आडतदारांच्या मुजोरीने गाठला कळस! पैशाची मागणी करताच शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

PML20A02092[1].jpg
PML20A02092[1].jpg

नाशिक : (पिंपळगाव बसवंत) शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून कामकाज करणाऱ्या पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो आडतदारांच्या मुजोरीने शनिवारी (ता.२४) कळस गाठला. विक्री केलेल्या टोमॅटोचे पैसे घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला जोरदार मारहाण करीत त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या आडतदाराविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

धारधार शस्त्राने वार करीत बेदम मारहाण

कारसूळ (ता. निफाड) येथील जितेंद्र जाधव टोमॅटो विक्री करून पावती रक्कम घेण्यासाठी संत सावता आडतमध्ये गेले. त्यांनी पावतीच्या रकमेची मागणी केली असताना आडतदार दत्तू विधाते व त्यांची दोन्ही मुले किशोर व ज्ञानेश्‍वर यांनी जितेंद्र जाधव यांना आज तुला पैसे मिळणार नाही, असे सांगितले. यावर जाधव व विधाते पिता-पुत्रांमध्ये हमरीतुमरी झाली. इतर शेतकऱ्यांना पैसेवाटप करत असताना मला माझ्या पावतीचे पैसे का देत नाही, असा सवाल जाधव यांनी केला. पैसे देणार नसेल तर लिहून द्या, असा जाधव यांनी आग्रह धरला. यावर प्रकरण हातघाईवर गेले. मला पैशाची गरज आहे, असे शेतकरी जाधव यांनी वारंवार सांगितले. पण आडतदार विधाते पिता-पुत्राने पैसे न देता धारधार शस्त्राने जाधव यांच्यावर वार करीत बेदम मारहाण केली. आडतदाराकडून शेतकऱ्यांना मारहाण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. शेतकऱ्यांनी थेट बाजार समिती कार्यालयावर मोर्चा काढत संबंधित आडतदारावर कारवाई करा, अशी मागणी केली. 

वारंवार विनवणी करूनही आडतदार विधाते याने पैसे दिले नाहीत. पैसे देण्यास टाळाटाळ तर केलीच शिवाय मारहाण केली. बाजार समितीचे कामकाज शेतकऱ्यांसाठी असेल, तर त्या आडतदारावर तत्काळ कारवाई करावी. -जितेद्र जाधव, शेतकरी 

संबंधित शेतकरी नशेत होता. पैसे देण्यास आम्ही तयार होतो; पण नंबरनुसार यावे, असे आम्ही सांगितले. पण अगोदरच्या शेतकऱ्यापूर्वी मला पैसे द्या, असा अट्टहास धरला. तसे करता येणार नाही, असे सांगितल्याने त्याने थेट आमच्यावर हल्ला केला. - दत्तू विधाते, आडतदार 

शेतकरी केंद्रस्थानी ठेवून बाजार समितीचे कामकाज केले जाते. शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी यंत्रणा उभी केली आहे. बाजार समितीला बदनाम करण्याचा काही समाजकंटकांनी विडा उचलला आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास कारवाई होईल - आमदार दिलीप बनकर, सभापती, बाजार समिती, पिंपळगाव बसवंत  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com