esakal | ओझरमधील किराणा दुकानात बनावट कीटकनाशकांचा साठा
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

Nashik : ओझरमधील किराणा दुकानात बनावट कीटकनाशकांचा साठा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ओझर मिग (ता. निफाड) येथील किराणा दुकानात अनाधिकृत व बनावट कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली असून पथकातर्फे याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे.

जिल्हा भरारी पथकातील कृषी अधिकारी अभिजित जमधडे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की आज सकाळी भरारी पथकाने छापा टाकून विना बिलांचा, विना परवान्याचा विक्री होत असलेला कीटकनाशकाचा साठा राहत्या घरातून जप्त केला. या मालाची बाजारभावाप्रमाणे किंमत नऊ लाख रुपयांची आहे. हस्तगत करण्यात आलेली कीटकनाशके द्राक्षांसाठी वापरले जातात. कीटकनाशकाचे बाजारमूल्य अधिक असल्याने छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची बाब कृषी विभागाच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे गैरप्रकारास आळा बसविण्याच्यादृष्टीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे व कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व तालुका भरारी पथकातर्फे अनधिकृत कीटकनाशके विक्रेत्यांची शोध मोहीम गेल्या काही दिवसांपासून राबवण्यात येत आहे.

श्री. जमधडे, मोहिम अधिकारी अभिजित घुमरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक माधुरी गायकवाड, कृषी अधिकारी बाळासाहेब खेडकर यांनी सापळा रचला. शेतकऱ्याच्या रुपात जाऊन कीटकनाशकाची मागणी केली. दुकानदाराकडे साठा उपलब्ध असल्याची खात्री केली. त्यानंतर पथकातर्फे दुकान आणि घराच्या पाहणीत कीटकनाशकांचा साठा आढळून आला. शेतकरी बांधवांनी कृषी निविष्ठांची खरेदी करताना अधिकृत विक्रेता व बिलातच खरेदी करावी असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ यांनी म्हटले आहे.

loading image
go to top