Nashik Travel Agent Scam Case : मलेशियात अडकलेले 15 पर्यटक सुखरूप मायदेशी परतले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tourists stranded in Malaysia present during MP Hemant Godse's visit on Thursday.

Nashik Travel Agent Scam Case : मलेशियात अडकलेले 15 पर्यटक सुखरूप मायदेशी परतले!

; नाशिक : ट्रॅव्हल्स एजंटच्या ठकबाजीमुळे मलेशियात अडकलेले नाशिकचे १५ पर्यटक, भाविक खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांमुळे मायदेशी परतले. (Nashik Travel Agent Scam Case 15 tourists stuck in Malaysia returned home safely Nashik News)

खासदार गोडसे यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, मलेशिया ॲम्बसी प्रशासनाशी पत्रव्यवहार करत मलेशिया पोलिसांच्या कस्टडीतून पंधरा पर्यटकांना सुखरूप मायदेशी परत आणले. मायदेशी परतलेल्या पर्यटकांनी गुरुवारी (ता. १०) खासदार गोडसे यांची कार्यालयात भेट घेतली. सुभाष ओहळे, मीनाक्षी ओहळे, अरुण भदरंगे, शांताबाई भदरंगे, धनाजी जाधव, सुनील म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, अशोक भालेराव, विमल भालेराव, मंदा गायकवाड, वृषाली गायकवाड, प्रवीण नुमाळे, द्रौपदी जाधव, इंदूबाई रूपवते हे सर्व पर्यटक नाशिकला सुखरूप पोचले. खासदार गोडसे यांच्या भेटीवेळी त्यांना गहिवरून आले.

एजंट मलेशियात पोचलाच नाही

पर्यटकांनी शहरातील एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंटामार्फत मलेशिया दौऱ्याची आखणी केली होती. एजंट पर्यटकांना नाशिक येथून हैदराबादला घेऊन गेला. एजंटने तेथून १९ पैकी चार जणांच्या व्हिसाचे काम अपूर्ण आहे. तुम्ही विमानाने पुढे चला मी सायंकाळी चौघांना घेऊन मलेशियाला येतो, असे सांगितले.

एजंटने पंधरा पर्यटकांना मलेशियाच्या विमानात बसून दिले. एक दिवस उलटूनही एजंट मलेशियात पोचलाच नाही व त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यातच मलेशिया पोलिसांनी त्यांना हटकावले. पोलिसांच्या प्रश्नांना पर्यटकांकडून योग्य उत्तर न मिळाल्याने पोलिसांच्या मनात शंका निर्माण झाली. पोलिसांनी सर्वांचे पासपोर्ट जप्त करत त्यांना क्वॉरंटाइन केले.

हेही वाचा: Pest Control Contract in Dispute : अधिकारी- ठेकेदारांच्या विश्रामगृहावरील भेटीने संशयाचे वर्तुळ

परदेशात जाताना घ्यावी काळजी

नाशिक येथील पर्यटकांच्या नातेवाइकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून खासदार गोडसे यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून मलेशियात अडकलेल्या पर्यटकांची माहिती दिली. खासदार गोडसे यांच्या पत्राची दखल घेऊन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ॲम्बसीला घटनेची माहिती कळवली. ॲम्बसी प्रशासनाने लगेचच संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.

ट्रॅव्हल्स एजंटच्या ठकबाजीमुळे हे पर्यटक अडकले आहेत. त्यांचे जप्त केलेले पासपोर्ट त्यांना परत देऊन त्यांना भारतात पाठवावे, असे आदेश दिले. त्यानंतर मलेशिया पोलिसांनी त्यांचे पासपोर्ट परत केले. त्यांना हैदराबाद विमानातून मायदेशी पाठविले. बुधवारी (ता.९) सर्व पर्यटक नाशिकला पोचले. परदेशात जाताना योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्या.

हेही वाचा: Hair Transplant Failure : केस प्रत्यारोपण फेल का होते?; जाणुन घ्या