
नाशिक : (येवला) कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटाने अनेकांच्या पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत आता अनेक सामाजिक हातही सरसावले असून, येथील कांदा व्यापारी असोसिएशन, माणुसकी फाउंडेशन तसेच सोशल मीडिया फोरम यांच्या माध्यमातून रोज 250 भुकेलेल्यांची जेवणाची सोय होत आहे. यामुळे झोपडीतील गरीब, पायी जाणारे वाटसरू आणि भिकाऱ्यांसह आडोशाला बसलेल्या अनेक गरजूंच्या पोटाची खळगी भरणार आहे.
दीड ते दोन महिने हा उपक्रम सातत्याने चालविण्याचे नियोजन
कोरोनामुळे हातचे काम हिसकावले असून, घरात बसून राहण्याची वेळ येत असल्याने शहरातील भटक्या व गोरगरिबांसह पायी घरी निघालेल्यांचे खाण्या-पिण्याचे हाल होत आहेत. याबाबत तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कांदा व्यापारी असोसिएशन, माणुसकी फाउंडेशनने रोज जेवणाची 250 पाकिटे देण्याची, तर सोशल मीडिया फोरमने वाटपाची तयारी दर्शविली व दोन दिवसांपासून याला सुरवातही केली आहे. कांदा व्यापारी असोसिएशनने संपूर्ण खर्च उचलला असून, यासाठी एका आचार्याला शिजविण्याची जबाबदारी दिली आहे. तयार अन्नाची पाकिटे माणुसकी फाउंडेशन व सोशल मीडिया फोरमचे कार्यकर्ते वितरित करीत आहेत. सुमारे दीड ते दोन महिने हा उपक्रम सातत्याने चालविण्याचे नियोजन केले गेले आहे.
मास्क, हॅंडग्लोव्हज घालून पूर्ण सुरक्षेने फोरमचे राहुल लोणारी, किरणसिंग परदेशी, योगेश सोनवणे, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, तरंग गुजराथी, भूषण शिनकर, अक्षय तांदळे आदी कार्यकर्ते अन्न पाकीट वितरणासाठी सामाजिक बांधिलकीतून मेहनत घेत आहेत.
गरजूंना अडचणीत जेवण मिळू लागल्याने समाधान गरिबांच्या चेहऱ्यावर
कांदा व्यापारी असोसिएशनचे नंदूशेठ अट्टल, भरत समदडिया आणि सर्व सदस्य व पदाधिकारी, माणुसकी फाउंडेशनचे अल्केश कासलीवाल, सोशल मीडिया फोरमचे समन्वयक बंडू शिंदे आदी या उपक्रमाचे नियोजन करीत आहेत. या तिघांच्या समन्वयातून गरजूंना अडचणीत जेवण मिळू लागल्याने त्याचे समाधान या गरिबांच्या चेहऱ्यावर दिसले.
गरजूला दिली चप्पल
येथील किरणसिंग परदेशी यांची मदतीची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. स्वत:ची ऍपेरिक्षा ते पाकिटे वाटपासाठी वापरत आहेत. पायी जाणाऱ्या एकाच्या पायात चप्पल नसल्याने भर उन्हात होणाऱ्या वेदना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वत:ची चप्पल काढून त्यांना दिली, तर एकाला प्यायला पाणी नसल्याने दोन किलोमीटर जाऊन त्यांनी पाणी आणून दिले. विशेष म्हणजे पहिल्या दिवसापासून ते मदतीत सक्रिय आहेत.
अडचणीच्या काळात ज्यांच्या जेवणाची अडचण आहे, त्यांच्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. अडचणीची परिस्थिती असेपर्यंत उपक्रम राबविण्याची तयारी आहे. उद्यापासून जेवणाची पाकिटे वाढवून 350 पर्यंत करणार आहोत. - अल्केश कासलीवाल, माणुसकी फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.