नामपूरला कांद्याची विक्रमी आवक; 7 महिन्यात सव्वादोनशे कोटींची उलाढाल

Nampur Market Committee had a turnover of 225 crore in the onion market
Nampur Market Committee had a turnover of 225 crore in the onion marketSakal

नामपूर (जि. नाशिक) : येथील बाजार समितीत कांदा, डाळिंब, भुसारमाल असे विविध शेतमालाचे लिलाव होत असले तरी कांद्याच्या विक्रमी आवकेमुळे बाजार समिती मालामाल झाली आहे. येथील बाजार समितीच्या आवारात कांद्याला किफायतशीर भाव व लिलावानंतर रोख रक्कम मिळत असल्याने गेल्या सात महिन्यात कांद्याची सुमारे १५ लाख क्विंटल आवक झाली आहे. उन्हाळ कांद्याच्या विक्रीतून सुमारे सव्वादोनशे कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल झाल्याने शेतकरी समाधानी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कांद्याच्या लिलावातून बाजार समितीला सात महिन्यात सुमारे सव्वादो कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

जिल्ह्यातील अग्रगण्य बाजार समिती म्हणून नावारूपास आलेल्या नामपूर बाजार समितीने कांदा लिलावानंतर रोख पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांचे हित साधले गेले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाची अर्थवाहिनी म्हणून नामपूर बाजार समितीने आपली ओळख निर्माण केली आहे. लिलाव प्रक्रियेत शेतमालाला योग्य भाव मिळून शेतकऱ्यांचे हित जोपासले जावे, असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बाजार समिती प्रशासनाची विकासाकडे वाटचाल सुरु आहे.

१९७५ पासून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येथे उपबाजार आवार कार्यान्वित होते. त्यानंतर २००० पासून येथील उपबाजार आवारात धान्य व भुसार मालाचा लिलाव, कांदा खरेदी केंद्र, डाळिंब लिलाव मार्केट आदी सेवा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हित जोपासून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बाजार समितीला मिळू लागले. नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाच्या शेतकरी हिताच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लासलगाव, पिंपळगाव बाजार समित्यांच्या धर्तीवर रोखीने लिलावाची रक्कम मिळत आहे.

मोसम खोऱ्यासह साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे प्रमुख नगदी पीक आहे. कांद्याच्या दरात दरवर्षी चढउतार होत असले तरी शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळ, पावसाळी, रांगडा ( लेट खरीप ) अशा कांद्याची लागवड करत असतात. गेल्या तीन वर्षापासून सातत्याने कांदा दराने झळ खाणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदाही विक्रमी उन्हाळ कांदा लागवड करून सुरवातीला काही माल विकून सुमारे ६० टक्के माल चाळीमध्ये साठविला होता. मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्तम प्रकारे उत्पादन घेतले आहे. यंदा सर्वत्र शेतकऱ्यांना कांद्याचे उत्पादन चांगले आल्याने अनेक शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला होता. कांदा लावणीपासून ते कांदा चाळीभरेपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्चाला शेतकऱ्यांना सामारे जावे लागते. मात्र, गेल्या तीन वर्षापासून कांद्याचे भाव उतरल्याने शेतकऱ्यांना खर्च निघणे अवघड झाले होते. परंतु, यंदा अनेक महिने कांद्याचे दर स्थिर राहिल्याने शेतकरी सुखावला आहे.

Nampur Market Committee had a turnover of 225 crore in the onion market
नाशिक : साहित्य संमेलनासाठी महापालिकेचा २५ लाखांचा निधी

येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात लिलावाप्रसंगी पावसाळ्यात शेतकऱ्यांचे होणारे हाल लक्षात घेता सुमारे तीन कोटी रुपयांच्या विनियोगातून दर्जेदार पद्धतीने पेवर ब्लॉक बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यातील लिलावासाठी भव्य पत्र्याचे शेडची उभारणी, शेतकऱ्यांसाठी ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावार रासायनिक खते विक्री केंद्र सुरु करणे, शेतकऱ्यांना अल्प दरात राहण्याची व भोजनाची व्यवस्था करणे, करंजाड उपबाजार आवारात शेतकऱ्यांना सुविधा देणे आदी कामांना प्राधान्य देण्यात येईल.
- शांताराम निकम, सभापती, नामपूर बाजार समिती

मोसम खोऱ्यात शेतकऱ्‍यांनी उन्हाळ कांदा लागवडीसाठी एकरी ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत खर्च केला. कांद्याचे उत्पादन पदरात पडेपर्यंत क्विंटलला सरासरी एक हजार ५०० रुपये खर्च झाला. यंदाच्या रोगट हवामान, केंद्र सरकारचे निर्यातविरोधी धोरण, कांदा बियाण्यात खासगी कंपन्यांकडून झालेली लूट यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्याचे बाजारभाव बघता उत्पादन खर्चही भागणार नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. शासनाने तत्काळ उत्पादन खर्चावर आधारित बाजारभावाचे नियोजन करावे.
- अभिमन पगार, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, कांदा उत्पादक शेतकरी संघटना

Nampur Market Committee had a turnover of 225 crore in the onion market
नाशिक : सासरच्या जाचाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या

सात महिन्यातील कांद्याची आवक व किंमत अशी
महिना आवक (क्विंटलमध्ये) उलाढाल
- एप्रिल : २ लाख ३२ हजार २५० १७ कोटी ७६ लाख ६८ हजार ८५०
- मे : २ लाख १ हजार ७७३ २० कोटी ३९ लाख ९९ हजार ४१५
- जून : २ लाख ७४ हजार ८३८ ४१ कोटी १९ लाख ८६ हजार ०३४
- जुलै : २ लाख ५१ हजार १५५ ३८ कोटी २९ लाख ७४ हजार १८१
- ऑगस्ट : २ लाख ३६ हजार ९७२ ३४ कोटी ०४ लाख १७ हजार ३६७
- सप्टेंबर : २ लाख ३९ हजार ४८४ ३३ कोटी ४५ लाख ८८ हजार ०५०
- ऑक्टोबर : १ लाख ६० हजार ८४० ४० कोटी २१ लाख रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com