esakal | देखण्या इमारतीत मृत्युदर २० टक्क्यांवर! येवल्यात सुविधांअभावी रुग्णांचे हाल

बोलून बातमी शोधा

yeola sub district hospital
देखण्या इमारतीत मृत्युदर २० टक्क्यांवर! येवल्यात सुविधांअभावी रुग्णांचे हाल
sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : महिन्यापूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यावर देखण्या इमारतीत डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू झाले खरे; पण अपुरा ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरची अनुपलब्धता आणि उपचार करण्यासाठी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता यांसह विविध सुविधांअभावी रुग्णांची हाल होत आहेत. विशेष म्हणजे महिनाभरात या रुग्णालयात २५८ रुग्णांपैकी ५६ जणांचा बळी गेला असून, २० टक्क्यांवर मृत्युदर गेल्याने हे रुग्णालय मृत्यूचे केंद्र बनल्याची टीका होऊ लागली आहे.

पहिल्या टप्प्यात बाभूळगाव व नगरसूल येथे कोविड केअर सेंटर होते. दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या सोयीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयातील वाढीव काम पूर्ण झाल्याने उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देत येथेच कोविड कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. मात्र, केंद्र सुरू झाल्यापासून या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू होण्याची चर्चा कायम राहिली. १९ मार्चपासून येथे आजपर्यंत २५८ रुग्ण उपचार घेण्यासाठी दाखल झाले. यातील ५६ जण मृत झाले आहेत, याव्यतिरिक्त अजून आठ जण इतर कारणाने मृत झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. १३२ रुग्ण उपचार घेऊन बरे झाल्याने येथील रिकव्हरी रेट फक्त ५१ टक्केच असल्याचे आकडे सांगतात.

हेही वाचा: Breaking : धक्कादायक! नाशिक शहरातील 5 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

येथे उपजिल्हा रुग्णालय झाले मात्र अजूनही लिफ्ट, रॅम, नवीन शवविच्छेदन गृह, ड्रेनेज आदी कामे अपूर्णावस्थेत आहे. गंभीर म्हणजे मंजूर असणारी ९७ पैकी ७२ पदे रिक्त आहेत. २५ कर्मचारी व इतर कंत्राटी ४३ कर्मचाऱ्‍यांच्या जोरावरच सेवेचे व्रत सुरू आहे. ३० हून दर्जावाढ होत १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय झाले. सध्या येथे ६४ बेड कोरोनाग्रस्तांसाठी असून, यातील ६० बेडला ऑक्सिजनची सुविधा आहे. आज येथे सकाळी ६४ उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी ४३ जण ऑक्सिजनवर होते. दुपारी ऑक्सिजन संपत आल्याने प्रशासनाची एकच धावपळ झाली. मात्र, तात्पुरत्या स्वरूपात ऑक्‍सिजन उपलब्ध झाला. नाशिकहून ऑक्सिजन मिळण्यात सातत्य नसल्याने आवश्यक तेवढा ऑक्सिजन वेळेत मिळत नाही.

रेमडेसिव्हिरची अवस्था तर अजून बिकट असून, यामुळे अनेक रुग्णांना उपचार न मिळाल्याचे सांगितले जाते. गंभीर म्हणजे मागच्या सहा दिवसांनंतर आजच येथे रेमडेसिव्हिर उपलब्ध झाले आहे. यासाठी गेल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांनी वर्गणी जमा केल्याची चर्चा आहे.

अवघे तीन डॉक्टर सेवेत

७० रुग्णांसाठी येथे १७ नर्स स्टाफची आवश्यकता असताना १२ नर्स कार्यरत आहेत, तर एमबीबीएस पात्रतेचे पाच ते सहा डॉक्टर आवश्यक असून, सध्या येथे तीन जण सेवा देत आहेत. कोरोनाच्या उपचारासाठी तज्ज्ञ फिजिशियनस (एमडी) उपलब्ध नसल्याने येथील डॉक्टरांना नाशिकहून सल्ला घेऊन उपचार करण्याची वेळ येत आहे. एकतर सुविधांची कमतरता त्यात रुग्णसंख्या अधिक असल्याने डॉक्टर रात्रीचा दिवस करून रुग्ण वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कुप्पास्वामी, डॉ. पंकज पाटील, डॉ. जितेंद्र डोंगरे तसेच अरुण चव्हाण, अनिल शिरसाठ, डी. एस. राठोड, संगीता साबळे आदींचे पथक रुग्णांच्या सेवेसाठी तैनात आहे. मात्र, एकीकडे सुविधांचा अभाव आणि दुसरीकडे ऑक्सिजनची लेवल खालावल्यावर दाखल होणारे रुग्ण या कारणामुळे वाढलेला मृत्युदर थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची वेळ नक्कीच आली आहे.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

नगरसूलला हव्या सुविधा...

येथे बरे झालेले रुग्ण बाभूळगाव येथे कोविड केअर सेंटरवर पाठविले जातात. तर, नगरसूल ग्रामीण रुग्णालयातही पहिल्यापासून कोविड सेंटर असून, पहिल्या लाटेमध्ये नगरसूलची उपचाराची पद्धती तालुकाभर कौतुकास पात्र ठरली होती. सध्या मात्र येथे रुग्णांना पहिल्याप्रमाणे सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या असून अनेक गमती चर्चेला येत आहेत.

येथे कोरोना रुग्णांना उपचार मिळण्यासाठी इतर आजाराची नियमित ओपीडी बंद केली आहे. पुरेशा प्रमाणात डॉक्टर व नर्स नसल्याने अजून मागणी केली आहे. येथेच लसीकरण व ॲन्टिजेन टेस्टदेखील सुरू आहे. त्यामुळे आवश्यक स्टाफ उपलब्ध करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील रुग्ण स्थानिक पातळीवर उपचार घेऊन नंतर इकडे येतात. तोपर्यंत तब्येत खालावलेली असते. यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

-डॉ. शैलजा कुप्पास्वामी, वैद्यकीय अधीक्षक, येवला

या आहेत अडचणी...

-वाढलेला मृत्युदर बनला चिंतेचा विषय

-रोजच होताहेत पाच ते आठ जणांचे मृत्यू

-येवल्यात नांदगाव, चांदवड, वैजापूरहूनही रुग्ण दाखल

-रुग्णसंख्येच्या तुलनेत डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता

-ऑक्सिजनसाठी सतत पाठपुराव्याची गरज

-अनेक रुग्ण ऑक्सिजन ८५च्या खाली आल्यावर होतात दाखल

-श्रेणी वाढ झाल्यानंतर पुरेशा सुविधा नाही

-उपजिल्हा रुग्णालयाच्या अनुषंगाने डॉक्टरची उपलब्धता नाही

-नियमित रेमडेसिव्हिर मिळेना, सहा दिवसांनंतर मिळाले इंजेक्शन

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : ती रुग्णवाहिका महिलेसाठी ठरली जीवनदायिनी..!