esakal | स्मार्ट प्रकल्प नको, नाशिककरांना हवाय ऑक्सिजन

बोलून बातमी शोधा

nashik
स्मार्ट प्रकल्प नको, नाशिककरांना हवाय ऑक्सिजन
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन सामाजिक सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला असताना, महापालिकेचा स्मार्टसिटी कंपनीकडे विनावापर पडून असलेल्या निधीचा विनियोग ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी करावा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा: नवजात चिमुरडा बनला कोरोना योध्दा! स्कोर १२ असूनही यशस्वी मात

स्मार्टसिटी कंपनीच्या निधीतून प्लांट उभारण्याची बोरस्ते यांची मागणी

नाशिक आयटी असोसिएशन, भारत विकास परिषद आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेने स्वयंस्फूर्तीने ४५ लाख रुपयांचा निधी उभारून महापालिकेच्या बिटको व डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयासाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेनेही या दृष्टीने रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजन प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी निधीची अडचण येत असेल, तर महापालिकेचा स्मार्टसिटी कंपनीकडे करोडो रुपयांचा निधी पडून आहे. स्मार्टसिटी कंपनीमार्फत करोडो रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी मुळात अशा प्रकल्पांची पुढील काळात गरज नाही. त्यामुळे स्मार्टसिटी कंपनीचा विनावापर पडून असलेला निधी व ज्या प्रोजेक्टची सध्या नाशिकला गरज नाही, अशा प्रकल्पांसाठी राखीव असलेला निधी ऑक्सिजननिर्मितीसाठी वापरावा. त्यातून अनेक रुग्णालयांना ऑक्सिजन उपलब्ध होऊन रुग्णांचे प्राण वाचतील. नाशिककरांना स्मार्ट सिटी नको, तर केवळ जीव जगविणारा ऑक्सिजन हवा आहे. ऑक्सिजन देऊन नाशिककरांना जगवावे, असे बोरस्ते यांनी निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा: मरायचे असेल तर अकराच्या आत! शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर

ऑक्सिजन प्लांटसाठी सेवाभावी संस्था पुढाकार घेत असताना महापालिकेने स्मार्टसिटी कंपनीकडे पडून असलेल्या निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारला पाहिजे. स्मार्ट प्रकल्पांची सध्या आवश्‍यकता नाही.-अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, महापालिका