Gambling News | पिंपळगाव बसवंत : जुगारींना वाचविण्याची ‘खाकी‘ची धडपड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gambling

पिंपळगाव बसवंत : जुगारींना वाचविण्याची ‘खाकी‘ची धडपड

नाशिक : फास्टटॅगची चौकशी करण्यासाठी आलेल्या दोघा प्रवाशांना धमकी देत जबरदस्तीने पैसे काढून घेतल्याचा प्रकार रविवारी (ता. २३) सकाळी पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर घडला. याबाबत ‘सकाळ'ने सोमवारच्या (ता. २४) अंकात ‘पिंपळगाव टोलनाका बनला जुगाऱ्यांचा अड्डा’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध करून आवाज उठविला. खुद्द पोलिसांनीच जुगाऱ्यांकडून लुटलेली रक्कम दुसऱ्या दिवशी संबंधितांना मिळवून दिली, हे विशेष. परंतु, ‘आपली रक्कम लुटली नसून उसनवार दिल्याचे’ कागदावर लिहून देण्याच्या पोलिस निरीक्षकांच्या दबावतंत्रामुळे संबंधितांना चार तास अक्षरश: रडकुंडीला आणल्याचा केविलवाणा प्रकार घडला. या प्रकाराने पिंपळगाव बसवंतला खाकी वर्दीत नेमके काय चालले आहे याची खमंग चर्चा सुरू आहे.(Gambling News)

हेही वाचा: बनावट मद्य प्रकरण : धारागिरातून आठ लाखांचा साठा जप्त

चौगाव (ता. बागलाण) येथील प्रवीण मोतीराम मांडवडे हे कारने (एमएच-०५- बीएस- ४८३८) फास्टटॅग लावण्यासाठी रविवारी (ता. २३) सकाळी साडेसातच्या सुमारास पिंपळगाव टोल नाक्यावर आले होते. टोलनाक्याच्या पुढील बाजूस फास्टटॅगच्या स्टॉलवर चौकशीसाठी गेल्यानंतर तीनपत्ती जुगार खेळवणाऱ्या जुगाऱ्यांच्या टोळीतील काहींनी जबरदस्तीने त्यांच्या खिशातील रोख ७ हजार रुपये तसेच मोबाईलवरून फोन-पेद्वारे १२ हजार रुपयांचे ऑनलाईन ट्रान्झेक्शन ९९७५०८३२९८ या मोबाईल क्रमांकावर मारून घेतले. याप्रकरणी श्री. मांडवडे पोलिस ठाण्यात कैफियत मांडण्यासाठी गेलो असता त्यांच्याकडून केवळ तक्रार अर्ज लिहून घेला. चौकशी करून कारवाई करू, उद्या (ता.२४) या, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: आम्ही निधी आणतो; विराेधक पाठ थोपटून घेत असल्‍याची आमदार राजळे यांची टीका

पैसे देतो, तक्रार मागे घ्या

याप्रकरणी ‘सकाळ'ने सोमवारच्या अंकात आवाज उठवला. त्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. श्री. मांडवडे सोमवारी (ता.२४) सायंकाळी चारच्या सुमारास पिंपळगाव पोलिस ठाण्यात आपल्या तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी आले. परंतु, पोलिसांनी मांडवडे यांना ‘तुमचे गेलेले पैसे परत देतो, तक्रार मागे घ्या’ अशी अट घातली. चौकशीचा ससेमिरा नको म्हणून पोलिसांच्या या भूमिकेशी मांडवडे यांनी सकारात्मकता दर्शवली. पोलिसांनी लागलीच जुगाऱ्यांना बोलावून श्री. मांडवडे यांचे पैसे ऑनलाइन स्वरुपात चुकते केले. आपले पैसे मिळाल्याने श्री. मांडवडे काहीशे सुखावले. मात्र, त्यांचा हा आनंद काही क्षणापुरताच राहिला.

हेही वाचा: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतले सोनिया, प्रियांका स्टार प्रचारक

पेटारेंनी उघडला दबावाचा पेटारा

पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी श्री. मांडवडे यांना ‘तुम्ही जुगाऱ्यांना उसने पैसे दिले होते, ते पैसे आपल्या परत मिळाले’ असे लेखी लिहून देण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब केला. या अनपेक्षित प्रकारामुळे श्री. मांडवडे यांच्यासह त्यांच्यासोबत आलेले सहकारीही चक्रावून गेले. चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याच्या प्रकारामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात तब्बल चार तास ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ रंगला. वाहनचालकांची हजारो- लाखो रुपयांची लूट करणारे समोर असूनही त्यांना आश्रय देण्याच्या पोलिस निरीक्षकांच्या भूमिकेमुळे ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यालाच काळीमा फासला जात असल्याची भावना पीडित श्री. मांडवडे व त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. अखेर रात्री आठच्या सुमारास उद्या (ता. २५) पुन्हा पोलिस ठाण्यात येतो, असे सांगितल्यानंतर पोलिसांनी श्री. मांडवडे व त्यांच्या सहकाऱ्यांना सोडले. या प्रकारामुळे मात्र पीडितांना पैसे मिळूनही मन:स्तापच पदरी पडला.

हेही वाचा: जळगाव : शेळ्या चोरीच्या संशयावरून पाठलाग; भरधाव कार गटारात

पिंपळगावच्या प्रतिष्ठेला धक्का

पिंपळगाव बसवंत शहराची ख्याती सातासमुद्रापार आहे. द्राक्ष, टोमॅटो, कांदा पिकामुळे आशिया खंडात बाजार समितीचा लौकिक आहे. सर्वदूर पिंपळगाव शहराचे नाव घेतले जात असताना या शहराची सुरक्षा व्यवस्था ज्यांच्या खांद्यावर आहे, त्या पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच अवैध धंदेचालकांना पाठिशी घालून सामान्यांना हीन वागणूक दिली जात असेल तर पिंपळगावच्या प्रतिष्ठेला हा धक्का नाही का, असा प्रश्‍न निश्‍चितच पडतो.

''आपल्या कष्टाचे पैसे गेले म्हणून आपण पोलिस ठाण्यात तक्रार केली. आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. पैसे तर मिळाले. पण, पोलिसांनी जुगाऱ्यांचा बचाव करण्यासाठी आम्हाला दिलेली वागणूक कधीच विसरणार नाही. पोलिस सामान्यांच्या पाठिशी आहे की लुटारूंच्या हा प्रश्‍न पडतो.''

- प्रवीण मांडवडे, तक्रारदार, चौगाव (ता. सटाणा)