esakal | कांदा कडाडला! हंगामातील उच्चांकी बाजारभाव; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

onion market.jpg

आशिया खंडातील अग्रेसर कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत हंगामातील उच्चांकी बाजारभाव मिळाला. कांद्याच्या बाजारभावात दररोज वाढ होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. 

कांदा कडाडला! हंगामातील उच्चांकी बाजारभाव; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

sakal_logo
By
अरुण खंगाळ

लासलगाव (जि.नाशिक) : आशिया खंडातील अग्रेसर कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत दोन हजार ९१ रुपयांच्या प्रतिक्विंटल मागे सोमवारी (ता. १९) वाढ होत सहा हजार ८९१ रुपये, तर पिंपळगाव बसवंत येथे सात हजार ९७१ रुपये इतका उच्चांकी या हंगामातील बाजारभाव मिळाला. कांद्याच्या बाजारभावात दररोज वाढ होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. 

कांदा कडाडला! शेतकऱ्यांना मोठा दिलासा​
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नवीन लाल कांद्याला ११ हजार १११ रुपये इतका उच्चांकी ऐतिहासिक बाजारभाव लासलगाव बाजार समिती मिळाला होता. उन्हाळ कांद्यालाही चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड मोठी केल्याने १३० टक्के इतके उत्पादन निघाले होते. उन्हाळ कांद्याचे उत्पादन जास्त झाल्याने त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशासह विदेशातही लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे कांद्याला मागणी घटल्यामुळे कांद्याचे उत्पादनखर्चही निघणे मुश्कील झाले होते. कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा हा तोट्यात विक्री करत होता. त्यात यंदाच्या पावसाळी हंगामात पावसाचा मुक्काम अधिक दिवसांचा आणि परतीच्या पावसाने चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला. शेतात नवीन लाल कांद्याच्या पिकाचेही मोठे नुकसान झाल्याने मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने कांद्याचे बाजारभावात दररोज वाढ होत आहे. कांद्याचे बाजारभाव १३ सप्टेंबरला जास्तीत जास्त तीन हजार २४० रुपये होताच केंद्र सरकारने १४ सप्टेंबरला कांद्याची निर्यातबंदी केली. १४ ऑक्टोबरला जास्तीत जास्त चार हजार ८०० रुपये प्रतिक्विटंलला बाजारभाव मिळाल्याने कांद्याचे दर नियंत्रणाबाहेर जात असल्याने प्राप्तिकर विभागाची कारवाई करण्यात आली.

लासलगावला ६,८९१, तर पिंपळगावला ७,९७१ प्रतिक्विंटल 

या कारवाईत काय साध्य झाले, हे अद्यापही गुलदस्त्यातच असताना सोमवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावाने नवीन विक्रम नोंदवीत सहा हजार ८९१ रुपयांचा टप्पा गाठला आहे. सोमवारी (ता. १९) ४१० वाहनांतून चार हजार ७०० क्विंटल कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता. या कांद्याला सुमारे सहा हजार ८९१ रुपये इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला. सरासरी सहा हजार २०० रुपये, कमीत कमी एक हजार ५०० रुपये इतका प्रतिक्विटंल बाजारभाव मिळाला. गेल्या सप्ताहात बुधवारी झालेल्या कांदा लिलावात चार हजार ८०० रुपये भाव कांद्याला मिळाला होता. त्यामुळे सुमारे दोन हजार ९१ रुपयांची वाढ पहिल्याच दिवशी कांद्याला मिळाली. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

गेली अनेक महिने अत्यंत कवडीमोल भावाने आम्ही आमचा कांदा विकलेला आहे. त्यामुळे आमचे झालेले नुकसान कसेबसे या भावाने भरून निघणार आहे. त्यामुळे जास्त भाववाढीची चर्चा होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. परतीच्या पावसाने लाल कांदा, तसेच उन्हाळ कांद्याचे रोप पाण्यात गेले आहे. सुमारे दीड लाख रुपये खर्च करूनही लाल कांद्याचे भवितव्य पूर्णपणे अंधारमय झाले आहे. -सुनील गवळी, कांदा उत्पादक, ब्राह्मणगाव (विंचूर) 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

वाढते कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून आधी निर्यातबंदी त्यानंतर कांद्याच्या व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाची कारवाई झाली. आता कांदा आयात करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, अनेक महिने अत्यंत कवडीमोल भावाने विक्री झालेल्या कांद्याला आज जरी चांगला भाव मिळत असेल तरी अजूनही शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघाले नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा आयात करू नये, अन्यथा राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांना फिरकू दिले जाणार नाही. -भारत दिघोळे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना  

संपादन - ज्योती देवरे 

loading image