esakal | श्रीलंकेत कांद्यावर प्रतिकिलो आयातशुल्क; भारतीय कांद्याचे वांदे!
sakal

बोलून बातमी शोधा

onion

श्रीलंकेत कांद्यावर आयातशुल्क; भारतीय कांद्याचे वांदे!

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : श्रीलंकेत (sri lanka) यंदा कांद्याचे उत्पादन २० टक्क्यांनी अधिक आहे. पण, आयात होणाऱ्या कांद्यामुळे भाव मिळत नसल्याने दांबुला भागातील शेतकरी रस्त्यावर उतरले आणि त्यांच्यापुढे झुकत श्रीलंकन सरकारने कांद्याच्या आयातीवर ४० रुपये किलो याप्रमाणे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे श्रीलंकेत आठवड्याला जाणाऱ्या ७५ हजार टन भारतीय कांद्याचे (indian onion) वांदे होणार आहेत.

भारतीय कांद्याचे वांदे
कर्नाटक- आंध्र प्रदेश- तेलंगणामधील कांद्यासोबत श्रीलंकेतील कांद्याचे गेल्या वर्षीच्या पावसाने नुकसान झाले होते. अशातच, केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीला गेल्या वर्षी प्रतिबंध केला. त्यामुळे श्रीलंकेतील व्यापाऱ्यांनी तुर्कस्थान, इजिप्त, पाकिस्तानमधून कांदा विकत घेतला होता. त्यावेळी श्रीलंकन सरकारला कांद्याच्या आयातीवर लावण्यात आलेले ३० रुपये शुल्क मागे घ्यावे लागले होते. सद्यःस्थितीत श्रीलंकेतील बाजारपेठेत दिवसाला दोन ते तीन हजार बॅगभर कांदा विक्रीसाठी येतो. मात्र श्रीलंकेतील ग्राहकांसाठी दिवसाला २५ ते ३० हजार बॅगभर कांद्याची आवश्‍यकता भासते. श्रीलंकन सरकारच्या कांद्यावरील आयात शुल्कामुळे भारतीय कांद्याचा भाव किलोला १३५ ते १४० रुपयांपर्यंत पोचला आहे. इतक्या महागाईचा कांदा श्रीलंकेतील ग्राहकांकडून खरेदी केला जाण्याची शक्यता नसल्याने श्रीलंकेतील निर्यात थांबल्यात जमा असल्याचे निर्यातदार विकास सिंह यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात २४ तासांत सर्वत्र वरुणराजाची मेहरनजर!


श्रीलंकन सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयातशुल्क वाढविण्यास मान्यता देण्यात आली. स्थानिक मंत्री बंडारा टेकाकून यांनी मोठ्या कांद्यावर आयातशुल्क लावण्याची मागणी केली होती. कोलंबोमधील पत्रकारांशी संवाद साधताना श्रीलंकेतील कृषिमंत्री महिंदानंद अलुथामगे यांनी कांद्याच्या आयात शुल्कात वाढ केल्याची घोषणा केली. ते म्हणाले, की श्रीलंकेत सध्या कांद्याची काढणी सुरू आहे. त्यामुळे देशांतर्गत शेतकऱ्यांचे आणि कांद्याचे संरक्षण करण्यासाठी आयातशुल्क दोन महिन्यांसाठी वाढविण्यात आला आहे. सध्याच्या हंगामात ६० हजार टनांहून अधिक कांदा विक्रीसाठी अपेक्षित आहे.

कांद्याचे १५ टक्के उत्पादन अधिक
कर्नाटकमध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. शिवाय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या चाळीत उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. मात्र दक्षिणेतील कांद्याची आवक वाढली नसल्याने देशांतर्गत व्यापाऱ्यांचा कल सद्यःस्थितीत नाशिकचा उन्हाळ कांदा खरेदी करण्याकडे आहे. निर्यातदारांना मिळालेल्या माहितीनुसार भारताप्रमाणे पाकिस्तान, चीन, हॉलंड, इजिप्त या कांदा उत्पादक देशांमध्ये यंदा कांद्याचे उत्पादन दहा ते १५ टक्क्यांनी अधिक आहे.


हेही वाचा: येवला तालुक्यातही पावसाचा कहर; सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान

loading image
go to top