Corona Update : नाशिकच्या 'या' भागातील ४४ जणांना चक्क कोरोनाची लक्षणे

corona 5.jpg
corona 5.jpg

नाशिक : शहरातील ज्या भागांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा भागांतील घरांची तपासणी पालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत सुरू झाली आहे. 75 आरोग्य पथकांतर्फे चार हजार 661 घरांना भेटी देण्यात आल्या. त्यात 17 हजार 414 नागरिकांची तपासणी करण्यात आली. अंबड येथील संजीवनगर व नाशिक-पुणे महामार्गावरील बजरंगवाडी भागात 44 जणांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना तातडीने पालिकेच्या रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले.

संजीवनगर, बजरंगवाडीतील 44 जणांना कोरोनाची लक्षणे

शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गोविंदनगर परिसरात आढळून आला. त्यानंतर नवश्‍या गणपती, नाशिक रोड येथील तरण तलाव परिसर, नाशिक- पुणे महामार्गावरील समाजकल्याण विभागाचे निवारा केंद्र व अंबड येथील संजीवनगरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महापालिकेतर्फे पाचशे मीटरचा परिसर 14 दिवसांसाठी प्रतिबंधित करण्यात आला. गोविंदनगरमध्ये 22 वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली. तेथे वैद्यकीय पथकातर्फे एक हजार 495 घरांची तपासणी करण्यात आली. अंबड येथील संजीवनगरमध्ये पंधरा वैद्यकीय पथकांमार्फत एक हजार 245 घरे तपासण्यात आली.

75 आरोग्य पथकांमार्फत 4,661 घरांना भेटी

नाशिक- पुणे महामार्गावरील बजरंगवाडी परिसरात वैद्यकीय पथकाने 193 घरांची तपासणी केली. नाशिक रोड भागातील तरण तलाव परिसरात 21 वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून एक हजार 196 घरांमध्ये तपासणी झाली. संजीवनगर येथे पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेचा सिडकोतही वावर झाल्याने ज्या भागात संचार झाला, तेथे 22 पथकांच्या माध्यमातून एक हजार 245 घरे तपासण्यात आली. नवश्‍या गणपती परिरसरात बारा वैद्यकीय पथकांकडून 528 घरे तपासण्यात आली. संजीवनगर व बजरंगवाडी परिसरात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत 44 नागरिकांना सर्दी, ताप, खोकला असल्याचे आढळून आले. बजरंगवाडी भागात 32, तर संजीवनगर भागातील बारा नागरिकांचा समावेश आहे. पुढील तपासणीसाठी त्यांना महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात पाठविण्यात आले.

57 अहवाल प्रलंबित

महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून 30 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी दोन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरात 385 संशयितांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील 323 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 57 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com