भाईगिरी टीकवण्यासाठी केला खून, आता आयुष्य जाणार खडी फोडण्यात | Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime news nashik

भाईगिरी टीकवण्यासाठी केला खून, आता आयुष्य जाणार खडी फोडण्यात

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : ‘तुझ्यात भाईगिरी करण्याची धमक नाही, तुझ्यात दम नाही’, असे हीनवले अन् याचा राग मनात धरत म्हसरूळ परिसरात भाईगिरीचे वर्चस्व कायम करण्यासाठी त्याने दोघांच्या मदतीने हीनवणाऱ्याची हत्या केली. मात्र हे वर्चस्व काही काळासाठीच राहीलं, कारण पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या भाईगिरीचा अंत आता जेलमध्ये होणार आहे.

पोलिसांनी काही तासात केले गजाआड

सराईत गुंड प्रवीण काकडच्या हत्येचा काही तासांत उलगडा करण्यात अखेर म्हसरूळ गुन्हे शोध पथकास यश आले आहे. संदीप ऊर्फ लेफ्टर सुरेश त्रिभुवन (वय ३२, रा. वैदूवाडी, दिंडोरी रोड, म्हसरूळ), स्वप्नील दत्तात्रेय पाटील (वय ३२, रा. रामकृष्णनगर, मखमलाबाद रोड, पंचवटी), महेंद्र ऊर्फ बिरू सुरेश अभंग (वय ३०, रा. आंबेडकरनगर, दिंडोरी रोड, म्हसरूळ) अशी तिघा संशयितांची नावे आहेत. त्यांनी काकडच्या हत्येची कबुली दिली आहे.

हेही वाचा: नाशिक : सांस्‍कृतिक राजकारणात ‘जयभीम’ मैलाचा दगड

दारू बेतली जिवावर

पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण आणि म्हसरूळ भागात दहशत निर्माण करणारा सराईत प्रवीण गणपत काकड (वय २८, रा. म्हसरूळ) याची काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली होती. संशयितांसमवेत बऱ्याचदा मयत काकडची शाब्दिक चकमक झाली होती. तसेच, प्रवीण याने संदीप ऊर्फ लेफ्टर त्रिभुवन याला शिवीगाळ करून ‘तुझ्यात दम नाही,’ असे हीनवले होते. त्याचा राग मनात धरून आणि काकडचे परिसरातील वर्चस्व संपविण्याचे लेफ्टरने ठरविले होते. रविवारी (ता. २१) त्याला म्हसरूळ आडगाव लिंक रोडवर खिळ्याच्या कारखाना पाठीमागील मोकळ्या भूखंडावर दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. मद्यपान करताना प्रवीण व लेप्टर ऊर्फ संदीप यांच्यात शाब्दिक चकमक झाली व त्याचे पर्यावसन वादातून हाणामारीत झाला. मयत प्रवीणच्या पोटात व मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यात वर्मी घाव लागल्याने काकड जागीच कोसळला. नंतर त्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली. घटनास्थळी मद्याच्या बाटल्या व एक अॅक्टिव्हा मोपेड पोलिसांना मिळून आली. त्यानुसार म्हसरूळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तिघांनाही ओझर, दहावा मैल म्हसरूळ - मखमलाबाद परिसरातून ताब्यात घेतले.


हेही वाचा: मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारताची सुधारणा! जगात आहे 'या' क्रमांकावर

यांनी बजावली कामगिरी

पोलिस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी, म्हसरूळ गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील, व्ही. डी. अहिरे, विशाल गायकवाड, गणेश रेहरे, जितू शिंदे, दिनेश गुंबाडे, बलदेव राठोड आदींनी कामगिरी बजावली.

loading image
go to top