
शिवसेना नगरसेवक पुत्राविरोधात उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिक रोड : कोयता घेऊन धमकी देणे व दहशत माजविणाऱ्या टोळीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात शिवसेनेचा नगरसेवकपुत्र व त्यांच्या कुटुंबीयातील इतर जणांचा समावेश आहे. (police file case against corporator son)
नगरसेवक पुत्राविरोधात उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड येथील देवळालीगावातील केशव लक्ष्मी अपार्टमेंटमधील प्रशांत जाधव यांच्या बिल्डिंगखाली संशयित गिरीश सूर्यकांत लवटे, संदेश लवटे, रोशन लवटे, धनंजय साळुंके, कार्तिक सोनी, गजानन बावणे शनिवारी (ता. २२) रात्री साडेअकराला कोयता घेऊन बिल्डिंगच्या खाली आले. प्रशांत जाधवचा कार्यक्रमच करतो, अशा धमक्या देत त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या वेळी जाधव कुटुंबीयाने उपनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिस देवळालीगाव येथील घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आल्याचे समजताच ॲक्टिवा व निळ्या आय टेन (एमएच १२- एफएफ ३००८) या गाड्यांमधून संशयित पळून गेले.
पूर्ववैमनस्याच्या वादातून ही घटना
पोलिसांनी पाठलाग करीत गिरीश लवटे, गजानन बावणे, कार्तिक सोनी यांना वाहनासह ताब्यात घेतले. पूर्ववैमनस्याच्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सागर प्रदीप जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. यातील गिरीश लवटे शिवसेनेचे नगरसेवक सूर्यकांत लवटे यांचा मुलगा आहे. उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल शिंदे तपास करीत आहेत.