Rajaram Pangavhane
Rajaram Pangavhaneesakal

दृष्टिकोन : खासगी वाहने, मर्यादित रस्ते अन् वाढणारी वाहतूक कोंडी

Marathi Article : सध्याच्या वाढत्या शहरीकरण व औद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

लेखक : राजाराम पानगव्हाणे

जगभरात खासगी वाहनांवर नियंत्रणे आणून सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे, याची कारणे खासगी वाहने वाढल्याने होणारे अपघात, वाहतुकीची कोंडी, या कोंडीत जाणारा बहुमूल्य वेळ आणि महत्त्वाचे म्हणजे यामुळे देशाच्या प्रगती आणि एकूण उत्पादकतेवर होणारा परिणाम.

आपल्याकडेही काही दिवसांपासून हा प्रश्न उग्र रूप धारण करत आहे, याचे कारणही रस्त्यांचे मर्यादित जाळे आणि त्या तुलनेत वाढलेली खासगी वाहने. हे प्रमाण कुठेतरी निश्चित करून सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याची गरज आहे. धोरणकर्त्यांनी त्यासाठी आतापासूनच पावले उचलायला हवीत. (Nashik saptarang latest marathi article by rajaram pangavhane marathi news)

नाशिक शहरातील वाहतूक कोडींची समस्या
नाशिक शहरातील वाहतूक कोडींची समस्या esakal

सध्याच्या वाढत्या शहरीकरण व औद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. वाहतूक कोडींची समस्या सोडविण्यासाठी अनेक पातळ्यांवर उपक्रम राबवले जातात. पण या समस्येचे मूळ कारण शोधणे आवश्यक आहे. देशातील असे एकही शहर नसेल, की तिथे वाहतूक कोंडी (ट्रॅफिक जाम)ची समस्या नाही. दिवसेंदिवस तिचं स्वरूप उग्र होत आहे. अगदी काही काळापूर्वी ‘ट्रॅफिक जाम’ हा शब्द विशिष्ट सण-समारंभ, मंत्रिमहोदयांचे मोर्चे-दौरे, असेल तरच जाणवत होता. मात्र आत्ता शहरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे.

वाहतूक कोंडीमुळे आपला वेळच वाया जात नाही, तर इतर अनेक प्रकारचा मानसिक व शारीरिक त्रास सर्वच लोकांना सहन करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक प्रगती मंदावते, रस्त्यावरील किरकोळ अथवा तीव्र भांडणे वाढतात. वाहन चालकांची चिडचिड वाढते, अत्यंत महत्त्वाचे म्हणजे वाहनांतील इंधनाचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो.

ज्यामुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण वाढते. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. वाहतूक कोंडी का होते, याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. जनमानसात असा समज आहे, की रस्ते अरुंद, चौकात पोलिस उभे नसल्यास, वाहन चालकाच्या बेशिस्त वागणुकीमुळे कोंडी होते.

मोठ्या/अवजड/मालवाहतूक वाहनांमुळे सार्वजनिक बस/ रिक्षा, फूटपाथ वाढविल्यास गतिरोधकामुळे, फूटपाथवरील अतिक्रमणाने बसथांब्यामुळे अडसर झाल्याने, रस्त्याच्या बाजूला झाडे असल्यास वाहतूक कोंडी होते आणि बरेच काही. पण खरेच यामुळे वाहतूक कोंडी होते का?

सार्वजनिक वाहतुकीचा वापरा करा

वरील यादीत आपण सोयीनुसार, हेतूपुरस्सर आणि अनावधानाने एका बाबीकडे दुर्लक्ष करतो आणि ते म्हणजे आपली खासगी वाहने. वाहन चालविताना दुचाकी असो अथवा कार आपण स्वयंशिस्त किती पाळतो, याचे आत्मपरीक्षण आपणच करावे. वरील कारणे ही सांगण्यापुरती ठीक आहेत.

साधं उदाहरण आहे, की चाळीस व्यक्ती जर चाळीस वाहनाने प्रवास करत असतील, तर किती रस्ता व्यापला जाईल किंवा लोक, व्यक्ती एका बसमध्ये असतील तर किती रस्ता व्यापला जाईल. हे भौतिकशास्त्र समजण्यासाठी व त्याचे गुणोत्तर समजण्यासाठी आपल्याला काही फार शिक्षणाची आवश्यकता नाही. अगदी या साध्या निरीक्षणातूनही आपल्या हे लक्षात येईल. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आज खूप महत्त्वाची झाली आहे, तिचा जास्तीत जास्त लोकांनी वापर करायला हवा.

Rajaram Pangavhane
ताडोबाची राणी ‘माया’

उपाय अनेक, तरीही यश कमीच

रस्ते रुंद करणे, उड्डाणपूल/ भुयारी मार्ग तयार करणे, वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे, बस आणि रिक्षांना विशिष्ट मार्गावर बंदी आणणे, फुटपाथ कमी करणे/नष्ट करणे, अतिक्रमण हटविणे, गतिरोधक काढणे, दुतर्फा रस्ते एकतर्फी करणे, बसथांबे पाडणे, झाडे कापणे इत्यादी केल्यामुळे जर वाहतूक कोंडी कमी होत असेल तर हे आपण अनेक वर्षांपासून करत आहोत, तरी तसूभरही वाहतूक नियंत्रणात आलेली नाही.

अपघात, कोंडी झाली कमी

छोट्या अंतरासाठी पायी चालणे अथवा सायकलने जाणे हा उत्तम पर्याय असू शकतो. आपण अगदी जवळ भाजी आणायलासुद्धा गाडीत जातो. सायकल हा एक उत्तम पर्याय आहे. जे आर्थिकदृष्ट्या, आरोग्याला आणि पर्यावरणाला पूरक आहे, हेच मॉडेल म्हणजे शाश्वत वाहतुकीची साधने

खऱ्या अर्थाने (सार्वजनिक वाहतूक, चालणे, सायकल वापरणे) याचा अवलंब करून जगातील काही शहरात स्वीडन, डेन्मार्क येथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे जी शहरे काही वर्षांपूर्वी वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातांमुळे त्रस्त होती, तेथे अलीकडच्या काळात वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.

बसचा वापर, निर्मिती वाढावी

खासगी वाहनावर अंकुश ठेवायचा म्हटले, की लगेच देशाची आर्थिक प्रगती, रोजगार, लघु-सूक्ष्म उद्योगधंदे याबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. परंतु बसची संख्या वाढल्यानेही या गोष्टी होऊ शकतात, हे आपण सोयीनुसार विसरततो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्राधान्याने विचार केल्यास बसनिर्मिती वाढेल, आर्थिक प्रगती होईल, उद्योगधंदे वाढून रोजगारनिर्मिती होईल. परिणामी लोकांची क्रयशक्ती वाढेल. भारतातील कोलकता, मुंबई, गुडगाव व नवी दिल्ली ही चार शहरे सर्वाधिक ‘ट्रॅफिक जाम’ असणाऱ्या जगातील दहा शहरांच्या यादीत आहेत.

Rajaram Pangavhane
भारतीय आदिवासींची इंग्लंडमधील स्मृतिस्थळं

खासगी वाहनांचाच विचार का?

सरकार कायम सर्वसामान्य नागरिकांचे आहे, असे प्रत्येकाकडून सांगितले जाते. मात्र वाहतुकीची धोरणे, योजना, नियोजन ठरविताना सर्वसामान्य जनता ज्यांच्याकडे खासगी वाहने नसून ते पूर्णतः सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून आहेत, त्यांचा विचार का केला जात नाही? मात्र उद्योगपती, चारचाकी वाहनांमध्ये फिरणाऱ्या लोकांचाच नेहमी विचार का केला जातो? सार्वजनिक वाहतूक ही सुरक्षित, टिकाऊ, पर्यावरणपूरक, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे. मग याचा विचार का होत नाही? का नेहमी खासगी वाहनांचे चोचले पुरवले जातात आणि त्यांचाच विचार का केला जातो.

रुंदीकरणाने फायदा, पण प्रश्न सुटणार का?

महाराष्ट्रातील काही शहरांत सार्वजनिक वाहतुकीची फार दयनीय अवस्था आहे. लोकांना भरवशाची, आर्थिकदृष्ट्या परवडणारी, इच्छितस्थळी वेळेवर पोचविणारी, सोयी-सुविधानीं युक्त असलेली बससेवा दिल्यास, लोक खासगी वाहनांचा वापर टाळतील. काही दशकांपासून आपली धोरणे, योजना, कार्यक्रम हे चुकीच्या दिशेने जात आहेत. रस्ते रुंद केल्याने वाहतूक कोंडी सुटेल. उड्डाणपूल, भुयार बांधल्याने वाहतूक कोंडी सुटेल, अशी मानसिकता बाळगून आपण स्वतःचे खोटे समाधान करीत आहोत.

सायकल, पायी चालण्यास प्राधान्य द्या

बरं, यातील एकही उपाययोजनांमुळे तसूभरही अपेक्षित परिणाम न घडता समस्या दिवसेंदिवस अधिक भयानक होत आहे. याला प्रामुख्याने कारण आहे, की खासगी वाहनांना प्राधान्य आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नष्ट करण्याच्या योजनेला अधिक प्राधान्य दिले जात आहे.

वाहतूक कोंडी खासगी वाहनाने होते हे कोणी मान्य करीत नाही. आपल्या समाजाने जर वेळीच खासगी वाहनांवर नियंत्रण ठेवले नाही. बसप्रवास, पायी चालणे, सायकल चालविणे याबाबतीत योग्य पावले उचलली नाहीत, तर आपण वाहतूक कोंडीत गुदमरून जाऊ, हे मात्र नक्की!

Rajaram Pangavhane
हॅपी बर्थ डे बार्बी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com