शेतकऱ्यांमागे शुक्लकाष्ठ; पाणीटंचाईमुळे कांद्याची वाढ खुंटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

onion crop

शेतकऱ्यांमागे शुक्लकाष्ठ; पाणीटंचाईमुळे कांद्याची वाढ खुंटली

कंधाणे (जि. नाशिक) : परिसरात उन्हाळ कांदा रब्बी हंगामातील प्रमुख नगदी पीक असून, चालूवर्षी लागवडीपूर्वी आणि नंतर अवकाळी पाऊस, सततच्या वातावरणातील बदल, अतिरिक्त भारनियमन आणि आता तीव्र पाणीटंचाईमुळे कांदा पीक होरपळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसत नाही. परिणामी, शेतकरी संकटात सापडला आहे.

पाणीटंचाईमुळे कांद्याची वाढ खुंटली

दोन वर्षांपासून कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने यंदा शेतकऱ्यांनी अवकाळी पाऊस, सततच्या रोगट हवमानात विविध प्रकारच्या महागड्या बुरशीनाशक व किटकनाशके फवारणी करीत रोपे जगवून मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु, कधी अवकाळी पाऊस, तर कधी कडाक्याची थंडी व वातावरणातील बदलामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव या अस्मानी, तर वीज बिले वसुलीसाठी महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित करणे यासारख्या सुलतानी संकटाला तोंड देत कांदा पीक वाढीसाठी मोठा भांडवली खर्च केला. आता कांदा परिपक्वतेच्या अवस्थेत असताना तीव्र उन्हामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने विहिरी कोरड्याठाक पडल्या. परिणामी, पाणीटंचाईमुळे कांद्याची वाढ खुंटली असून, आकारमानाने कमी वाढ झालेला कांदा काढणीसाठी मजुरीचा खर्च परवडणारा नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांना अर्धवट वाढ झालेले कांदा पीक जमिनीत सोडून द्यावे लागत आहे.

हेही वाचा: रोहित्रासाठी वीज कंपनीच्या टोलवाटोलवीला शेतकरी त्रस्त; आंदोलनाचा इशारा

कांदा लागवड सुरू असताना डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला अवकाळी पाऊस आल्यामुळे कांदा लागवडीसाठी तयार सरी व वाफ्यात पाणी साचून चिखल झाल्याने शेतकऱ्यांना शेतीची दुबार मशागत करावी लागली. त्यामुळे लागवड लांबणीवर पडली होती. तेव्हापासून कांदा पिकामागे लागलेले शुक्लकाष्ठ अद्याप सुरूच असून, खरिपाच्या उत्पन्नातून केलेला भांडवली खर्च व हुकमी उन्हाळी कांदा पिकाचा हंगाम वाया गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

''उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन थंडीत लागवड आणि वाढते तापमान कांद्याला पोषक, मॉन्सूनपूर्व पावसाच्या आधी चाळीत कांदा साठवणुकीच्या नियोजनानुसार लागवड केली जाते. परंतु, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्व नियोजन बिघडले आहे.'' - अभिमन बिरारी, कांदा उत्पादक, कंधाणे

हेही वाचा: कमी बाजारभावामुळे उन्हाळ कांदा साठवणुकीवर शेतकऱ्यांचा भर

Web Title: Onion Growth Stunted Due To Water Shortage Nashik Agriculture News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..