मालेगावात हिंसाचारानंतरही राजकारण सुरूच; मनपा निवडणूकीवर नजर | Malegaon Violence | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon violence

मालेगावात हिंसाचारानंतरही राजकारण; मनपा निवडणूकीवर नजर

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहराने गेली दोन दशके राष्ट्रीय एकात्मता व शांततेची कूस धरली आहे. कासवगतीने का होईना विकासाच्या दिशेने शहर व परिसराची वाटचाल सुरू आहे. २००१ च्या दंगलीनंतर शहरात २००६ व २००८ मध्ये दोन बॉँबस्फोट, आषाढी एकादशीला मनमाड चौफुलीनजीक गोवंश मृत्यूप्रकरण, तसेच कायदा सुव्यवस्थेला काही प्रमाणात गालबोट लावणाऱ्या, धार्मिक तेढ व द्वेष निर्माण करणाऱ्या घटना घडल्या. मात्र, शहरवासीयांनी त्याला धैर्याने तोंड देत शांतता कायम राखली. समाजकंटकांना संधी दिली नाही. या वेळी मात्र त्रिपुरातील कथिक घटनांच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंददरम्यान नवीन बसस्थानक परिसरात झालेला हिंसाचार, आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक केल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हिंसाचारानंतरही शहरातील प्रमुख राजकीय पक्षांनी राजकारण सुरूच ठेवले आहे.

मालेगाव हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी कुठल्याही निर्दोष व्यक्तीला अटक केली नसताना, निर्दोषांना नाहक त्रास नको, असा टाहो फोडत हे पक्ष एकमेकांकडे उंगलीनिर्देश करीत आहेत. पोलिसांनाही पुराव्यासह आयते कोलीत मिळाल्याने आगामी महापालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी हिंसाचारातील समाजकंटक व सूत्रधारांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

सुन्नी जमेतुल उलेमा व रझा ॲकॅडमीने १२ नोव्हेंबरला बंद पुकारला होता. बंदच्या तव्यावर आयती पोळी भाजून घेण्यासाठी जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, एमआयएम यांसारख्या राष्ट्रीय संघटनांसह धार्मिक, सामाजिक संघटनाही यात सहभागी झाल्या. शहरातील पूर्व भागात कधी नव्हे, तो बंद शंभर टक्के यशस्वी झाला. समारोपाला त्याचे श्रेय घेण्यासाठी सर्वच पुढे सरसावले. निवेदन देण्याच्या निमित्ताने विनापरवाना मोठा जमाव जमला. हा जमाव नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. नेत्यांनी जमावातील नागरिकांना व तरुणांना वारंवार शांततेत घरी जाण्याचे आवाहन केले. तरुणांनी नेत्यांचे काहीएक न ऐकता नवीन बसस्थानकाकडे धाव घेतली. शहरातील मच्छीबाजार, जुना आग्रा व कुसुंबा रस्त्यावरील जमाव या तरुणांना येऊन मिळाला. राजकीय नेत्यांनी शहरातील कुत्ता गोळीची नशा करणाऱ्या तरुणांविरुद्ध मोहीम सुरू करतानाच सातत्याने कारवाईची मागणी केली. यामुळे कुत्ता गोळीची नशा करणाऱ्या तरुणांनाही राजकीय व धार्मिक नेत्यांना अडकविण्याची ही नामी संधी असल्याची जाणीव झाली. त्यांनी बंदची संधी साधून जमावाला हातभार लावत हिंसाचारात पुढाकार घेतला.

तंत्रज्ञानातील प्रगती पाहता, व्हिडिओ शुटिंग, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आपल्यापर्यंत पोहोचतील, याची जाणीव असूनही जमाव दगडफेक व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करीत होता. तोकडे मनुष्यबळ असताना अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी व उपअधीक्षक लता दोंदे यांनी धैर्य व संयम दाखवत केलेली कारवाईदेखील वाखाणण्याजोगीच आहे. यामुळेच दुपारी चार ते साडेसहादरम्यान झालेली एका प्रमुख चौकातील घटना वगळता या हिंसाचाराचे लोण शहरात कोठेही पसरले नाही. शहरवासीयांनीही संयम दाखविला. त्यामुळेच सारा प्रकार तातडीने आटोक्यात आला. रात्रीच शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले. शनिवारी तर शहरात जणू काही घडलेच नाही, अशी स्थिती होती.

हेही वाचा: नाशिक | मालेगाव हिंसाचारप्रकरणी नव्याने आठ जणांना अटक

सूत्रधारांच्या मुसक्या आवळाव्यात

मालेगावातील हिंसाचार तातडीने आटोक्यात आणल्याबद्दल एका सुरात पोलिसांचे सर्वांनी कौतुक करतानाच कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. प्रत्यक्षात पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास व अटकसत्र सुरू करताच त्याविरोधात आरडाओरड सुरू झाली. हिंसाचार करण्यात आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रमुख राजकीय पक्षांकडून इच्छुक असलेले तरुण नेतृत्वच आघाडीवर होते. संधी साधून चमकोगिरी करण्याचा प्रकार त्यांच्या चांगलाच अंगाशी आला आहे. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल व एमआयएम हिंसाचारानंतरही राजकारण करण्यातच धन्यता मानत आहे. पोलिसांनी राजकीय दबावाला भीक न घालता कठोर कारवाई करावी. समाजकंटकांसह नशेबाज व सूत्रधारांच्याही मुसक्या आवळाव्यात.

हेही वाचा: नाशिक | पावसाच्या अंदाजाने द्राक्ष उत्पादक धास्तावले

loading image
go to top