
Nashik News : पुणे विद्यापीठाने MA परीक्षा पुढे ढकलावी; AISF तर्फे विद्यापीठ प्रशासनाला निवेदन
नाशिक : अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ न देता कला शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम एमएच्या परीक्षा घेण्याची घाई सुरू असल्याचा आरोप ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (एआयएसएफ) यांनी केला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी संघटनेने केली असून, आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यापीठ प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. (Pune University to Postpone MA Exam statement by AISF to University Administration Nashik News)
निवेदनात म्हटले आहे, की जानेवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे एमए प्रथम वर्षाच्या सत्र परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले. गेल्या वर्षी १४ नोव्हेंबरपासून वर्ग सुरू झाल्यामुळे एमएचे अभ्यासक्रम महाविद्यालयांमध्ये नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू केले असले, तरी प्रवेश प्रक्रिया १ डिसेंबरपर्यंत सुरू होती.
असे असताना विद्यापीठाने २८ जानेवारीपासून परीक्षा घेण्याचा निर्णय धक्कादायक आहे. पुरेसा वेळ मिळालेला नसल्यामुळे कोणत्याच महाविद्यालयामध्ये विद्यापीठाने ठरवून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही.
हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय
हेही वाचा: Swachha Jal Abhiyan : स्वच्छ जल अभियानात नाशिक राज्यात अव्वल!
त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालय प्रशासनही चिंता व असंतोष व्यक्त करत आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ न देता केवळ परीक्षा घेण्याची घाई विद्यापीठाच्या शिक्षणाकडे बघण्याची वृत्ती दर्शवते.
याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचे समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांना निवेदन दिले आहे. मागणी कडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा नाशिक शहराध्यक्ष कैवल्य चंद्रात्रे, उपाध्यक्ष अवेश लोहिया, शीतल कश्यप, पूर्वा खर्डिकर, स्वामी कलंके, प्रियांका पारख यांनी दिला आहे.
हेही वाचा: Nashik News : माहिती, जनसंपर्क पदांसाठीच्या पदव्युत्तर पदवीधारक ऑनलाइन अर्जांबद्दल प्रश्नचिन्ह!