esakal | लहान मुलांमध्ये न्यूमोनियाचा धोका अधिक; नाशिकमध्ये लसीकरणास सुरूवात
sakal

बोलून बातमी शोधा

न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरणास नाशिकमध्ये सुरवात

न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरणास नाशिकमध्ये सुरवात

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : लहान मुलांना न्यूमोनियावर दिली जाणारी पीसीव्ही अर्थात ‘न्यूमोकोकल कॉन्ज्युगेट’ लसीकरणाला मंगळवार (ता. १३)पासून शहरात नियमित सुरवात होणार असल्याचे पालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे सांगण्यात आले. लहान मुलांमध्ये बॅक्टेरियल न्यूमोनियाचा धोका अधिक असतो. त्यामुळे चिमुकल्यांना जीवदेखील गमवावा लागू शकतो. अशा प्रकारचे बालमृत्यू रोखण्यासाठी न्यूमोकोकल कॉन्ज्युगेट लशीचा सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. (Pneumonia-preventive-vaccination-starts-nashik-marathi-news)

लहान मुलांमध्ये बॅक्टेरियल न्यूमोनियाचा धोका अधिक

देशात एक हजार मुलांमागे ३४ मुले न्यूमोनियामुळे मृत्यू पावतात. राज्यात त्याचे प्रमाण एक हजार मुलांमागे १९ आहे. या बचावासाठी मंगळवारपासून न्यूमोकोकल कॉन्ज्युगेट लसीकरणाला सुरवात केली जाणार असून, बॅक्टेरियल न्यूमोनियापासून बालकांमधील मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे. बॅक्टेरियल न्यूमोनिया हा आजार प्रामुख्याने वयोवृद्धांसोबातच बालकांमध्येही आढळतो. हिप न्यूमोनिया आणि बॅक्टेरियल न्यूमोनियामुळे साधारणतः अर्भक आणि बालमृत्यू होतात. बालकांमधील मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी राज्यभरात बालकांमधील लसीकरणाला सुरवात केली जाणार आहे. त्यासाठी न्यूमोकोकल कॉन्ज्युगेट ही लस प्रभावी ठरत आहे. या लसीकरण मोहिमेंतर्गत दीड महिन्याच्या नवजात शिशूला पहिला डोस दिला जाणार आहे. त्यानंतर साडेतीन महिन्यांनंतर दुसरा आणि नऊ महिन्यांनंतर तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे. दीड महिन्याच्या नवजात बालकापासून लसीकरणाला सुरवात केली जाणार आहे. शहरातील सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर नियमित लसीकरण सत्रात ही लस दिली जाणार आहे. न्यूमोकोकल कॉन्ज्युगेट लसीकरणाच्या अनुषंगाने आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे वैद्यकीय विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा: नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसच्या सुरक्षेला छेद; 5 लाख गायब

हेही वाचा: येवलेकरांना प्रथमच 2 मंत्री, 3 आमदार, 2 सभापतिपदांचा लाभ!

loading image