
Shab E Barat : मालेगावमध्ये शब-ए-बारातची तयारी; कब्रस्तान स्वच्छता व कबरींना रंगरंगोटी
मालेगाव : शहरात मंगळवारी (ता. ७) मुस्लीम बांधवांचा शब-ए-बारात सण साजरा होणार आहे. यानिमित्त शहरातील नागरिक पूर्वजांच्या स्मृतीनिमित्त मशिदीत नमाज पठण व कब्रस्तानात आपापल्या आप्तेष्ठांच्या कबरीजवळ रात्रभर दुवा पठण करतात. (Preparation for Shab e Barat started in Malegaon nashik news)
शब-ए-बारात निमित्त कब्रस्तानात होणारी गर्दी व यापूर्वी शब-ए-बारात ला झालेले बॉम्ब स्फोटांच्या पाश्र्वभूमीवर पोलिस प्रशासनाने सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे. कब्रस्तानात १२ सीसीटिव्ही कॅमेरे तर अन्य महत्त्वाच्या ठिकाणी २८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. आयशानगर कब्रस्तानात आठ, संगमेश्वर व कॅम्पात प्रत्येकी चार सीसीटीव्ही असतील.
कब्रस्तानकडे जाणारे सर्व रस्ते दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी बॅरेकेटींग करून बंद करण्यात येतील. फक्त पादचाऱ्यांना जाऊ देण्यात येईल. सणाच्या पाश्र्वभूमीवर शहरात सशस्त्र बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलिस अधिक्षक तेगबीरसिंह संधू व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नुकताच कब्रस्तान परिसराचा दौरा करून नियोजन व सुरक्षेचा आढावा घेतला. शहरातील सर्व कब्रस्तान परिसराची पाहणी करताना संबंधित पोलिस ठाण्यांचे अधिकारी व विश्वस्त यांना सूचना केल्या.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
बडा कब्रस्तानात दुवा पठणासाठी मोठी गर्दी होते. त्या पाश्र्वभूमीवर सर्वांनाच खबरदारी घ्यावी लागणार आहे. शहरात बडा कब्रस्तान, आयशानगर, सोनापूरा व संगमेश्वर या चार कब्रस्तानात शब-ए-बारात निमित्त दुवापठण करण्यात येते. महानगरपालिका प्रशासनाने सर्व कब्रस्तानांची स्वच्छता, पथदीप, पाणी व अन्य उपाययोजना केल्या आहेत. आज कब्रस्तान परिसरात स्वच्छता करतानाच बहुसंख्य मुस्लीम बांधवांनी पूर्वजांच्या कबरींना रंगरंगोटी केली.
भिकाऱ्यांना रोखण्यासाठी स्वतंत्र पथके
शब-ए-बारातला मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणावर दान धर्म करतात. भिक्षेसाठी राज्यासह परराज्यातील भिकारी येथे येतात. २००६ च्या बॉम्ब स्फोटानंतर भिकाऱ्यांना बंदी घालण्यात आली असून कब्रस्तानापासून त्यांना दूर ठेवले जाते. बसस्थानके, रेल्वे स्थानक व अन्यत्र पोलिसांची नजर असते. भिकाऱ्यांना रोखण्यासाठी या वेळी तीन स्वतंत्र पथक करण्यात आले आहे. मुख्य रस्ते, कब्रस्तान व मशिदीच्या कार्यक्षेत्रात भिकाऱ्यांना मज्जाव करण्यात आला आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठे कब्रस्तान
शहरातील नयापूरा भागातील बडा कब्रस्तान हे आशिया खंडातील सर्वात मोठे क्रबस्तान आहे. या कब्रस्तानाचे क्षेत्रफळ सुमारे ४० एकर आहे. दफनविधीसाठी ३८ एकर जागेचा वापर केला जातो. येथे रोज सरासरी दहा दफनविधी होतात. कब्रस्तानाच्या जागेत तीन बाय सात आकाराचे ६६ हजार ९९९ खड्डे आहेत. या कब्रस्तानात शहरातील ८० टक्के दफनविधी होतात