
Parakh Patasantha Fraud case : येवल्याचे ‘गोल्डशर्ट’ मॅन पारख यांना अटक
नाशिक : येवला येथील कै. सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे २२ कोटींच्या अपहारप्रकरणी पतसंस्थेचे संस्थापक संचालक तथा येवल्याचे माजी नगराध्यक्ष पंकज सुभाष पारख यांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
वाढदिवसाला गोल्डशर्ट परिधान करणाऱ्या पारख यांच्यासह १७ संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. संशयित पारख यांना तिडके कॉलनीतील अनमोल नयनतारा या ठिकाणावरून अटक करण्यात आली. जिल्हा न्यायालयात त्यांना हजर केले असता, येत्या १० तारखेपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. (Parakh nagri patasanstha Fraud case yeola gold shirt man pankaj Parakh arrested nashik crime news)
अपहारप्रकरणी नोव्हेंबर २०२१ मध्ये येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात संस्थापक संचालक असलेले पंकज पारख यांच्यासह अध्यक्ष योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन आणि चार वसुली अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित पारख हे पसार होते.
गुन्ह्याचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हेशाखेला संशयित पारख नाशिकमध्येच उंटवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांनी गुरुवारी (ता. २) रात्री पारख यांना अनमोल नयनतारा परिसरातून अटक केली.
पारख हे कारमध्ये असताना पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. त्यांना शुक्रवारी (ता. ३) जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्यांना येत्या १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील संशयित योगेश सोनी व अजय जैन हे अद्यापही फरार आहेत.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
सुमारे २२ कोटींचा गैरव्यवहार
कै. पारख पतसंस्थेतील २१ कोटी ९६ लाख ९९ हजार ८५० रुपयांचा गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पतसंस्थेचे ११ हजार ३२६ ठेवीदार असून, संचालक मंडळासह अध्यक्ष व व्यवस्थापकांनी चुकीचे व नियमबाह्य कर्ज वाटप केले.
२६ ऑगस्ट २०२१ रोजी पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त झाले. त्यानंतर पतसंस्थेवर प्रशासक म्हणून सहायक निबंधक प्रताप पाडवी यांची नियुक्ती झाली. यावेळी १ एप्रिल २०१५ ते २१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत समोर आले. त्यानुसार पाडवी यांनी येवला शहर पोलिसांत गैरव्यवहाराची फिर्याद दिली होती.
१ कोटींचा ‘गोल्डशर्ट’
पंकज पारख हे येवला नगरपालिकाचे माजी नगराध्यक्ष असून, त्यांचा कापड व्यवसाय आहे. पारख यांनी त्यांच्या वाढदिवसाला नाशिकच्या सुवर्णकारांकडून सुमारे १ कोटी रुपयांचा ४ किलो वजनाचा सोन्याचा शर्ट तयार करून परिधान केला होता.
त्यामुळे ते राज्यात प्रकाशझोतात आले होते. मात्र, पतसंस्थेच्या गैरव्यवहारानंतर पारख यांना अटकेची कारवाई टाळण्यासाठी पसार व्हावे लागले. आर्थिक गुन्हेशाखेच्या तपासातून गैरव्यवहाराची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.