esakal | नाशिक विभाग अजूनही सर्वदूर पावसाच्या प्रतीक्षेत! नाशिक, नगर, जळगाव, धुळ्यात टँकर सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

nashik rain

नाशिक विभाग अजूनही सर्वदूर पावसाच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : मॉन्सून सक्रिय होऊन कोकण, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागात गेल्या वर्षीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र नाशिक विभाग अद्याप सर्वदूर पावसाच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या वर्षीपेक्षा ३१ टक्के कमी पाऊस झाला आहे. परिणामी, राज्यातील एकूण ८४ टँकरपैकी सर्वाधिक ५५ टँकर नाशिक विभागात सुरू आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील ३६ गावे आणि २२ वाड्यांसाठीच्या २६, नगरमधील २४ गावे व ६२ वाड्यांसाठीच्या १९ टँकरसह जळगावमधील आठ आणि धुळ्यातील दोन टँकरचा समावेश आहे. (Nashik-division-still-Waiting-for-rain-everywhere-marathi-news-jpd93)

गेल्या वर्षीपेक्षा ३१ टक्के कमी पाऊस; नाशिक, नगर, जळगाव, धुळ्यात टँकर सुरू

गेल्या वर्षी राज्यात जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत १०४ टक्के पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत १२०.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये कोकण विभागातील १३७, पुणेमधील ८५.९, औरंगाबादमधील १५२.७, अमरावतीमधील ११६.८, तर नागपूरमधील ९६.२ टक्के पावसाचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात पाच, बुलडाण्यात १८, यवतमाळमध्ये सहा टँकर पिण्याचे पाणीपुरवठा करत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत नगरमधील एक टँकर बंद झाला असला, तरीही धुळ्यातील दोन टँकर वाढले आहेत. पुणे जिल्ह्यात एक टँकर वाढवावा लागला. मात्र बुलडाणामधील तीन टँकर बंद करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यातील २६ गावे आणि ९९ वाड्यांसाठी ३५ टँकर सुरू होते.

आदिवासी भागातील पावसात सातत्य

पावसाचा जोर सोमवारच्या (ता. १९) तुलनेत आज कमी झाला असला, तरीही नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात पावसाने आजही हजेरीमध्ये सातत्य राखले आहे. आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासात कळवणमध्ये १९.४, सुरगाण्यात ४२, दिंडोरीत २९.३, इगतपुरीमध्ये ३५.९, पेठमध्ये ६३, त्र्यंबकेश्‍वरमध्ये ५४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मालेगावमध्ये १.७, बागलाणमध्ये २.७, नांदगावमध्ये १३, नाशिकमध्ये सहा, निफाडमध्ये ४.५, सिन्नरमध्ये ४.१, येवल्यात ४.७, चांदवडमध्ये १२.२, देवळ्यात ८.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ही जरी स्थिती एकीकडे असली, तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात अजूनही २३ टक्के कमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी २० जुलैला ८८.४ टक्के पाऊस झाला होता. आतापर्यंत ६५.४ टक्के पाऊस झाला आहे. पावसात सातत्य नसल्याने भूजलाची पातळी वाढण्यापासून ते धरणांमधील जलसाठ्यात भर पडलेली नाही. अजूनही जिल्ह्यात खरिपाच्या ५० टक्के पेरण्या बाकी आहेत. दरम्यान, नाशिक विभागातील आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून, (कंसात गेल्या वर्षीच्या पावसाची टक्केवारी दर्शवते) ः धुळे- ७७.७ (१२६.१), नंदुरबार- ३०.५ (४९.८), जळगाव- ९३.७ (१५४.८), नगर- १४२.५ (१७०).

हेही वाचा: कुल्फी विकणारा बनला पैठणी उद्योजक! जामदारीची पैठणी चेन्नईला

नाशिक जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी

तालुका आताचा पाऊस

मालेगाव १२१.७

बागलाण ९७.८

कळवण ७६.७

नांदगाव १८६.३

सुरगाणा ३१.७

नाशिक ४५.८

दिंडोरी ६६.२

इगतपुरी ४२.६

पेठ ४९.८

निफाड ११२.१

सिन्नर ८५.५

येवला १२१.१

चांदवड ११२.६

त्र्यंबकेश्‍वर ५३.१

देवळा १४०.७

हेही वाचा: डाळींचे चढे भाव कोरोनाकाळात टिकून! व्यापाऱ्यांची नाराजी

loading image