Latest Marathi News | नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सांडव्यावरील देवीमंदिराला रंगरंगोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sandvyavarchi devi news

नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सांडव्यावरील देवीमंदिराला रंगरंगोटी

नाशिक : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत सांडव्यावरील देवी मंदिराच्या डागडुजी व रंगरंगोटी कामाने वेग घेतला आहे. यंदा मंदिरात पहिल्या माळेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुळे मंदिर बंदच होते, तर मागील वर्षी अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला. (Navratri Festival 2022 sandvyavarchi Devi Mandir painted with colours Nashik Latest Marathi News)

आता कोरोना सावट दूर झाल्याने व शासनाने निर्बंध शिथिल केल्याने दहाही दिवस धार्मिक सोहळा रंगणार आहे. पहिल्या माळेला म्हणजे २६ सप्टेंबरला घटस्थापना होईल. त्यानंतर नवचंडी पाठ होणार असून, पंचमीला नऊ कुमारिकांचे पूजन, सायंकाळी गोंधळाचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय महिलांचे भजनी मंडळ रोज आईसमोर सेवा देणार आहे. अष्टमीला होमहवन, नवचंडी होम, पूर्णाहुती आदींचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण नवरात्रोत्सवात देवीला चांदीची विविध आभूषणे चढविली जाणार आहेत. घटस्थापनेच्या दिवशी या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने घट मांडत देवीला मनोभावे साकडेही घालतात.

सांडव्यावरील देवी मंदिराबाबत आख्यायिका सांगितली जाते. पेशव्यांचे नाशिकमधील सरदार नारोशंकर राजेबहाद्दर हे दरवर्षी गडावरील देवीच्या दर्शनासाठी गडावर जात असतं. हा नियम अनेक वर्षे चालू होता. असेच एकदा वणीच्या गडावरून परतत असताना ‘माते, आता मी वृद्ध झालो आहे, त्यामुळे यापुढे तुझ्या दर्शनास येणे शक्य होईल की सांगता येत नाही, तेव्हा तू माझ्याबरोबरच चल, असा आग्रह साक्षात देवीमातेपुढे धरला.

या वेळी त्यांची निस्सीम भक्ती पाहून आईने मी तुझ्या मागोमाग येते, मात्र मागे वळून पाहू नको, अशी अट घातली. श्री नारोशंकर गंगाघाटावरील सध्याच्या देवी मंदिराच्या परिसरात आले असता त्यांनी कुतूहल म्हणून मागे वळून पाहिले अन् देवी त्याच ठिकाणी अवतीर्ण झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते.