esakal | मराठीबद्दल बाबू लोकांना पोटतिडीक नाही - मधू मंगेश कर्णिक
sakal

बोलून बातमी शोधा

prestigious janasthan award presented to madhu mangesh Karnik in nashik

मराठीबद्दल बाबू लोकांना पोटतिडीक नाही - मधू मंगेश कर्णिक

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : गेल्या दहा-पंधरा वर्षांत मराठीची खूप चर्चा होत आहे; पण घडत काहीच नाही. मराठीच्या समस्या अनेक आहेत. आतापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांशी माझी चांगली मैत्री आहे. त्यांना साहित्याबद्दल अभिमान, प्रेम, आदर आहे. मराठीबद्दलची पोटतिडीक तुम्हा-आम्हालाही आहे. परंतु ती शासनात बसलेल्या बाबू लोकांना नाही. त्यांच्यात मराठीविषयी आस्थाच नाही, अशी खंत मधू मंगेश कर्णिक यांनी येथे व्यक्त केले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘जनस्थान पुरस्कार’ कर्णिक यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते शनिवारी (ता. ४) प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

कर्णिक म्हणाले, की मुंबईत, कोकणात राहात असताना मराठीचे भवितव्य, अध्ययन, अध्यापनाबद्दल चर्चा होते. परंतु पुढे काहीच होत नाही. नवी मुंबईत ओडिशामधील लोकांचे ओडिशा भवन आहे. मणीपूर, पंजाब, आसाम, गुजरात, गोवा भाषा भवन मुंबईत आहेत. परंतु, महाराष्ट्रात मात्र मराठी भवन नाही. २०१० मध्ये मराठी विभाग सुरू झाला. अनेक लेखक-कवींची त्यांच्या गावी स्मारकं नाहीत. यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

या वेळी मधू मंगेश कर्णिक यांच्या जीवनावर आधारित लघुपट सादर करण्यात आला. अरविंद ओढेकर यांनी मानपत्राचे वाचन केले. ॲड. विलास लोणारी यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत टकले, मकरंद हिंगणे, ज्येष्ठ लेखिका ताराबाई भवाळकर आदींसह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: हेल्मेट नसेल तर वाहन जप्त; चालकांचे सक्तीने होणार समुपदेशन

जनस्थान माझ्यासाठी श्रीफळ

एखादा पुरस्कार मिळणे म्हणजे तो मान असतोच; पण नारळाला हळद, कुंकू लावत अक्षदा टाकून देवासमोर ठेवतो, त्यावेळी त्या नारळाचे श्रीफळ बनते. श्रीफळाला पावित्र्य, वलय, मूल्य निर्माण होते. जनस्थान पुरस्कार हा माझ्यासाठी श्रीफळ, आशीर्वाद, प्रसाद आहे. कुसुमाग्रज स्मारकात पुरस्कार मिळणे मला मोलाचे वाटत असून, कुसुमाग्रजांना महामानवच म्हटले पाहिजे. कुसुमाग्रजांची भेट हा माझ्या आयुष्यातील भाग्य योग होता. आज त्यांच्या नावाने पुरस्कार मिळतोय, हाही भाग्य योग असल्याचे त्यांनी नमूद केले.

मधू मंगेश कर्णिक यांच्या साहित्याविषयी अनौपचारिक बोलणे फार अवघड आहे. जनस्थान पुरस्काराचे मधू मंगेश कर्णिक हे दुसरे कोकणस्थ पुरस्कारार्थी आहेत. कर्णिक यांना शुभेच्छा देताना मराठी साहित्य समृद्ध झालेले, माणसातले प्रेम अधिक आस्था झालेले व्हायला हवे.

-नरेंद्र चपळगावकर, अध्यक्ष

काय म्हणाले कर्णिक

* कुसुमाग्रज यांना भेटून मानवतेचे साक्षात्कारी दर्शन घडून आले

* काम करणाऱ्या माणसाला वय नसते

* साहित्यिक एक झाल्यावर दहावीपर्यंत मराठीची सक्ती झाली

* मराठी विद्यापीठ, भाषा भवन सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावे

* मराठीच्या भल्यासाठी राजकारण्यांनी एकत्र यावे

* देशभरातील लोंढे मुंबईत येतात

* मुंबईत मराठीचा टक्का ५२ वरून २२ टक्क्यांवर आलाय

* कुसुमाग्रज प्रतिष्ठानने मराठीसाठी काम करावे

हेही वाचा: विकासाची स्वप्ने गाजराची पुंगी ना ठरो..!

loading image
go to top