esakal | नाशिककरांना निवडणुकीपूर्वी हवंय शंभर टक्के लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

नाशिककरांना निवडणुकीपूर्वी हवंय शंभर टक्के लसीकरण

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय पक्षांसह प्रशासनाने तयारी सुरू केली असली, तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर किमान ८५ टक्के लसीकरण पूर्ण झालेले असावे, अशी इच्छा नाशिककरांकडून व्यक्त होत आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे शहरातील महिला व तरुण या दोन घटकांकडून निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विविध प्रश्‍नांसाठी विभागनिहाय सर्वेक्षण करण्यात आले. त्यात मतदानाला सामोरे जाताना शंभर टक्के लसीकरण पूर्ण व्हावे का? असा प्रश्‍न विचारण्यात आला. सहा विभागांत झालेल्या या सर्वेक्षणात ९४.३९ टक्के महिलांनी, तर ८५.५९ टक्के तरुणांनी ‘होय’ असे मत नोंदविले आहे.

पुढील वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच जानेवारी-फेब्रुवारी २०२२च्या दरम्यान महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी राजकीय पक्ष, प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एकसदस्यीय प्रभागरचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यास प्रशासनाने सुरवात केली आहे. राजकीय पक्षांकडूनही कार्यकर्त्यांच्या बैठका, नियुक्त्या आदी पातळ्यांवर तयारी सुरू झाल्याने निवडणुकीचा माहोल तयार होत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांकडून जाहीरनामे प्रसिद्ध केले जातात. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांत नागरिकांचाही सहभाग असावा, या हेतूने ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पश्‍चिम, सातपूर, सिडको, नाशिक रोड, मध्य, पंचवटी या सहा विभागांमध्ये नवमतदार युवक-युवती व महिलांचे मेळावे घेण्यात आले. मेळाव्याच्या माध्यमातून मतदारांची भूमिका व मते जाणून घेण्यात आली. महापालिकेच्या माध्यमातून पुरविल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांची सद्यःस्थिती, त्यात काय सुधारणा हवी, कुठल्या सेवेला प्राधान्य द्यावे यांसह मतदानासाठी शंभर टक्के लसीकरण व्हावे का? असा प्रश्‍न विचारण्यात आला. त्यातून लसीकरणाबाबत हा निष्कर्ष समोर आला आहे.

हेही वाचा: पक्ष्यांनी सोडली अर्धवट घरटी अन् वाळू लागले वृक्ष

९४ टक्के महिला म्हणतात, होय

सहा विभागांत महिलांचे मत नोंदविण्यात आले. त्यात ९४.३९ टक्के महिलांनी मतदानापूर्वी लसीकरण पूर्ण व्हावे, असे मत नोंदविले, तर २.०४ टक्के महिलांनी नाही, असे मत नोंदविले. ३.५७ टक्के महिलांनी सांगता येत नसल्याचे मत नोंदविले.

८६ टक्के तरुणांना हवंय लसीकरण

८५.५९ टक्के तरुणांनी मतदानापूर्वी लसीकरण व्हावे, असे मत नोंदविले आहे, तर ५.९३ टक्के युवक-युवतींनी ‘नाही’ असे मत नोंदविले. लसीकरणाबाबत सांगता येत नसणाऱ्या तरुणांचे प्रमाण ८.४७ टक्के आहे.

शहरात लसीकरणाची स्थिती

* पहिला डोस घेतलेले- पाच लाख ८० हजार ४८९

* दुसरा डोस घेतलेले- दोन लाख १७ हजार ४६७

महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना डिसेंबरअखेर ७० ते ७५ टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. लशींच्या उपलब्धतेनुसार लसीकरण मोहीम सुरू आहे.

-कैलास जाधव, आयुक्त, नाशिक महापालिका

हेही वाचा: नाशिक : खासगीमधून ४८१ विद्यार्थ्यांचा पालिकेच्या शाळेत प्रवेश

सहकार्य :

१) श्‍वेता पाटील

२) इम्रान शेख

३) गौरव दवांगे

४) आकाश मुसळे

५) राहुल भालेराव

loading image
go to top