
Nashik Bank Fraud : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था कर्ज फसवणूक प्रकरणाच्या आरोपावरून पोलिस कोठडीत असलेले शिवसेना (उबाठा) उपनेते अद्वय हिरे यांच्या पोलिस कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली.
येथील न्यायालयाने त्यांना २३ नोव्हेंबरपर्यंत (तीन दिवस) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (police custody of Advay Hiray increased nashik bank fraud news)
रेणुका यंत्रमाग संस्थेकरिता कर्ज घेण्यासाठी कमी मूल्यांकनाचे तारणाच्या आधारे ७.४६ कोटी कर्ज घेऊन कर्जाची परतफेड न करता फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक ग्रामीणचे आर्थिक गुन्हे शाखेने हिरे यांना बुधवारी (ता. १५) भोपाळ येथून अटक केली होती. यानंतर गुरुवारी (ता. १६) सकाळी त्यांना न्यायालयात उभे करण्यात आले होते.
त्या वेळी अपर सत्र जिल्हा न्यायाधीश यू. एस. बघेले यांनी हिरे यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. सोमवारी (ता. २०) पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
अतिरिक्त सरकारी वकील महेंद्र फुलपगारे, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे ए. आय. वासीफ यांनी युक्तिवाद करताना, नॉन ॲग्रिकल्चर कर्ज मंजूर करताना सरव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक यांचीही शिफारस लागते. त्यांच्या नोंदी व बँक प्रोसिडिंग बुक दोन दिवस बँकेला सुटी असल्यामुळे मिळाले नाही.
दस्तऐवज मिळविण्यासाठी कोठडी हवी. तपास सुरू आहे. त्यातच तत्कालीन निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचे जाबजबाब हवे आहेत. हिरे व त्या वेळचे कर्मचारी यांची समोरासमोर चौकशी करावी लागणार असल्याने चौकशी व तपासाकामी चार दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद केला. हिरे यांच्यातर्फे कामकाज पाहणारे ॲड. एम. वाय. काळे यांनी पोलिस कोठडीस विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
दरम्यान, पोलिस हिरे यांना न्यायालयात घेऊन जात असताना न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास आहे. योग्य ते होईल, असे हिरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. न्यायालय आवारात आजही हिरे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.