esakal | दिलासादायक! नाशिककरांसाठी आता पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध

बोलून बातमी शोधा

Oxygen balance remains Nashik
दिलासादायक! नाशिककरांसाठी आता पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध
sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कोरोना रुग्णांचा रुग्णालयांवरील ताण हलका झाला आहे. डॉक्टरांना खाटांसाठी येणाऱ्या निरोपांमध्ये २५ ते ५० टक्क्यांनी घट झाली आहे. याचाच अर्थ असा, की रुग्णसंख्यावाढीचा दर काहीसा मंदावला आहे.

त्याच वेळी नाशिकसाठी उपलब्ध होणाऱ्या लिक्विड ऑक्सिजनचे (liqiud oxygen) प्रमाण चांगले राहिल्याने महाराष्ट्रदिनी रुग्णालयांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करून ४३.३४ टन शिल्लक राहिला होता. रविवारी (ता. २) पुन्हा ३४.३६ टन ऑक्सिजन शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सलग दोन दिवस दुसऱ्या दिवसासाठी शिल्लक ऑक्सिजनचा उपयोग करणे शक्य झाले आहे. (Oxygen balance remains in Nashik)

हे आहेत ऑक्सिजन उत्पादक

जिल्ह्यातील सनी इंडस्ट्रीजतर्फे ४.११, अक्षय ऑक्सिजनतर्फे २.९८, रवींद्र ऑक्सिजनतर्फे १०.४२, स्वस्तिक एअरतर्फे एक अशा एकूण १८.५१ टन ऑक्सिजनचे उत्पादन केले. याशिवाय पिनॅकलतर्फे २२.३३, नाशिक ऑक्सिजनतर्फे ५.४०, निखिल मेडिकोतर्फे ३.९०, गजानन गॅसेसतर्फे ५, श्रीगणेशतर्फे २८.६६ अशा एकूण ६५.२९ टन ऑक्सिजनचे रिफिलिंग करण्यात आले. अशा पद्धतीने महाराष्ट्र दिनाच्या शिल्लक ऑक्सिजनसह रविवारी १२७.१४ टन ऑक्सिजन उपलब्ध झाला होता. प्रत्यक्षात रुग्णालयांना ९२.७८ टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. रविवारी ९२ टन लिक्विड ऑक्सिजन उत्पादकांसाठी उपलब्ध झाला होता.

पिनॅकलसाठी महाराष्ट्र दिनाचा १७ टन कोटा रविवारी मिळाला. त्याच वेळी लिंडे कंपनीचा १७ टनांचा ऑक्सिजन जळगाव आणि नाशिकच्या मार्गावर होता. ही माहिती सोमवारी अन्न-औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे आणि सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांनी ‘सकाळ’ला दिली.

हेही वाचा: जिल्हाबंदीचे तीन तेरा आणि 'सकाळ'च्या दणक्यानंतर यंत्रणा अलर्ट!

ऑनलाइन खाटांची संख्या वाढली

ऑक्सिजन उपलब्धतेच्या गोंधळाच्या परिस्थितीत एक प्रमुख समस्या पुढे आली होती, ती म्हणजे, खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन खाटांची संख्या वाढविली होती. पण ती दप्तरी नोंद नसल्याने उपलब्ध ऑक्सिजन आणि मागणीचा याचा ताळमेळ जुळवणे कठीण झाले होते. त्यावर उपाय म्हणून आयएमएतर्फे रुग्णालयांना प्रत्यक्षात ऑक्सिजनच्या खाटांची माहिती देण्याची सूचना देण्यात आली असताना अन्न-औषध प्रशासनतर्फे रुग्णालयनिहाय ऑक्सिजनच्या मागणीचे परीक्षण सुरू झाले. त्याचा परिणाम म्हणजे, ऑनलाइन उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनच्या खाटांची संख्या वाढल्याचे चित्र पुढे आले आहे.

हेही वाचा: कोरोनाने मृत्यू झाल्यास पंतप्रधान विमा योजनेतून मिळू शकतील दोन लाख

रुग्णालयांची ऑक्सिजन प्रकल्पाची तयारी

शहरातील खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. ही माहिती एव्हाना जिल्हा प्रशासनापर्यंत पोचली आहे. रुग्णालयांना ऑक्सिजन प्रकल्पासाठी सरकारी योजनांची मदत हवी आहे. त्यादृष्टीने शहरातील काही ज्येष्ठ डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. (Oxygen balance remains in Nashik)