
आता प्राणवायूचा काळा बाजार? रुग्णांच्या नातेवाइकांची दिवसभर वणवण
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात अत्यावस्थ रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. या परिस्थितीचा काही अपप्रवृत्तींकडून गैरफायदा उचलत थेट ऑक्सिजनचा काळा बाजार केला जात आहे.
ऑक्सिजनची टंचाई गंभीर समस्या
रेमडेसिव्हिरपाठोपाठ आता ऑक्सिजनची टंचाई गंभीर समस्या धारण करत आहे. उपचारार्थ रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनच्या तुलनेत उपलब्धता अत्यंत कमी असल्याने जिल्हा प्रशासनदेखील हतबल झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय क्षेत्राशी निगडित संघटना व प्रशासकीय यंत्रणेच्या बैठकीच्या फैरी सुरू आहेत. सोमवारी (ता. २६) देखील जिल्हा प्रशासनासोबत आयएमएची बैठक झाल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत सध्या उपलब्ध ऑक्सिजनच्या सुरळीत वाटपाबाबत चर्चा झाली.निर्धारित रकमेपेक्षा अधिकची माहिती काहींकडून केली जात असल्याचे काही डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे प्राणवायूची काळा बाजार रोखण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे.
हेही वाचा: रेमडेसिव्हिर संजीवनी नाही; कोविड फोर्सचे स्पष्टीकरण
रुग्णांच्या नातेवाइकांची दिवसभर मरमर सुरू
रुग्णालयांना ऑक्सिजन उपलब्धतेअभावी आता दाखल रुग्णांकरिता ऑक्सिजनची व्यवस्था करण्याची विनवणी त्यांच्या नातेवाइकांना केली जात आहे.परंतु प्रत्यक्षात दिवसभर ऑक्सिजन उपलब्धतेसाठी रुग्णालयांचा संघर्ष सुरू राहिला. काही रुग्णालयांनी तर चढ्या दरांनी ऑक्सिजन खरेदी करत रुग्णांना उपलब्ध करून दिले. त्यामुळे आता प्राणवायूच्या काळा बाजार रोखण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणेपुढे आहे. हतबल झालेल्या रुग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाइकांनाच थेट ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी साकडे घातले जाते आहे. रिकामा सिलिंडर घेऊन नातेवाइकांकडून शहरातील विविध एजन्सीच्या ठिकाणी ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : पोलिस बंदोबस्तात कर्मचाऱ्यांचे जाब-जबाब
बेड फुलचे कारण देत रुग्ण दाखल करण्यास नकार
ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांना हाल सोसावे लागत आहेत. नव्याने दाखल रुग्णांकरिता ऑक्सिजनच नसल्याने बेड फुल आहेत, असे कारण सांगत रुग्ण दाखल करून घेण्यास अनेक रुग्णालये नकार देत आहेत. महापालिकेच्या संकेतस्थळावर बेड उपलब्ध असल्याचे दाखविले जात असताना प्रत्यक्षात रुग्णालयांकडून नव्याने रुग्ण दाखल करण्यास नकार दिला जातो आहे.
प्रशासकीय पातळीवर सातत्याने बैठकीतून ऑक्सिजनच्या सुरळीत वाटपाबाबत चर्चा सुरू असून, लवकरच याबाबत सुसूत्रता येणे अपेक्षित आहे. सध्या तरी रुग्णालये ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या समस्येला सामोरे जात आहेत. दाखल रुग्णांनाच ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने नवीन रुग्णांची जबाबदारी घ्यावी कशी, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.- डॉ. हेमंत सोननीस,अध्यक्ष, आयएमए नाशिक
Web Title: Oxygen Black Market Nashik Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..