esakal | पोलिस अकादमीत प्रशिक्षण तातडीने सुरु करा! उमेदवारांचे गृहमंत्र्यांना पत्राद्वारे साकडे

बोलून बातमी शोधा

PSI training Nashik
पोलिस अकादमीत प्रशिक्षण तातडीने सुरु करा! उमेदवारांचे गृहमंत्र्यांना पत्र
sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतची प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम निकाल जाहीर झाला. तरीदेखील तेरा महिने उलटूनही प्रशिक्षणाला सुरवात होत नसल्‍याने बॅच क्रमांक ११९ च्‍या उमेदवारांनी थेट गृहमंत्र्यांना पत्राद्वारे साकडे घातले आहे.

कासवाच्या गतीने होतेय प्रक्रिया

राज्‍याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे, की पोलिस उपनिरीक्षकपदी निवड होऊन एक वर्ष एक महिना झाला असून, आम्ही प्रशिक्षणासाठी प्रतीक्षेत आहोत. निकाल १७ मार्च २०२० ला लागला असून, पूर्व व मुख्य परीक्षा २०१८ मध्ये पार पडली. यापूर्वीच प्रक्रियेतून उमेदवारांचे साडेतीन वर्ष वाया गेलीत. निकालानंतर तीन महिन्यांत प्रशिक्षण सुरू होणे अपेक्षित होते. परंतु अचानक उद्‌भवलेली कोरोनाची परिस्थिती, महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये सुरू उमेदवारांचे प्रशिक्षणामुळे पुढील प्रक्रियाही कासवाच्या गतीने होतेय.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : .....तर यामुळे घडले असावे मृत्यूतांडव!

प्रक्रियेबाबत प्रश्‍नचिन्‍ह ?

या वर्षी मार्चमध्ये प्रशिक्षण सुरू होणार असल्‍याचे सांगितले होते. त्यानुसार बॅच क्रमांक ११९ मिळाला आहे. परंतु प्रशिक्षण अद्यापही सुरू झालेले नाही. सुधारित प्रशिक्षण २६ एप्रिलला होते; परंतु शासनाने नुकतेच परिपत्रक काढून प्रशिक्षण अनिश्चित कालावधीसाठी स्‍थगित केले. तातडीने प्रशिक्षण सुरू करण्याची मागणी या पत्रातून केली असून, प्रक्रियेबाबत प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित केले आहे.

उमेदवारांचा मानसिक तणाव वाढतोय

यामुळे दीर्घ काळ वाया गेला असून, पोलिस सेवेतील कालावधी कमी झाला आहे. आर्थिक नुकसान होऊन, सामाजिक व मानसिक तणाव वाढला असल्‍याचे उमेदवारांचे म्‍हणणे आहे. बऱ्याच उमेदवारांची लग्न बाकी आहेत. प्रशिक्षणाची वाट नातेवाईक, गावकरी बघत असून, त्यांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची मनस्थिती उरली नसल्‍याचे उमेदवारांचे म्‍हणणे आहे.

हेही वाचा: नाशिकच्या सिक्स सिग्मा हॉस्पिटलमधील परिस्थिती चिंताजनक; पाहा VIDEO

...तर बॅच क्रमांक ११९ राहिल की नाही, याबाबत शंका

विभागांतर्गत (डिपार्टमेंट) पीएसआय २०१७ बॅचचा निकाल फेब्रुवारीत लागला. अशात नियोजित प्रशिक्षण कालावधीत जाणीवपूर्वक बदल केले जात असल्‍याची तक्रार आहे. संबंधितांनी आमच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत मॅटमध्ये धाव घेत, आधी प्रशिक्षणासाठी जाण्याची मागणी केली आहे. सर्व नियोजित असताना, उमेदवारांनी लसीकरण पूर्ण केलेले असताना प्रशिक्षण लांबविल्‍याने शंका उपस्‍थित केली आहे. याउलट विभागांतर्गत बॅचच्‍या प्रशिक्षणासंबंधीची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित उमेदवार सध्या सेवेत असून, त्‍यांची समाजाला गरज असतांनादेखील त्‍यांना प्रशिक्षणासाठी प्राधान्‍य दिल्‍याने चिंता व्‍यक्‍त केली आहे. केंद्र शासनाचे अखिल भारतीय स्‍तरावरील प्रशिक्षण सुरू असून, केवळ नाशिकचेच पीएसआय प्रशिक्षण बंद आहे. त्वरित प्रशिक्षण सुरू न केल्‍यास थेट आत्‍मदहनाची परवानगी उमेदवारांनी पत्रातून मागितली आहे. तसेच यापूर्वी मिळालेला बॅच क्रमांक ११९ हा विभागांतर्गत उत्तीर्ण बॅचकडून हिरावून घेतला जाण्याची भीती व्‍यक्‍त केली आहे.