कापसाचे भाव दीड पट, परतीच्या पावसाने उत्पादन मात्र निम्म्यावर; शेतकऱ्यांना आर्थिक फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain damage cotton farming

कापसाचे भाव दीड पट, परतीच्या पावसाने उत्पादन मात्र निम्म्यावर

येवला (जि. नाशिक) : आधी पावसाचा खंड व शेवटी अतिवृष्टीमुळे कपाशीचे प्रचंड नुकसान झाल्याने एकरी उत्पादनात मोठी घट झाली आहे. कापसाच्या तीन ते चार वेचणी होतात मात्र यंदा दुसऱ्या वेचणीतच बोंडे संपली आहेत. समाधानाची बाब म्हणजे यंदा प्रथमच कापसाने आठ हजार रुपये भावाचा टप्पा ओलांडला असल्याने काही प्रमाणात नुकसानीची झळ भरून निघणार असली तरी शंभर कोटीच्या आसपास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पादन घटल्याने फटका बसणारच आहे.

परतीच्या पावसाने केला कहर

उत्पादन खर्च वाढला तर एकरी उत्पादन घटल्याने तसेच बेभरवशाचे बाजारभाव यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशी पिकाला फाटा देऊन इतर पिके घेतल्याने मोठ्या प्रमाणात क्षेत्रात घट झाली आहे. यावर्षी जिल्ह्यात ३८ हजार हेक्टरवर कपाशी लागवड झाली. कपाशी जोमाने आली, पण वाढीच्या अवस्थेत जुलैमध्ये पावसाने मोठा खंड पाडल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम झाला. त्यातच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने कहर केल्याने बोंडे पडली. झाडावर करपा रोगाचा विळखा पडल्याने नवी फुलपत्ती व बोंडे आलीच नाही.

हेही वाचा: नाशिक : प्रशासनास जाब विचारत लोकशाही बळकट करा

जोमात पिक येऊन ३ ते ४ वेचण्या होऊन एकरी ८ ते १२ क्विंटल कापूस निघतो, तेथेच या वर्षी कपाशीची एकच अन तुरळक शेतात दोन वेचण्या झाल्या असून प्रति एकर फक्त ४ ते ८ क्विंटल कापूस निघाला. काही शेतकरी खरीपातील कपाशीला रब्बीत पाणी देऊन फरदड घेतात.यामुळे नवे बोंडे लागून २ ते ३ क्विंटल कापूस बोनस मिळायचा पण आता झाडे करपा, लाल्याच्या आहारी गेल्याने पाणी असूनही त्याचा उपयोग होणार नाही. दरवर्षी जून-जुलैत लागवड झालेला कापूस थेट फेब्रुवारी ते मार्च पर्यत चालतो. या काळात टप्याटप्याने कापूस वेचला जातो.

प्रथमच विक्रमी भाव

सद्या बागायती कापसाला प्रतिएकर ५ ते ८ क्विंटल व कोरडवाहू क्षेत्रात ३ ते ४ क्विंटल उत्पन्न निघत आहे. राज्यात क्षेत्र घटल्याने मागणी वाढून बाजार भावातही तेजी आहे. सुरुवातीला खासगी व्यापाऱ्यांनी साडेआठ हजार रुपये क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला तर आता ७८०० ते ८००० रुपये दराने खरेदी सुरू आहे. केंद्र सरकारने मध्यम धाग्याच्या कापसाला ५ हजार ७२६ तर लांब धाग्याला ६ हजार २५ रुपयाचा दर जाहीर केला आहे, त्या तुलनेत यंदा प्रथमच हमीभाच्या दीडपट भाव खासगी बाजारात कापसाला मिळत आहे. काही जाणकारांच्या मते या दरात अजून वाढ होऊ शकते. त्यामुळे बागायतदार शेतकरी कापूस विक्रीपेक्षा साठवणुकीला प्राधान्य देत असल्याचेही दिसते.

असे झाले नुकसान...

जिल्ह्यात यंदा ९५ हजार एकरवर कापूस लागवड झाली असून सरासरी एकरी १० क्विंटल कापूस निघून ५५०० रुपये भावाने ५२२ कोटीचे उत्पादन अपेक्षित होते. मात्र यंदा केवळ सरासरी ६ ते ७ क्विंटलच कापूस निघत आहे. दरात वाढ झाल्याने ४५६ कोटीच्या आसपास उत्पन्न निघणार आहे. यामुळे यंदा भाव वाढ होऊनही सुमारे ७० ते १०० कोटीचा फटका एकट्या पांढऱ्या सोन्यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे.

हेही वाचा: डॉक्टरांनी वाढदिवशी दिली दिव्यांग विमलला कृत्रिम पायांची भेट

''यंदा लागवड कमी प्रमाणात झाली आहे. अनपेक्षितपणे दरात वाढ झाली असली तरी पावसाच्या अनियमितपणामुळे उत्पादनात घट झाली आहे. सध्या ८ हजाराच्या आसपास दर असून काही शेतकरी कापूस विकत आहेत तर काही साठवणूक करत आहेत.कापसाला मागणी वाढल्यास दरात १०० ते ३०० रुपयांचापर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे." - अशपाक सय्यद, व्यापारी-शेतकरी, राजापूर.

loading image
go to top