मालेगावची संपदा करतेय मुंबई मेट्रोचे सारथ्य! एकमेव महिला चालक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon daughter sampada

मालेगावची संपदा करतेय मुंबई मेट्रोचे सारथ्य! एकमेव महिला चालक

वडेल (जि.नाशिक) : महिलांनी विमानाचे पायलट (pilot) होऊन आकाश काबीज केले, तेथे मोठा गाजावाजा होत असलेल्या मुंबई मेट्रोची (mumbai metro) काय बात? याचाच प्रत्यय देताना, मालेगाव मर्चंट्स सहकारी बॅंकेचे निवृत्त शाखाधिकारी अशोक शिंदे यांची कन्या संपदा सध्या मुंबईच्या मेट्रो ट्रेनची एकमेव महिला चालक म्हणून सेवा बजावत आहे. मालेगावच्या या लेकीचे कर्तृत्व मालेगावकरांसाठी अभिमानाची बाब आहे. (only female driver of Mumbai metro train)

मालेगावची संपदा करतेय मुंबई मेट्रोचे सारथ्य

संपदाचे शालेय शिक्षण मालेगावातील रेणुकाबाई भाऊसाहेब हिरे विद्यालयात, तर महाविद्यालयीन शिक्षण महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात झाले आहे. त्यानंतर संपदाने पुणे येथील पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रीकी व तंत्रशास्त्र महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. अभियांत्रीकी शिक्षणासाठी पुणे येथे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर, मुलीला इतक्या दूर शिक्षणासाठी न पाठविण्याचा सल्ला अनेकांनी दिला. पण, त्याला न जुमानता अशोक शिंदे लेक संपदाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले व तिला पुण्याला पाठविले.

मेट्रो पायलट म्हणून रुजू

२०१५ मध्ये अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्यानंतर पुण्यातच एक-दोन ठिकाणी नोकरी करीत असतानाच ऑगस्ट २०१९ मध्ये मुंबई मेट्रो ट्रेनमध्ये पायलट (चालक) पदासाठी जाहिरात वाचून संपदाने या पदासाठी आवेदनपत्र सादर केले. त्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये या पदासाठी तिची निवड होऊन तांत्रिक परीक्षा, मेट्रो विभागाची आरडीएसओ परीक्षा, मुलाखत, शारीरिक क्षमता चाचणी, शिकाऊ चालक, अंतिम मुलाखत या सर्व पातळ्यांवर यश मिळवीत संपदाने अखेर मुंबई मेट्रोचे सारथ्य आपल्या हाती घेत ती मेट्रो पायलट म्हणून रुजू झाली आहे.

होतकरू मुलांनी या क्षेत्रात पदार्पण करावे

तिचे मेट्रो पायलट प्रशिक्षण अंधेरीच्या मेट्रो कारशेड येथे झाले. सध्या संपदा मेट्रो पायलट म्हणून कार्यरत असणारी एकमेव महिला आहे. संपदाला सासरच्या मंडळींकडूनही नेहमीच या कामासाठी प्रोत्साहन मिळत असून, सर्व नातेवाईक आणि विशेषत: सासू व दीर यांचा तिला नेहमीच पाठिंबा मिळत आहे. संपदाचे पती प्रसाद काकडे पूर्वी मेट्रो ट्रेन पायलटच होते. सध्या ते मेट्रो स्टेशन मास्टर म्हणून कार्यरत आहेत. मेट्रो क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा संपदाला फायदा होत असून, हे अनुभव सदैव नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी उपयुक्त असल्याचे संपदा सांगते. मेट्रो क्षेत्रात भविष्यात नोकरीच्या अनेक संधी असून, ग्रामीण भागातील होतकरू मुलांनी या क्षेत्रात पदार्पण करावे या अपेक्षेसह मेट्रो क्षेत्रात उच्चपदावर काम करण्याची संपदाची महत्त्वाकांक्षा आहे.

मेट्रोसारख्या नवख्या क्षेत्रात काम करण्यासाठी एकमेव महिला पायलट म्हणून निवड झालेल्या संपदाचा पिता म्हणून मला अभिमान आहे. तिच्या निवडीने मुली कुठल्याच क्षेत्रात कमी नसतात, ही बाब अधोरेखित झाली आहे.-अशोक शिंदे, निवृत्त शाखाधिकारी, मामको बॅंक तथा संपदाचे वडील

संपदा तिच्या माहेरच्या शिंदे परिवारासह आमच्या काकडे परिवाराचाही अभिमान आहे. रोज आठ तास कार्यरत राहणारी संपदा सध्या कोविडच्या काळातही मेट्रोमध्ये सेवा देत आहे. संपदा एकमेव महिला मेट्रो पायलट असून, तिची ही कामगिरी ऐतिहासिक आहे.-प्रसाद काकडे, मेट्रो स्टेशन मास्तर तथा संपदाचे पती

टॅग्स :Malegaonmumbai metro