate
हाय रिस्क 'ओमिक्रॉन' देऊ शकतो RT-PCR टेस्टलाही चकवा!

एकेकाळी इतकी स्वस्ताई होती...

आज मटणाचे एक किलोचे दर ६४० रुपये असून, चिकन १५० ते ३०० रुपयांच्या दराने मिळते. भाजीपाल्याची हीच गत असून, बाजारात कुठलाही भाजीपाला १० ते २० रुपये पावशेर दरानेच मिळतो. एखाद्या कुटुंबाला आठवड्याचा भाजीपाला घ्यायचा असेल, तर त्यासाठी किमान पाचशेची नोट खर्च करावी लागते, इतकी महागाई आज गगनाला भिडली आहे. महिनाभर पुरणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी हजार रुपये मोजावे लागतात. अशा महागाईच्या जमान्यात एकेकाळी इतकी स्वस्ताई होती, यावर विश्वास बसत नसला तरी हा फलक मात्र त्याची साक्ष देतो.

'तो' भावफलक आजही जपून

आज आम्ही सावजी मटण व चिकनची हॉटेल चालवतो. आमच्या वडिलांची बालेश्वरी नावाची हॉटेल होती. १९८४ मध्ये त्यांनी बनविलेला हॉटेलमधील भाज्यांचा भावफलक आजही आम्ही जपून ठेवला असून, हॉटेलमध्ये लावला आहे. त्याकाळचे दर व आजच्या दरात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे हा फलक पाहणाऱ्याला प्रथम हसू येते आणि तेव्हाच्या व आजच्या दरात तफावतीचे अप्रूप वाटते. -सचिन बाकळे, बाकळे सावजी मटण, येवला

mutton plate
Omicron वर बायोएनटेक आणणार प्रभावी लस! दिलासादायक बातमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com