जिद्दी रावसाहेब बनला PSI; इच्छाशक्तीने यशाला घेतले कवेत

Inspirational story
Inspirational storyesakal

पिंपळगाव (जि. नाशिक) : अभियांत्रिकी क्षेत्रात पदवी घेऊनही वेगळ्या क्षेत्रात स्वतःला घडविण्यासाठी त्याने त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे रूपांतर जिद्दीत केले. जोडीला अपार कष्ट आणि परिश्रम यांची साथसंगत घेत त्याने यशाचे शिखर गाठले. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यातील दुसाने या गावात वास्तव्यास असलेले शेतकरी लक्ष्मण खैरनार यांच्या रावसाहेब या मुलाने कुठल्याही शिकवणीशिवाय राज्यसेवा आयोगाच्या परिक्षेत घवघवीत यश संपादीत केले आहे.

अति आत्मविश्‍वास ठरला निष्फळ

उपनिरीक्षकपदी त्याने घेतलेली झेप स्पर्धा परीक्षेत करिअर करणाऱ्यांच्या पंखात बळ देणारी व त्यांचे साहस वाढवणारी ठरली आहे. हे करीत असताना शेतकरी असलेल्या आई- वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत दिलेले पाठबळ कौतुकास्पद ठरले आहे. रावसाहेबचे माध्यमिक शिक्षण एम. जे. फुले विद्यालय दुसाने येथे झाले. तर अभियांत्रिकीचे पदवीचे शिक्षण शिरपूर येथील आर. सी. पटेल कॉलेजमधून झाले. रावसाहेबचा सरळ वाटणारा प्रवास अतिशय चढ- उतारांचा. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे ती बदलण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. अभ्यासात सर्वसाधारण असल्यामुळे सर्व घेतात तोच निर्णय रावसाहेबने घेत इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. पदवीचे शिक्षण झाल्यानंतर दोन- अडीच वर्ष घरच्यांना आधार म्हणून नोकरी केली. पण, नोकरीमध्ये मन रमत नव्हते. समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी रावसाहेबला स्वस्थ बसू देत नव्हती. ज्या समाजाने ओळख दिली त्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आणि तो मार्ग स्पर्धा परीक्षेतून साधता येईल, असे दिसले पण घरच्यांचा या निर्णयाला विरोध होता. त्यांना वाटायचे की हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यात काहीही अर्थ नाही. पण, रावसाहेबने त्यांना व्यवस्थित समजावून सांगितल्यावर तेही त्याच्या निर्णयाशी सहमत झाले अन् नवीन प्रवासाला सुरवात झाली. पहिल्या प्रयत्नात यश मिळेल हा रावसाहेबचा अति आत्मविश्‍वास निष्फळ ठरला.

Inspirational story
12 वी नंतर सैन्यात जाण्याचे तीन मार्ग, जाणून घ्या प्रक्रिया

...अन् क्षणातच आयुष्याचा पूर्ण प्रवास डोळ्यासमोर

रावसाहेब पुन्हा जोमाने उठला आणि तयारीला लागला. तो एएसओची पूर्व परीक्षा पास झाला. परंतु, मुख्य परीक्षेला कमी मार्क्स मिळाले. त्या काळात वनसेवा मुख्य परीक्षा दिली. पण, मुलाखतीपर्यंत मजल मारता आली नाही. तसेच, एक्साईसची मुख्य परीक्षा दिली पण अंतिम यादीतूनही हुलकावणी मिळाली. पुढील वर्षी पीएसआयच्या मुख्य परीक्षेत मजल मारून मुलाखतीपर्यंत पोहचला पण तीन- चार मार्क्सने पोस्ट गेली. त्यावेळी रावसाहेब खूप हताश झाला. सर्व सोडून आपापली परत नोकरी करावी, असे त्याला वाटायला लागले. तेव्हा घरच्यांनी आणि मित्रांनी धीर देत तू हे करू शकतो, हा आत्मविश्‍वास रावसाहेबला दिला. पुन्हा काहीही कसर न ठेवता अभ्यासाला सुरवात केली. अशा परिस्थितीत रावसाहेबला आर्थिक चणचण भासत होती. त्यावेळी नाशिकचे डॉ. अतुल वडगावकर यांच्या रूपाने दानशूर भेटला. त्यांनी त्यांच्या हॉस्टेलला रावसाहेबला ॲडमिशन दिले. मोफत राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. त्यामुळे रावसाहेब अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकला. त्यानंतर परत मुख्य परीक्षा दिली. पण, २- ३ मार्क्सने मुलाखतीपासून वंचित राहावे लागले. पुन्हा २०१९ ला तिसऱ्‍या प्रयत्नात पूर्व आणि मुख्य पास झाला. पण, दुर्दैवाने कोविड परिस्थितीमुळे शारीरिक चाचणी तब्बल दोन ते अडीच व वर्षांनी झाली. हा सुध्दा एक मानसिक आघात होता. एवढे दिवस शरीराची योग्य काळजी घेऊन शारीरिक कसरत करणे आणि बाहेर राहून त्यासाठी आर्थिक भार सांभाळणे हे सुद्धा खूप जिकरीचे होते. अशावेळी नोकरीस असलेले काही मित्र आणि डॉ. वडगावकर हे आर्थिक मदत करत होते. २५ जानेवारीला शारीरिक चाचणी झाली अन् ८ मार्च रोजी पोलिस उपनिरीक्षक पदाची गुणवत्ता यादी जाहीर झाली. क्षणातच आयुष्याचा पूर्ण प्रवास डोळ्यासमोरून गेला. निकाल कळविण्यासाठी पहिला फोन घरी केला. फोन केल्यावर आनंदाची बातमी सांगितली. दोन मिनिटे आई- वडील काहीच बोलले नाही. नंतर आवाज आला तो आईच्या आनंद अश्रूंचा... आई रडता रडता म्हटली भाऊ शेवटी तुझ्या कष्टाला फळ मिळालं.

''अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे स्वतःचा स्वतःवरील विश्‍वास जो कानात हळूच सांगत असतो सर्व चांगले होईल. अगदी या आत्मविश्‍वासाने अभ्यासात सातत्य ठेवले अन् यशाला कवेत घेतले.'' - रावसाहेब खैरनार, उपनिरीक्षक

Inspirational story
Job Tips: नोकरीच्या शोधात आहात का? या टिप्स मिळवून देतील उत्तम नोकरी

''अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून रावसाहेब नाशिकमध्ये पोलिस बनण्याच्या उद्देशाने दाखल झाला होता. त्याच्या अडचणीत त्याला मी व हॉस्टेलच्या वतीने लागेल ती मदत केली. मेहनत व जिद्दीच्या जोरावर त्याने पोलिस उपनिरीक्षक पदाला आपलेसे केले आहे.'' - डॉ. अतुल वडगावकर, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com